
राज्यातील महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजचा रविवार राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज राज्यातील २९ महापालिकांच्या प्रचारासाठी अनेक नेते हे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आज ठिकठिकाणी प्रचाराचा सुपरसंडे पाहायला मिळणार आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक वचननाम्यापासून ते अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भव्य रोड शोपर्यंत राजकीय वातावरण पूर्णपणे तापणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात पाऊल ठेवत असून, शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार गट) युतीचा संयुक्त वचननामा आज प्रसिद्ध होत आहे. तर दुसरीकडे, भाजपने अमरावती आणि नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.
आज दुपारी शिवसेना भवनात एक ऐतिहासिक सोहळा पार पडत आहे. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना भवनात एकाच व्यासपीठावर येत आहेत. मुंबईचा मराठी चेहरा आणि जागतिक दर्जाचा विकास यांचा समतोल साधणारा वचननामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे. यात १०० युनिट मोफत वीज, ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि महिलांसाठी विशेष सवलतींचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मांडलेल्या ‘रोडमॅप’वर आज दोन्ही पक्षप्रमुखांकडून शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच येत्या ६ जानेवारीला होणाऱ्या उद्धव-राज यांच्या संयुक्त मुलाखतीची अधिकृत घोषणाही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे.
विदर्भाच्या राजकारणात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. दुपारी १:३० वाजता पंचवटी चौक येथून फडणवीसांच्या या रोड शोला सुरुवात होईल. शेगाव नाका, राजकमल चौक, गांधी चौक मार्गे हा रोड शो साईनगरपर्यंत जाणार आहे. या रोड शोमध्ये हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी होत असून, महापालिका निवडणुकीसाठी प्रचारासाठी हा विशेष रोड शो असणार आहे.
नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सभेने प्रचाराचा अधिकृत प्रारंभ होणार आहे. आज दिवसभरात विविध प्रचार कार्यालयांचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून ते नाशिककरांना संबोधित करतील.
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. तेथे ते हत्या झालेले मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. या घटनेमुळे सोलापुरातील राजकीय वातावरण तापले असून अमित ठाकरेंच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आज सकाळी जुहू बीचवर फिरायला येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधला. कोविड काळात आम्ही जनतेसोबत होतो आणि गेल्या ११ वर्षांत भाजपने कोस्टल रोड, अटल सेतू यांसारखी मोठी कामे केली आहेत, असे सांगत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.