Maharashtra News LIVE : विझलो आज जरी मी…; उमेदवारी डावलल्याने भाजप आमदार संजय केनेकर नाराज?

Maharashtra News LIVE Updates : शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

Maharashtra News LIVE : विझलो आज जरी मी…; उमेदवारी डावलल्याने भाजप आमदार संजय केनेकर नाराज?
Maharashtra News
| Edited By: | Updated on: Apr 29, 2026 | 10:08 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Apr 2026 10:06 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये भीषण आग

    छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याने भंगार गोदाम जळून खाक झालं आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांच्या मदतीने गेल्या तीन तासांपासून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र गोदामाचे मोठे नुकसान झालं आहे.  शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सकाळी पाच वाजल्यापासून धुमसत आहे.

  • 29 Apr 2026 09:57 AM (IST)

    नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा, अवघ्या १० दिवसांत ३ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा घटला

    नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणसाठ्यात वेगाने घट होऊ लागली आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये आता ४१.६१ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या १० दिवसांतच बाष्पीभवन आणि वाढत्या मागणीमुळे ३.४२ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. विशेषतः वाघाड आणि पुणेगाव धरणामधील साठा १० टक्क्यांच्या खाली आल्याने काही भागांत आतापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. सध्या जिल्ह्यात ६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, परिस्थिती पाहता जलसंपदा विभागाने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साठा काहीसा अधिक असला, तरी वाढते तापमान प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

  • 29 Apr 2026 09:47 AM (IST)

    नंदनवनवर हालचालींना वेग, एकनाथ शिंदे घेणार मंत्री आणि आमदारांचा क्लास

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी आपल्या नंदनवन या निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने आमदार आणि मंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. विविध विभागांतील प्रलंबित विकासकामे, सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती आणि आगामी काळातील राजकीय नियोजनावर या बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रशासकीय समन्वय मजबूत करणे आणि जनतेशी थेट संवाद वाढवण्याबाबत एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि कामांना गती देण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

  • 29 Apr 2026 09:37 AM (IST)

    विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही…; उमेदवारी डावलल्याने भाजप आमदार संजय केनेकर नाराज?

    भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक सूचक कविता पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने” आणि “छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी” अशा ओळी पोस्ट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाल्यानंतर पुन्हा उमेदवारी नाकारल्याने केनेकर यांनी या पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

  • 29 Apr 2026 09:27 AM (IST)

    महायुतीची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक, विधान परिषद उमेदवारी आणि अंतर्गत वादांवर होणार खलबतं

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती समन्वय समितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यत्वे विधान परिषदेसाठी महायुतीतील घटक पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावर सविस्तर चर्चा होऊन नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केवळ निवडणूकच नाही, तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली संजय गायकवाड प्रकरणे, आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद यांसारख्या अंतर्गत मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच महायुतीचे सर्व प्रमुख नेते या समन्वय बैठकीच्या निमित्ताने एकत्र येत असून, आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे.

  • 29 Apr 2026 09:17 AM (IST)

    नंदुरबार पोटनिवडणूक निकाल: ६७ ग्रामपंचायतींच्या ८० जागांसाठी आज फैसला

    नंदुरबार जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या ८० जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मतदारराजांनी ७१.१६ टक्के मतदानाद्वारे आपला उत्साह नोंदवला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, अवघ्या काही तासांतच गावगाड्याचा नवा कारभारी कोण होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. विशेषतः नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक आजी-माजी आमदारांच्या राजकीय प्रतिष्ठेची बनल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ७१ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, गावातील सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

  • 29 Apr 2026 09:07 AM (IST)

    नाशिक महापालिका सभापती निवडणूक, 4 ठिकाणी बिनविरोध निवड, तर 2 जागांवर हाय व्होल्टेज सामना

    नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला असून, ६ पैकी ४ प्रभागांमध्ये सभापतींची निवड बिनविरोध झाली आहे. यामध्ये नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर आणि नवीन नाशिक या प्रभाग समित्यांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित दोन जागांसाठी ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, तिथे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. नाशिक पूर्वमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे, तर नाशिक रोड प्रभागात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) एकमेकांसमोर ठाकले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप-शिंदे गट युतीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • 29 Apr 2026 08:55 AM (IST)

    व्यापाऱ्याची ५ लाख २० हजार रुपयांना फसवणूक..

    जळगावात एक लाख रुपयांचे ५ लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची ५ लाख २० हजार रुपयांना फसवणूक. शनिपेठ पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघांना अटक. अटकेतील आरोपींमध्ये वाशिम येथील पोलिस दलातील पोलिस अंमलदार असलेल्या कर्मचाऱ्याचा देखील समावेश. जगदीश शंकर व्यास या ५८ वर्षीय धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाराची फसवणूक झाली आ

  • 29 Apr 2026 08:50 AM (IST)

    खार परिसरात शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली १८.६९ लाखांची फसवणूक

    विकी वजूभाई बरेजिया ऊर्फ विकीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल. स्वतःला गुजरातच्या माजी खासदाराचा मुलगा असल्याचे सांगून विश्वास संपादन. ६ महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक उकळली. पैसे शेअरमध्ये न गुंतवता परस्पर अपहार; आरोपी फरार

  • 29 Apr 2026 08:40 AM (IST)

    भोंदू अशोक खरातचा आज SIT पुन्हा घेणार ताबा

    आठव्या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT आज न्यायालयात अशोक खरातचा ताबा मागणार. आज अशोक खरात याची पुन्हा होणार न्यायालयात सुनावणी. लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अशोक खरात याला मिळाली आहे 42 दिवस पोलिस कोठडी तर आता पर्यंत भोंदू अशोक खरात याच्यावर 19 गुन्हे दाखल

  • 29 Apr 2026 08:30 AM (IST)

    फेरीवाल्यांविरोधातील हतबलतेवरून उच्च न्यायालयाचे टीकास्त्र

    पोलीस कारवाई करू शकत नाहीत किंवा तसे अधिकार त्यांना नसल्याची हतबलता वारंवार व्यक्त करणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने मंगळवारी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. हतबलतेचा दावा करणाऱ्या सरकारला बेकायदा फेरीवाल्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाईचे अधिकार आहेत हे सांगण्याची वेळ न्यायालय किंवा लाजिरवाणे असल्याची टीका याचिकाकर्त्यांवर यावी, ही न्यायालयाने केली.

  • 29 Apr 2026 08:25 AM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय; सुनावणी थेट २०४६ पर्यंत तहकूब

    ९० वर्षीय याचिकाकर्तीने सामंजस्याने तोडगा काढण्यास नकार. मानहानीच्या वादावरून सोसायटी सदस्यांशी दीर्घकाळापासून वाद.  न्यायालयाचे निरीक्षण—“अहंकारामुळे न्यायव्यवस्थेत अडथळा निर्माण” बिनशर्त माफीने प्रकरण मिटू शकते, तरीही तडजोडीला नकार अशा प्रकरणांना प्राधान्य देऊ नये” असे न्यायालयाचे स्पष्ट मत. हट्टी भूमिकेमुळे खटला २० वर्षे लांबला; न्यायालयाच्या भूमिकेची जोरदार चर्चा!

  • 29 Apr 2026 08:19 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम, मोठी पाणीटंचाई

    नाशिक जिल्ह्यात 44 टँकर्स सुरू. 40 गावे आणि 87 पाड्यांना होतोय पाणीपुरवठा. एप्रिल महिन्यातच टँकर्स सुरू झाल्याने पाण्याची चिंता वाढली. कोकण खालोखाल पाणी टंचाईची तीव्रता नाशिक जिल्ह्यात वाढली. पाणी जपून वापरण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन. आणखी उन्हाळ्याचा एक महिना जायचा असल्याने प्रशासनाची चिंता वाढली..

  • 29 Apr 2026 08:00 AM (IST)

    विमानसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा इशारा

    अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून विमान इंधनाच्या (एटीएफ) दरांनी विक्रमी उसळी घेतल्याने विमान वाहतूक कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत ढासळणारा रुपया आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करणे अशक्यप्राय’ झाल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) म्हटले आहे. सरकारने तातडीने मदतीची पावले न उचलल्यास विमान वाहतूक बंद करावी लागेल, असा इशाराही या कंपन्यांनी दिला आहे. तसे घडल्यास ऐन उन्हाळी सुट्टीच्या हंगामात विमान वाहतूक विस्कळीत डोऊन प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

1 मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालक यांना मराठी सक्ती करण्यात आली. यादरम्यान ऑगस्टपर्यंत रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला. मराठी सक्तीचा मुद्द्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका सरकारवर केली. राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात बैठकाही झाल्या. याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Follow Us