
मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर आता निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून मताधिकार हे अॅप तयार करण्यात आलं आहे. ज्यांचं दुबार मतदान आहे, त्यांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलं आहे, ज्यांचं नाव दुबार असेल त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल असंही यावेळी आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तसेच मतदार यादितील दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा असणार आहे, तर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे, तर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी,
मतदान दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणी 16 जानेवारी 2026
दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होता, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणीही करण्यात येत होती, मात्र आता राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.