
मुंबई : अंगणात खेळत असलेला 9 वर्षाचा सुभाष, जेवता जेवता बळी पडलेला 9 वर्षाचा महमद अली, दरवाजात उभा असताना खाली कोसळलेला 10 वर्षांचा विजय, 14 वर्षाचा करपय्या देवेंद्र आणि गोरखनाथ जगताप, 16 वर्षाचा एडविन साळवी, घरात गोळी लागून ठार झालेले घनशाम कोलार, खाटेवर बसून चुना खात असताना बळी पडलेले बालन्ना, घरात झोपलेले असताना गोळी लागून ठार झालेले रामचंद चौगुले, व्हरांड्यात झोपलेला शिवडीचा बाबा महादू सावंत… काय गुन्हा होता या बालकांचा आणि घरी असलेल्या वयोवृद्धांचा? तरीही तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई म्हणतात, ‘निष्पाप लोक मृत्युमुखी पडल्याचे आम्हाला माहित नाही’? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांची दखल त्याकाळच्या सरकारने घेतली तर नाहीच. पण, त्यानंतर आलेले सरकार यांनीही घेतली नाही. शासन दरबारी आजही त्यांची उपेक्षा होतेय. 10 ऑक्टोबर 1956… राज्य पुनर्रचना कमिशनने शिफारशी जाहीर केल्या. महाराष्ट्राचा विदर्भ प्रांत सोडून उरलेला महाराष्ट्र गुजरातला जोडण्याची शिफारस यात होती....