
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याजवळील बारामती विमानतळावर विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या भीषण घटनेनंतर बारामती विमानतळाची सुरक्षा, तिथल्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि तांत्रिक त्रुटींवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकारण्यांची सातत्याने वर्दळ असलेल्या या विमानतळाकडे सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बुधवारी सकाळी ८.१० च्या दरम्यान मुंबई विमानतळावरुन बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. अजित पवारांचे विमान हे बारामती विमानतळाजवळ पोहोचले, पण बुधवारी लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५ किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, मात्र अपघाताच्या वेळी ती केवळ ३ किलोमीटर इतकी होती. यामुळे वैमानिकाने सुरुवातीचे लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत वळवण्याचा (Go-around) प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर विमान कंपनीसोबतच बारामती विमानतळाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बारामती विमानतळ हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमानुसार अनियंत्रित (Uncontrolled) श्रेणीत येते. या विमानतळाच्या कारभाराबाबत आत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) मालकीचे असून बारामती विमानतळ लिमिटेड (BAL) द्वारे चालवले जाते. या विमानतळावर नियमित एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणा नाही. त्याऐवजी, विमानतळ परिसरात असलेल्या खाजगी पायलट ट्रेनिंग अकादमींचे प्रशिक्षक किंवा विद्यार्थीच रेडिओवरून विमानांना सूचना देतात.
तज्ज्ञांच्या मते, जर या धावपट्टीवर ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) असती, तर कमी दृश्यमानतेतही वैमानिकाला अचूक मार्गदर्शन मिळाले असते आणि हा अपघात टाळता आला असता. हे विमानतळ साधारण ४५० एकरवर पसरलेले असून त्याची धावपट्टी ७,७१० फूट लांबीची आहे. या ठिकाणी अनेक राजकीय नेते चार्टर विमानाने येत असतात. २००९ मध्ये हे विमानतळ विकासासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले होते, परंतु प्रगती न झाल्याने २०२५ मध्ये एमआयडीसीने ते पुन्हा ताब्यात घेतले. सध्या येथे केवळ दोन केबिन आणि एक खोली एवढीच इमारत उपलब्ध आहे.
आता या भीषण अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) तातडीने आपली एक विशेष टीम बारामती विमानतळावर तैनात केली आहे. आता येथील हवाई वाहतूक नियंत्रण आणि हवामान खात्याने याची जबाबदारी घेतली आहे. सध्या हवाई दलाचे जवान हे विमानतळ सांभाळत आहेत, जेणेकरून पुढील उड्डाणे सुरक्षित होतील. या घटनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विमानतळ, धावपट्ट्या आणि तेथील सुरक्षा यंत्रणा किती रामभरोसे आहेत, याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.