
सध्या सर्वच पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील आमदारांना विशेष कानमंत्र दिला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची पाच कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी पूर्ण ताकद देणार असल्याचे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी आमदारांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत प्रामुख्याने महापालिका निवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी वर्षावरील बैठकीत आमदारांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पाहिजे. यासाठी आमदारांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची पाच कामे सांगा असे आदेश दिले. तसेच प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघात तातडीने पूर्ण करायची पाच महत्त्वाची कामे ओळखावी. यामुळे जनतेशी थेट संपर्क साधता येईल, विकासकामे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता येतील, अशी सूचना केली आहे. स्थानिक समित्यांच्या वाटपाचे आणि नेमणुकांचे सर्व अधिकार आमदारांनाच दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेताना आमदारांना अधिक स्वातंत्र्य मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्या जिंकण्यासाठी मी स्वतः पूर्ण ताकद लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले. यामुळे पक्षामध्ये एकसंधता आणि विश्वास वाढीस लागेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, भाजप प्रदेश कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुंबई, विदर्भ, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही प्रमुख आमदार या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह संघातील काही प्रमुख पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ही बैठक काही वेळातच सुरू होणार असून, यात निवडणुकीच्या रणनीतीवर आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या सक्रिय भूमिकेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.