
महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, जालना, बीड आणि करमाळा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून आलेला घास हिरावला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून शहराकडे येणारे आणि शहरातून जाणारे रेल्वे आणि रस्ते मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे माढा आणि मोहोळ तालुक्यांमधील अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. माढा तालुक्यातील राहुलनगर, दारफळ आणि वाकाव येथे बचावकार्य सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही संततधार पावसामुळे झेंडूच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिवाळी आणि दसरा या सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून फुलशेती केली होती. मात्र, ढगफुटीसदृश पावसामुळे त्यांचे संपूर्ण पीक मातीमोल झाले आहे.
आता याबद्दल एका शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडली आहे. मी साधारण 1 एकरवर झेंडू लावला होता. त्यासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि 50 हजार रुपये स्वतः घातले. पण आता माझे पूर्ण पीक नष्ट झाले आहे. आता हे कर्ज कसे फेडायचे? सरकारनेच आम्हाला सांगावे की कर्ज फेडण्यासाठी आम्ही गांजा लावायचा का? असा सवाल शेतकऱ्याने केला आहे.
या शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांनी प्रत्यक्ष येऊन पिकांची अवस्था पाहावी अशी मागणी केली आहे. सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या पारंपरिक पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पारंपारिक पीक सोडून आम्ही नगदी पिकाकडे वळू लागलो आहेत. त्यामुळे आम्ही फुलशेती केली. पण आता सणासुदीच्या तोंडावर ढगफुटी झाल्यानंतर संपूर्ण झेंडू उद्घवस्त झाला आहे. दिवाळी आणि दसऱ्याला आम्हाला जे काही पैसे मिळणार होते, ते आता सर्व मातीमोल झाले आहे, अशी व्यथा एका शेतकऱ्याने मांडली आहे.