
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. येत्या २ डिसेंबरला यासाठी मतदान होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील अंधेरी, वांद्रे, शिवाजी पार्क, मातोश्री, शिवतीर्थ आणि शिवसेना भवन या ठिकाणी झळकत असलेल्या एका बॅनरमुळे नवा वाद उफाळून आला आहे. या बॅनरवर सावधान असा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा मजकूर यात पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक, असेही यात नमूद करण्यात आले आहे. या बॅनरच्या खाली उत्तर भारतीय सेना आणि त्यांचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देणे, असा या बॅनरमागील उद्देश असल्याचे बोललं जात आहे. उत्तर भारतीय मतदारांना एकत्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात फूट पाडणाऱ्यांविरुद्ध हा इशारा असल्याचेही बोललं जात आहे. राज्यात विशेषतः मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, निवडणुकीच्या काळात या घोषणांना विशेष महत्त्व प्राप्त होते.
दरम्यान उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांविरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तसेच न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र आता या बॅनरमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. आता यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.