मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार? हवामान विभागाचा अंदाज काय?
मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार एन्ट्री केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज १२-१३ जूनला मान्सूनचा पूर्ण प्रादुर्भाव असल्याचे सूचित करतो.

यंदा मे महिन्यापासूनच सर्वत्र अवकाळी पाऊस सक्रीय झाला आहे. त्यातच आता महाराष्ट्रात मान्सूनने सक्रीय होण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस.डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाऱ्याची गती सध्या मंदावली आहे. यावर्षी सरासरी १०६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, मात्र सर्वदूर पाऊस नसेल. राज्यात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज सानप यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये जोरदार पाऊस
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसानंतर आता रिमझिम पाऊस सुरू आहे. तर, दुसरीकडे अंधेरी, सांताक्रुज परिसरात कडक ऊन पडलं आहे. कांदिवली पश्चिम भागातही पाऊस कोसळत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र आता पावसाने जोर पकडला आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. कल्याण सदानंद चौक परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
पुण्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः चाकण आणि परिसरात, चार दिवसांच्या उसंतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे. दुसरीकडे, पुण्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी सरकारने एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक वीरेंद्र जगताप यांनी राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती दिली.
