
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतील आजचा रविवार खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरणार आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामुळे आज खऱ्या अर्थाने प्रचारासाठी शेवटचा रविवार असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. मुंबईतील शिवतीर्थावरील ऐतिहासिक सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, दुसरीकडे महायुती आपला वचननामा प्रसिद्ध करणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी आज शिवाजी पार्कवर एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळणार आहे. ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा आज पार पडणार आहे. या सभेसाठी शिवशक्ती असे लिहिलेले भव्य बॅनर शिवाजी पार्कवर झळकले आहेत. या दोन्ही भावांच्या या पहिल्या संयुक्त सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील सत्ता टिकवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा होत असताना, दुसरीकडे महायुतीनेही मुंबईसाठी कंबर कसली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महायुतीचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी कोणत्या नव्या घोषणा केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्याच्या इतर प्रमुख शहरांमध्येही आज दिग्गज नेत्यांच्या सभांचा पाऊस पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये जाहीर सभा घेऊन मतदारांना साद घालणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी ४ वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहिल्यानगरमध्ये आज दुपारी २ वाजता शहरात तोफ डागणार आहेत.
तसेच उपराजधानी नागपुरातही आज प्रचाराचा जोर दिसून येत आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान असल्याने आज प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे सुट्टीचा फायदा घेत उमेदवारांनी पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभांचे आयोजन केले आहे. थंडीचा कडाका असूनही नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपली रणनीती आखली आहे.