Maharashtra News LIVE : जालन्याच्या घनसावंगीत FDA ची झाडाझडती
Maharashtra News LIVE : मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा मेळावा पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीड, मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांचे ताजे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक येथे २१ केंद्रांवर होणार नीट परीक्षा
नाशिक येथील २१ केंद्रांवर उद्या रविवारी नीट परीक्षा होणार असून त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. एनटीएच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून उमेदवारांना योग्य प्रकारे परीक्षा देता यावी याची तयारी झाली आहे.
-
गेल्या १२ वर्षांत ६०,००० कोटी रुपयांची कर्जे माफ – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
गेल्या १२ वर्षांत ६०,००० कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ हप्त्यांमध्ये ४,२८,००० कोटी रुपये थेट हस्तांतरित केले आहेत, ज्यामुळे त्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळत आहेत. दुग्ध मंत्रालय आणि सहकार मंत्रालय निर्माण करून, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाच्या ग्रामीण विकासात सहकारी संस्थांच्या भूमिकेला पुनरुज्जीवित आणि मजबूत केले आहे असे गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरातील इचलकरंजी येथे जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले.
-
-
जालन्याच्या घनसावंगीत FDA ची झाडाझडती
राज्यात भेसळखोरांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईंचा धडाका सुरू केल्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या पथकाकडून आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव मध्ये येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने सात आस्थापनांशी अचानक तपासणी करत दहा अन्नपदार्थांचे नमुने संकलित केले, तपासणी करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये किराणा दुकाने,स्वीट मार्ट,दूध डेरी यांचा समावेश होता.दरम्यान अनेक ठिकाणी पथकाच्या धास्तीमुळे किराणा दुकाने आणि पान टपऱ्या बंद झाल्याचही दिसून येत आहे
-
गडचिरोलीमध्ये दहा हजार रुपयांच्या वादातून हत्या
गडचिरोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मरपल्ली गावात दहा हजार रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून एकाची हत्या झाली आहे. लक्ष्मण सोमा आलाम असं आरोपीचं नाव आहे, तर महेश ओडेला असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
-
निफाडच्या पूर्व भागात पावसाची हजेरी
निफाडच्या पूर्व भागात पावसाची हजेरी
गोळेगाव, मरळगोई, गोंदेगाव परिसरात पावसाच्या सरी
उकाड्याने त्रस्त नागरिकांना मिळाला दिलासा
शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत, पेरणीचा खोळंबा
-
-
उद्धव ठाकरे 27 जूनला यवतमाळ दौऱ्यावर
उद्धव ठाकरे 27 जूनला यवतमाळ दौऱ्यावर
पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
संजय देशमुखांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा यवतमाळ दौरा
शिवसेनेतील घडामोडींना वेग, ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची भेटी
-
भाईंदरमध्ये चहाच्या दुकानातून गॅस सिलिंडरची चोरी
भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक-६ परिसरात गॅस सिलेंडर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास दोन युवक ऑटो रिक्षाने घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी चहाच्या टपरीची रेकी केली. संधी मिळताच एका युवकाने टपरीत प्रवेश करून तेथे ठेवलेला गॅस सिलेंडर उचलला आणि तो ऑटो रिक्षामध्ये ठेवून घटनास्थळावरून पसार झाला.
-
उद्धव ठाकरे 27 जूनला यवतमाळ दौऱ्यावर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 27 जूनला यवतमाळ दौऱ्यावर असणार आहेत. य़ा दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. संजय देशमुखांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
-
KDMC च्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू
KDMC च्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ दगावल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. यानंतर रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला. हलगर्जी करणाऱ्या संबंधित डॉक्टर व स्टाफवर कठोर कारवाई करण्याची नातेवाईकांनी केली आहे.
-
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अवैध सिलेंडर आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अवैध सिलेंडर आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात भाजप नगरसेविक सुषम सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जोरदार आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी टर्मिनस परिसरात धाड टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर तसेच मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा उघडकीस आणला.
-
परभणी: मंदिर परिसराचे छत कोसळले, 6 जणांचा मृत्यू; 25 भाविक ढिगाऱ्याखाली अडकले
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर बांधण्यात येत असलेल्या सभागृहाचे छत अचानक कोसळले. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे20 ते 25 भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे
-
ओमराजेंबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. हा निकाल आल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचा विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांना सोबत राहायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील , असं अनिल देसाई यांनी सांगितलं.
-
पवनराजे हत्येच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस शाहांशी बोलले
पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्याने ओमराजे निंबाळकर यांना धक्का बसला. असं असताना त्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी केली आहे. दरम्यान, या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. निकालाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कोर्टाचा निर्णय दुर्दैवी असून हायकोर्टात न्याय मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
-
फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याने खळबळ उडाली आहे. फुटीर सहा खासदारांची राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. असं असताना उद्धव ठाकरे या सहा खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. दौऱ्याची सुरूवात ईशान्य मुंबईपासून केली जाणार आहे. सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमाने काम करा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
-
माझा राजकीय निर्णय दोन दिवसात घेणार- ओमराजे निंबाळकर
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर अजूनही त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट नाही. असं असताना ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय निर्णय दोन दिवसात घेणार असं जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत काहीच बोललो नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
-
सर्व आरोपी निर्दोष सुटत असतील तर हत्या कोणी केली? – ओमराजे निंबाळकर
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्यानतंर ओमराजे निंबाळाकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. वडिलांच्या हत्या प्रकरणात हायकोर्टात दाद मारणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं. तत्कालीन गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप देखील त्यांनी सांगितलं.
-
ओमराजे निंबाळकरांच्या बाणेर येथील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून इमारतीच्या बाहेरील दुकानांनाही बंद करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. इमारतीच्या बाहेरील गाड्या पार्किंग करण्यास ही पोलिसांकडून मनाई केली आहे.
-
घराच्या छतावर चढलेल्या मुलाला लागला शॉक
कल्याण पूर्व सूचक नाका परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या छतावर चढलेल्या मुलाला महावितरणच्या हायटेन्शन वायरचा शॉक लागला आहे. मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेली हायटेन्शन वायर महावीतरणने कोणतीही पूर्व कल्पना न देता सुरू केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
-
शिवसेना उबाठाच्या बंडखोर खासदाराला नोटीस
यवतमाळ येथील शिवसेना उबाठाच्या बंडखोर खासदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे. बैठकीस गैरहजर राहिल्या प्रकरणी मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 जूनच्या बैठकीस गैरहजर राहिल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी.
-
मला खात्री होती डॉक्टरांनी हत्या केली नव्हती- जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
मला शंभर टक्के खात्री होती डॉक्टर साहेबांनी हा खून केला नव्हता. निकाल लागला आनंदाची गोष्ट आहे. पहिला जो निकाल असतो तो महत्त्वाचा असतो. स्वीकृत दर्शनी पहिल्या निकालात का आलं पद्मसिंग पाटील निर्दोष मुक्त असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
-
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी महत्वाची बातमी
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी महत्वाची बातमी. कोकण रेल्वेची गणपतीसाठी आरक्षण प्रक्रिया 13 जुलैपासून सुरु होणार. गावी येणाऱ्या कोकणवासीयांनी नियोजन करावं, कोकण रेल्वेचे आवाहन
-
पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीचा धक्कादायक जबाब समोर
पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीचा धक्कादायक जबाब समोर. चिमुकलीची ओळख नसल्याचा दावा करत आरोपीने सर्व आरोप फेटाळले. मुलीला गोठ्यात नेताना पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याचा आरोपीचा दावा. लोकांच्या भीतीपोटी मुलीला तिथेच सोडून गेल्याचाही आरोपीचा दावा. चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती…
-
नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम
नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम. तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहणार. साधुग्रामासाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव
-
आधी शिंदेंचं नाव घेताना गट बोलावं लागायचं आता शिवसेना एकच- शाह
आधी शिंदेंचं नाव घेताना गट बोलावं लागायचं आता शिवसेना एकच. कोणताही गट शिल्लक नाही आता एकच शिवसेना. कोल्हापुरातील सभेत अमित शाहांचं वक्तव्य
-
शिंदेंच्या शिवसेनेने संजय राऊत यांच्या पोस्टरला मारले जोडे तर खासदार देशमुख यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
वाशिम मध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेकडून पाटणी चौक परिसरात प्रचंड घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं तर ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय देशमूख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. करण्यात आला.
संजय राऊत यांनी सहा खासदारांच्या बाबतीत वापरलेली भाषा त्यांना शोभत नसून हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातमुळं शिवसेनेत आलेत आम्ही त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. वाशिम मध्ये आल्यानंतर खासदार संजय देशमुख यांचे जोरदार स्वागत करू अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख विजय खानझोडे यांनी दिली. तर संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली असून कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हा प्रमुख रवि भांदुर्गे यांनी दिली. -
कल्याणमध्ये जमीन रजिस्ट्रेशन घोटाळ्याने खळबळ
कल्याणमध्ये जमीन रजिस्ट्रेशन घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसह ७ जणांवर फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मेलेल्या तीन व्यक्तींच्या बनावट सह्यांच्या आधारे कल्याण मधील उंबर्डेतील १२६ गुंठे जमीन रजिस्ट्रार कार्यालयात बनावट प्रतिज्ञापत्रे सादर करून खरेदीखत केल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला. तर तक्रारदार कुटुंबाशी आमचा कोणताही संबंध नाही, पैशांसाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर , पोलीस और दबाव टाकून गुन्हा दाखल केले असून न्यायालयात न्याय मागणार माजी नगरसेवक सुनील वायले यांनी आरोप फेटाळले हायप्रोफाइल जमीन प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांचा तपास सुरू आहे.
-
मी शब्द देतो की बंगाल मधून एक एक घुसखोरांना बाहेर काढतो- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मोदीजींनी रेकॉर्ड बनवला की देशातील सर्वाधिक जास्त काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे. या 12 वर्षात सोमनाथ ते गंगासागर आणि संपूर्ण देशात एनडीएचे शासन करत आहेत, आम्हाला म्हणायचे सगळीकडे जाऊ शकता पण पश्चिम बंगाल मध्ये कसे पोहोचणार. पण आम्ही पश्चिम बंगाल मध्ये पण सत्ता आणली. मी शब्द देतो की बंगाल मधून एक एक घुसखोरांना बाहेर काढतो, असे अभिवचन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.
-
वीज वितरण कार्यालयास ‘ताळे ठोको’ आंदोलन
जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे मोर्चा काढत वीज वितरण कार्यालयास ‘ताळे ठोको’ आंदोलन केले. खऱ्या लाभार्थी आदिवासी समाजाला योजनेपासून वंचित राहावे लागल असून सोलर कृषिपंप योजनेचा लाभ गैर आदिवासी व बोगस व्यक्तींना देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. आंदोलकांनी वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलकांनी उपकार्यकारी अभियंता एस.पी. परदेशी यांना निवेदन देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
-
महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे सुशोभिकरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारताचे कणखर, कर्मठ गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात आज मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले. आपले स्वप्न होते की महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे देशाचे आराध्य दैवत आहे यांचा विकास होण्याची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्याची सुरुवात आज झालीय. महाराष्ट्र आणि कोल्हापूरकराप्रमाणे दिल्लीतूनही मंदिराचा विकास होण्याबाबत इच्छा व्यक्त करत होते. कोल्हापूर मध्ये एवढे मोठे शक्तिपीठ आहे. पण त्याचा विकास होत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात पद्यसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. माफीचा साक्षीदारावर कोर्टाने संशय व्यक्त केला होता. २० वर्षांपूर्वी निंबाळकर यांची राजकीय वैरातून हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. कट करून पवनराजे यांची हत्येचा आरोप होता.
-
आज मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले – देवेंद्र फडणवीस
“भारताचे कणखर, कर्मठ गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात आज मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले. आपले स्वप्न होते की महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे देशाचे आराध्य दैवत आहे, यांचा विकास होण्याची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्याची सुरुवात आज झालीय. महाराष्ट्र आणि कोल्हापूरकराप्रमाणे दिल्लीतूनही अमित शाह मंदिराचा विकास होण्याबाबत इच्छा व्यक्त करत होते. कोल्हापूर मध्ये एवढे मोठे शक्तीपीठ आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
आता एकच शिवेसना-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
आता एकच शिवसेना आहे. आता कोणताही गट उरला नाही. पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे शिवसेना गट असे लिहावे लागत होते. आता कोणताही गट उरलेला नाही. आता एकच शिवसेना आहे अशी मोठी टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
-
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“शक्तीपीठाच्या आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाला आज सुरुवात होतेय. अमित भाईंच्या हस्ते या विकास कामाची सुरुवात होतेय. अमित भाई कोल्हापूर के दामादजी है. देशातील नक्षलवाद 2026 पर्यत संपवणार असे अमित भाईंनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते करुन दाखवलं आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
एकनाथ शिंदे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी नाव पुकारले गेले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांना सांगत एकनाथ शिंदे यांचा सत्कार करायला सांगितला. एकनाथ शिंदे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला गेला.
-
ओमराजे कोर्ट रुममध्ये, सत्र न्यायालयाबाहेर जमले शिवसैनिक
मुंबई सत्र न्यायालयाबाहेर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक जमले आहेत. कोर्ट रुमच्या आत बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. वडिल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ओमराजे कोर्टात आले आहेत.
-
आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनने ये-जा पण पुरावा नाही
कोर्टाकडून निकालाचे सविस्तर वाचन सुरु आहे. कोर्टाने तपासातील त्रुटींवर बोट ठेवलं आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनने ये-जा करण्यात आली. पण त्याचे पुरावे नाहीत. इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी राहिल्याचा पुरावा नाही असं कोर्टाने पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचं निकाल वाचनात म्हटलं आहे.
-
कोर्टाकडून पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचं निकाल वाचन
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचं निकाल वाचन कोर्टाकडून सुरु आहे. कोर्टाने तपासासाठी सीबीआयला फटकारलं आहे. तिसऱ्या नंबरचा आरोपी या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला. मोबाइल जप्त करणं आवश्यक होतं. पण तो केला नाही असं कोर्टाने म्हटलं. तपासातील त्रुटींवर कोर्टाकडून बोट ठेवण्यात आलं.
-
1 रुपया द्यायचा आणि 100 रुपये ओरबाडून घेतात – राज ठाकरे
1 रुपया द्यायचा आणि 100 रुपये ओरबाडून घेतात… लाडकी बहीण वरून देखील राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
-
सत्ता टिकावी म्हणून कोट्यवधी फेकून खासदार फोडले जातायत – राज ठाकरे
सत्ता टिकावी म्हणून कोट्यवधी फेकून खासदार फोडले जातायत. भविष्यातील पिढ्यांना काय सांगणार, आम्ही विकले गेलो? आपण आंदोलन करत राहणार आणि सत्ताधाऱ्यांच लक्ष SIR वर आहे… असं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केल आहे.
-
महाराष्ट्रात खासदार आमदार फोडले जात आहेत – राज ठाकरे
महाराष्ट्रात खासदार आमदार फोडले जात आहेत. प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. स्वाभिमान मेला ती उरतात फक्त जिवंत प्रेत… भाजपच्या सांगण्यावरून काही जणांचे असे प्रकार सुरु आहेत.. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
-
आधी कबूतर आणि आता पांढरे पट्टे – राज ठाकरे
जैनमुनी सगळीकडेच फिरत असतात. आधी कबूतर त्यानंतर आता पांढरे पट्टे… जैन समाज असा नाही… असं देखली राज ठाकरे म्हणाले
-
बिहार, प. बंगालमध्ये काय झालं, आपण पाहिलंय – राज ठाकरे
बिहार, प. बंगालमध्ये काय झालं, आपण पाहिलंय… SIR कडे दुर्लक्ष करु नका.. असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
-
पाण्याअभावी मिरचीचे पीक संकटात, टँकरच्या पाण्यावर पिके जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू,लाखो रुपयांचा खर्च
जून महिना अर्धा उलटून गेला आणि मृग नक्षत्रात सुद्धा पावसाने हजेरी न लावल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे, भोकरदन तालुक्यात यंदा मिरची ची लागवड मोठ्या प्रमाणात झाली मात्र सद्यस्थितीला पावसाचा एकही थेंब न पडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे, भोकरदन तालुक्यात वडोद तांगडा, पारध,रेणुकाई पिंपळगाव यासह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना टँकरच पाणी विकत घेऊन मिरची पिक जगविण्याची धडपड करत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी बांधव आता पावसाची प्रतीक्षा करत असून त्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
-
चांदवड नगरपालिका हद्दीतील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाचड वस्तीवर भीषण पाणीटंचाई
चांदवड नगरपालिका हद्दीतील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाचड वस्तीवर भीषण पाणीटंचाई भासत आहे. 300 ते 400 लोकसंख्या असलेल्या वस्तीला पाणीपुरवठा योजनेचा लाभ नाही… खडकातील झऱ्याच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवण्याची वेळ आले आहे, हंडाभर पाण्यासाठी दिवसभर उन्हात ताटकळण्याची वेळ आली आहे. रस्त्यांची दुरवस्थेमुळे टँकरही पोहोचू शकत नाहीत… बिबट्याच्या भीतीमुळे रात्री पाणी भरण्यासाठी कोणीही जात नाही… अशात प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे,
-
शिंदे गटाच्या वतीने खासदार संजय देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
वाशीम शहरातील पाटणी चौकात येथे शिंदे गटाच्या वतीने खासदार संजय देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी तर संजय राऊत यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन 12 वाजता होणार आहे.
-
भीमा नदीत सापडला तब्बल 25 किलो वजनाचा कटला मासा
भीमा नदीच्या पात्रात मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे हा मासा सापडला आहे. बेगमपूरच्या भागात पहिल्यांदाच एवढा मोठा मासा सापडल्याने मासा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पावसाने ओढ दिल्यामुळे नदीची पाणीपातळी कमी झालेली असताना देखील एवढा मोठा मासा सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-
सोशल मीडियावर शिंदे शिवसेनेकडून बंडखोर खासदारांच्या स्वागताच्या पोस्ट झळकल्या
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या स्वागत मतदार संघाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल हार्दिक स्वागत अश्या आशयाच्या पोस्ट व्हायरल. पोस्ट वर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे संजय राठोड यांचे फोटो
-
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे 17 वर्षीय तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला
हितेश सचिन ब्राह्मणे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव. रात्री 9 वाजेच्या सुमारास दत्तनगर येथील सिध्दार्थ कॉलनी परिसरातील घटना. अज्ञात 4 ते 5 जनांनी रस्त्यात अडवून युवकावर चाकूने केले वार. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी नाशिकच्या रुग्णालयात हलविले. श्रीरामपूर शहर पोलीसांकडून अधिकचा तपास सुरू. मागील भांडणाच्या कारणावरून युवकावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती…..
-
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्या, SIT चे महासंचालकांना पत्र
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येचा SIT च्या माध्यमातून तपास सुरू असुन अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. हे प्रकरण आता ‘सीआयडी’ कडे सोपवण्यात यावे असे पत्र एसआयटीने पोलीस महासंचालकांकडे पाठवले आहे. आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या एसआयटी ला पुरेसा वेळ मिळत नसल्याने आणि हत्येला मोठा कालावधी लोटला असल्याने तपासावर दीर्घकाळ काम करण्याची गरज आहे. यामुळे हा तपास आता सीआयडीकडे देण्यात यावा असे पत्र दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
-
पद्मसिंह पाटील रूग्णवाहिकेने कोर्टात दाखल..
आज पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात निकाल आहे. ओमराजे निंबाळकर कोर्टात पोहोचले. त्यांनी म्हटले की, आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. यादरम्यान पद्मसिंह पाटील थेट रूग्णवाहिकेने कोर्टात दाखल झाले.
-
राज ठाकरे आज मनसैनिकांना करणार संबोधित..
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यादरम्यानच राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राज्यातील सध्याच्या घडामोडींवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.
-
पद्मसिंह पाटलांचे वकील कोर्टात दाखल
आज तब्बल 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल लागणार आहे. यादरम्यान कोर्टात खासदार ओमराजे निंबाळकर दाखल झाले. यावेळी पद्मसिंह पाटलांचे वकील कोर्टात दाखल झाले. निकाल लागल्यावरच यावर बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले.
-
यवतमाळ- सोशल मीडियावर शिंदे शिवसेनेकडून बंडखोर खासदारांच्या स्वागताच्या पोस्ट
यवतमाळ- सोशल मीडियावर शिंदे शिवसेनेकडून बंडखोर खासदारांच्या स्वागताच्या पोस्ट झळकल्या. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या स्वागत मतदार संघाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल हार्दिक स्वागत, अश्या आशयाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. पोस्ट वर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे संजय राठोड यांचे फोटो आहेत.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा; कोल्हापुरात विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात असून ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत.
-
बंडखोर खासदारांचा ऑपरेशन टायगरनंतरचा पहिला फोटो समोर
बंडखोर खासदारांचा ऑपरेशन टायगरनंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोत अष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील हे शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मांसोबत फोटोमध्ये दिसत आहेत.
-
नाशिक – सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर
नाशिक – सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची बुलडोझर कारवाई, आज सकाळपासून पुन्हा एकदा अतिक्रमण काढायला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या अतिक्रमणावर अखेर बुलडोझर फिरवण्यात आला. वारंवार नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने कारवाई केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
बीड – माजलगाव येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा अंबुरे-सरोदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द.
बीड – माजलगाव येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा अंबुरे-सरोदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द. कुणबी जात प्रमाणपत्र दाखल करून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली, वार्ड क्रमांक एक मधून त्या निवडून आल्या होत्या. मात्र सुमन मुंडे यांनी आक्षेप घेत तक्रार केली, एकाच नोंदीच्या आधारे दोन आडनावाच्या लोकांना प्रमाणपत्र दिल्याचा त्यांनी दावा केला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सध्या रद्द करण्यात आलं आहे.
-
राजकीय विरोधक भाजप आमदार राणाजीसिंह पाटील यांच्या मतदारसंघात ओमराजेंच्या स्वागतासाठी बॅनर्स
धाराशिव – एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे राजकीय विरोधक भाजप आमदार राणाजीसिंह पाटील यांच्या मतदारसंघात तुळजापूर शहरात ओमराजे निंबाळकर यांचे शिंदे शिवसेना पक्षात स्वागताचे बॅनर लागले आहेत. वाघ चालला वाघाच्या कळपात असा मजकूर बॅनरवर आहे. शिंदे शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव या पदाधिकाऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचे बॅनर लावले .
-
NEET परीक्षेची पुणे पोलिसांकडून जोरदार तयारी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
NEET परीक्षेसाठी पुणे पोलिसांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पेपर फुटीमुळे रद्द झालेला NEET चा पेपर उद्या पुन्हा होणार आहे. NEET पेपर फुटी प्रकरणा नंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. उद्या होणाऱ्या NEET पेपर साठी मोठा पोलीस बंदोबस्त, पुणे पोलिसांकडून 1000 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. पुणे शहरात NEET परीक्षेचे एकूण 27 सेंटर्स असून सर्व सेंटरवर पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल.
-
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्यात आल्या नंतर धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील त्यांच्या घरासमोर तसेच धाराशिव शहरातील संपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे शिवसेना सोडून शिवसेने मध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे
पवन राजे मिंबाळकर हत्याकांडाची आज सुनावणी होणार असून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पवन राजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील होते. ओमराजे निंबाळकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा मेळावा पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार, राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर NEET परीक्षेसाठी पुणे पोलिसांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. उद्या देशभरात NEET ची पुनर्परीक्षा आहे. पेपर फुटीमुळे रद्द झालेला NEET चा पेपर उद्या पुन्हा होणार असून त्या पार्अशवभू्ीवर पोलीस अलर्ट असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.