Maharashtra CM: मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रमाणे भाजप महाराष्ट्रात ही सरप्राईज देणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा महायुतीला मोठा कौल दिला आहे. राज्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. ज्याचं संपूर्ण क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातंय. त्यांच्या नेतृत्वात भाजपने सर्वाधिक जागा जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार हे निश्चित मानलं जात असताना काही वेगळ्या चर्चाही सुरु आहेत.
Maharashtra New CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच दिले जात आहे. निवडणुकीत देवाभाऊ प्रचंड गाजले. त्यांचा मी पुन्हा येईल हा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. 2014 ते 2019 असा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिले. २०१९ मध्ये देखील ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाजवळ आले. पण शिवसेनेने युती तोडल्याने त्यांना विरोधी पक्षात बसावे लागेल. त्यांनंतर अडीच वर्षात ते पुन्हा मुख्यमंत्री होणार असं चित्र निर्माण झालं असताना पक्षाने मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. पण फडणवीस यांना संयम सोडला नाही आणि त्याचं फळ त्यांना या निवडणुकीत मिळालं.
एकनाथ शिंदेंनी सोडला दावा
देवा भाऊ हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्याने त्यांचा मार्ग जवळपास मोकळा झाला. पण तरीही दबक्या आवाजात कुठे तरी चर्चा आहे की, भाजपचे वरिष्ठ नेते कोणता दुसरा निर्णय तर घेणार नाहीत. ना.
देवेंद्र फडणवीस यांनी केवळ चांगली कामगिरी केली नाही तर शिस्तप्रिय कार्यकर्त्याप्रमाणे पक्षाचे काम केले. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत यात शंका नाही.
मोदी-शाह सरप्राईज देणार?
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा हे अनेकदा सरप्राईज प्लॅन्स देतात. हे संपूर्ण देशाला माहित आहे. गेल्या वर्षीच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ते दिसून देखील आलं. पराभूत झाल्यानंतर ही पुष्कर सिंह धामी यांना पुन्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवले. हरियाणामध्ये भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरुन बाजुला करुन त्यांना केंद्रात आणलं. त्यांच्या जागी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री केलं.
भाजपकडून महाराष्ट्रात इतर कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री केलं जाणार अशी चर्चा देखील सुरु आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपला विधीमंडळाचा गटनेता जाहीर केला. पण भाजपकडून अजूनही गटनेता जाहीर झालेला नाही. त्यामुळे त्याला उशीर का होत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजप हायकमांड कोणता वेगळा निर्णय घेऊ शकतो का असा प्रश्न ही कायम आहे.
आता ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी ट्विट करत जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे. पण यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांचं नाव अजून कुठेही जाहीर करण्यात आलेलं नाही.