विदर्भात पावसाची विश्रांती, पण गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 22 रस्ते, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला; सद्यस्थिती काय?

महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे, रस्ते बंद झाले आहेत आणि जीवितहानी झाली आहे.

विदर्भात पावसाची विश्रांती, पण गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 22 रस्ते, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला; सद्यस्थिती काय?
rain flood
| Updated on: Jul 10, 2025 | 8:24 AM

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या नाले तुडुंब वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही भागात ही पूरस्थिती हळूहळू निवळताना दिसत आहे. पूर्व विदर्भात पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांमध्ये पुराचे पाणी वेगाने ओसरू लागले आहे. त्यामुळे आजपासून महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने, दोन दिवसात पुरामुळे पूर्व विदर्भात पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल आणि कठानी या पाच नद्यांना सध्या दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणची पूर परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि तालुकास्तरावरील २२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चामोर्शीतील चिचडोह धरण १०० टक्के पूर्ण भरले आहे. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा वैनगंगा नदीला मोठा प्रभाव जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांत वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी, वैनगंगा नदीचे पाणी प्राणहिता व इतर नद्यांमध्ये जात असल्यामुळे प्राणहिता नदीत पूर परिस्थिती वाढत आहे.

गडचिरोलीच्या जिल्हा मुख्यालयाशी चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा हे सहा तालुके संपर्काच्या बाहेर आहेत. चामोर्शी आणि आष्टी येथून मार्ग बंद असल्यामुळे, विशेषतः चामोर्शीपासून वैनगंगा नदीला पूर आल्याने या तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

नागपूर, भंडारा. गोंदियात पावसाची विश्रांती

नागपूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक भागात पुराचे पाणी वेगाने ओसरत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या पूरस्थितीदरम्यान बोरगाव उगले परिसरात कार्तिक लाडसे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

भंडारा जिल्ह्यात काल रात्री पावसाने उसंत घेतल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि गेल्या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सव्वा तीनशे मिलिमीटर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता पाऊस नसल्यामुळे फक्त गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ दिसून येत आहे. गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी झाल्यास पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. देवरी तालुक्याच्या ककोडी – चिचगड मार्गावरील तात्पुरता पूल पाण्याने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे ककोडी गावाजवळील परिसराचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या रस्त्यावरील पुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्याने पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. मात्र तो वाहून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली आहे. पर्यायी पूल तयार झाल्यानंतरच हा रस्ता चिचगडकडे जाण्यासाठी तयार होणार आहे.

चंद्रपुरात ब्रह्मपुरी-आरमोरी मार्ग अजूनही बंद

चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्री पावसाने उसंत घेतल्याने ब्रह्मपुरी तालुक्यात उद्भवलेली पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका आठ गावांना बसला होता. मात्र आता हळूहळू स्थिती सामान्य होताना दिसत आहे. ब्रह्मपुरी-आरमोरी हा मार्ग अजूनही बंद आहे. परंतु पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावरच आता वैनगंगा नदीच्या पाणी पातळीची वाढ अवलंबून आहे.

वर्ध्यात पावसाची विश्रांती, पण ढगाळ वातावरण कायम

वर्धा जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरण कायम आहे. वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे, पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. लाल नाला प्रकल्पातून पाणी पातळी नियंत्रित होण्यासाठी विसर्ग कायम असून, ४८.१ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूणच, वर्ध्यात स्थिती सामान्य होत आहे. सध्या पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी, काही ठिकाणी अजूनही पुराचा प्रभाव कायम आहे.