आता नाही तर कधीच नाही, लाखो प्रशिक्षित तरुण 14 जुलैला विधानभवनावर धडकणार, कारण काय?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील १ लाख ३४ हजार कर्मचारी १४ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत. ६ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांची नोकरी गेली आहे. बेकारीचा सामना करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी सरकारला न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार केला आहे.

आता नाही तर कधीच नाही, लाखो प्रशिक्षित तरुण 14 जुलैला विधानभवनावर धडकणार, कारण काय?
protest
| Updated on: Jul 09, 2025 | 8:33 PM

‘कुणी घर देता का घर?’ याऐवजी आता ‘कुणी काम देता का काम?’ अशी आर्त हाक देत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाखो कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे लाखो कर्मचारी येत्या १४ जुलै रोजी विधानभवनावर धडकणार आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भवितव्यासाठी धडक छत्री मोर्चा काढण्याचा निर्धार सांगलीतल एका महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांवर अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा धडक छत्री मोर्चा काढला जात आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून ३६ जिल्ह्यांचे युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रमुख सांगलीत एकत्र आले होते. यावेळी बेरोजगारीची टांगती तलवार यावर चर्चा करण्यात आली. सरकारने साधारण ६ महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. पण आता हा कालावधी संपला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांवर अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या अनिश्चित भविष्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारसोबत आरपारचा संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्हाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही

या बैठकीचे नेतृत्व युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे राज्य नेते बालाजी पाटील-चाकूरकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केले. “आम्ही युवकांना प्रशिक्षित केले, त्यांना रोजगाराची स्वप्ने दाखवली, पण आता त्याच युवकांच्या हाताला काम नाही. हे सरकारचे अपयश आहे आणि यावर आम्ही शांत बसणार नाही,” अशा शब्दात बालाजी पाटील-चाकूरकर यांनी संताप व्यक्त केला. तुकाराम बाबा महाराज यांनीही “आम्ही शांततेच्या मार्गाने आलो, पण आता आम्हाला न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही” असे ठणकावले आहे.

धडक छत्री मोर्चाची तयारी पूर्ण

या धडक छत्री मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान भर पावसातही आपल्या मागण्या घेऊन हे प्रशिक्षित तरुण-तरुणी विधानभवनावर धडक देणार आहेत. त्यांच्या हातात फक्त छत्र्या नसतील, तर आपल्या भविष्यासाठी लढण्याची जिद्द आणि न्यायासाठीची बुलंद मागणी असेल. यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचारी अमिया देसाई यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही दिवसाचे १२-१४ तास काम केले. आता अचानक आम्हाला वाऱ्यावर सोडले जात आहे. आमच्या कुटुंबाचे काय होणार?” असा सवाल अमिया देसाई यांनी व्यक्त केला.