Maharashtra News LIVE : अमेरिकेशी चर्चा नाही, संघर्ष सुरूच राहील… इराणचं स्पष्ट मत
Meta Description: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक इंधन संकट उद्भवले आहे. ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.

नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मंदिर परिसरात नकली साप आणि वाघाचे कातडे ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा. रिमोट कंट्रोल सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा. संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची उकळपट्टी करायचा. भोंदूबाबा बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागात विक्री करायचा. 100 रुपयांच्या वस्तूला 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विक्री करत गंडवायचा. नकली खडे आणि रत्ने दैवी असल्याचा दावा करत विक्री करायचा. तर डोंबिवली निळजे परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक अधिकाऱ्यांना कर्जदार आणि साथीदारांकडून बेदम मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ करून 19 व्या मजल्यावर अधिकाऱ्यांना नेऊन कोंडून ठेवत धमक्या दिल्याचा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना घेतलं आहे. दुसरीकडे जळगावच्या जैनाबाद परिसरात 500 रुपये न दिल्याने तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने वार केल्याने तरुणाचे आतडे बाहेर निघाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नितीन नाना काळे 35 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे.. यासह देश विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्षेत्रासह राज्यातील ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.
LIVE NEWS & UPDATES
-
मला मोजतबा खामेनी यांची हत्या नको आहे – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, मुज्तबा खामेनी जिवंत आहेत की नाही हे त्यांना माहीत नाही. पण मुज्तबा खामेनी यांची हत्या व्हावी अशी त्यांची इच्छा नाही. त्यांनी पुढे सांगितले की, इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखायचे आहे. त्यांना मध्य-पूर्वेत शांतता हवी आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, त्यांना एक करार हवा आहे. जर करार झाला, तर ते इराणचे युरेनियम घेतील.
-
अमेरिकेशी चर्चा नाही, संघर्ष सुरूच राहील… इराणने ट्रम्प यांचे वक्तव्य फेटाळले
इराणने ट्रम्प यांचे वक्तव्य फेटाळले आहे. अमेरिकेसोबत कोणतीही वाटाघाटी होणार नाही, असे इराणने म्हटले आहे. ट्रम्प आणि अमेरिका पुन्हा हरले आहेत. इराणच्या कठोर इशाऱ्यानंतर आणि हल्ल्यानंतर ट्रम्प मागे हटले. अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध सुरूच असल्याचे इराणने म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटले होते की, ते पाच दिवस इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करणार नाहीत.
-
-
एनडीएचे नेते लवकरच भेटणार आहेत, नारी शक्ती वंदन कायद्यावर चर्चा करणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एनडीएच्या संसदीय गटनेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक संसद भवनात लवकरच सुरू होईल. या बैठकीत एनडीएच्या मित्रपक्षांसोबत नारी शक्ती वंदन कायद्यातील सुधारणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
शरद पवार यांनी बोलवली महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, कारण काय?
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीनंतर स्नेहभोजन होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या बैठकीसाटी दाखल झाले आहेत.
-
माजी खासदार आणि भाजप ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अनंतात विलीन
माजी खासदार आणि भाजप ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अनंतात विलीन झाले आहेत. वर्धालगत असलेल्या पवनार येथे दत्ता मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.
-
कल्याणमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा विरोध?
कल्याणमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा विरोध पाहायला मिळत आहे.आधी हॉकर्स झोन जाहीर करा, मगच कारवाई करा, अशी भूमिका घेत मनसे फेरीवाल्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे.
यासाठी प्रभाग कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंगाच्या गजरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्या आलं.
तसेच एकीकडे नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे फेरीवाल्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे कारवाई करायची कीनाही? या संभ्रमात पालिका अधिकारी आहेत.
-
..तर आम्ही शिवसेना म्हणून पुढील निवडणूक स्वबळावर लढू: भरतशेठ गोगावले
राज्य सरकारमधील मंत्री भरतशेठ गोगावले यांनी साताऱ्यातील घटनेवरुन भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.
“सातारमध्ये जे काही केलं ते योग्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे”, असं भरतशेठ गोगावले म्हणाले.
“पुढच्या वेळी जर असा काही प्रकार घडला तर आम्ही शिवसेना म्हणून पुढील निवडणूक स्वबळावर लढू. तसेच आम्ही 60 चे 120 आमदार निवडून आणू, असा स्पष्ट इशारा भरतशेठ यांनी दिला.
-
माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
माजी खासदार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर काही वेळातच वर्धालगत असलेल्या पवनार येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. दत्ता मेघे यांचं वृद्धापकाळानं रविवारी निधन झालं.
-
भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर काही वेळातच वर्धा येथे अंत्यसंस्कार
माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर काही वेळातच वर्धा लगत असलेल्या पवनार येथे अंत्यसंस्कार होत आहेत. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
-
भोंदू अशोक खरात विरोधात आणखीन तीन गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यांची संख्या वाढली असून आणखी ३ गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे एकूण ६ गुन्हे नोंद झाले आहेत, लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
-
मालाड पश्चिम येथील नटराज मार्केटमधील आगीवर नियंत्रण
मालाड पश्चिम येथील नटराज मार्केटमध्ये आग लागल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
-
नाशिक : म्हाडा भूखंड प्रकरणात सोनू मनवानी याला न्यायालयीन कोठडी
म्हाडा भूखंड प्रकरणात सोनू मनवानीला नाशिक कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या भूखंड अपहर प्रकरणी सोनू मनवानी याला अटक झाली आहे. सोनू मनवानीवरील कारवाईनंतर इतर मोठ-मोठे बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
-
पुणे विद्यापीठातील सकाळचा नाष्टा बंद
आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजीची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे पुणे विद्यापीठातील सकाळचा नाष्टा बंद करण्याता आला आहे. कॅन्टींग चालकाने सांगितले की, गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सकाळचा नाष्टा आम्ही बंद केला आहे. काही खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना देत आहोत पण ते चुलीवर तयार केले जात आहेत.
-
सांगली : विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांची कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने
बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. लालबावटा कामगार संघटनेकडून कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत बांधकाम कामगारांच्या विविध शासकीय लाभासाठी करण्यात आलेले प्रलंबित अर्ज मंजूर करावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.
-
इचलकरंजीजवळ भीषण अपघात, 7 वर्षीय बालकाचा मृत्यू
इचलकरंजीहून कर्नाटकला जोडणाऱ्या मार्गावर बोरगाव गावाजवळ आज एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुटुंबाला जोरदार धडक दिल्याने सात वर्षांच्या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अब्दुललाट परिसरात संतापाची लाट उसळली असून वातावरणात शोककळा पसरली आहे.
-
बुलढाणा – रखरखत्या उन्हात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर
अंगणवाडी सेविका, मदतनीस या कर्मचाऱ्यांना मानधना ऐवजी किमान वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज रखरखत्या उन्हामध्ये अंगणवाडी कर्मचारी महिला रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळालं. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. यादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
-
वंचित, काँग्रेसचा नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने आज संयुक्तपणे नागपुरातील संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संघाच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी यांचे नाव एपस्टिन फाईल्समध्ये आलेले आहे, असा दावाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
-
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात माजी महापौर अलका केरकर यांना श्रद्धांजली
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात माजी महापौर अलका केरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर तसेच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अलका केरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
-
मिरा-भाईंदरमध्ये घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा, गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा
मिरा-भाईंदरमध्ये घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मिरा-भाईंदरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बुकिंग करूनही चार-चार दिवस सिलिंडर मिळत नसल्याने मीरा रोडच्या देव मोगरा गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. -
जालन्यात दोन गटात वाद, हाणामारीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जालना येथे बेकायदेशीर रेड्याच्या टकरीच्या वादातून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी सायंकाळी 3 आरोपींनी रवींद्र लाड या तरुणाला या वादातून चाकू आणि लोखंडी रॉड ने मारहाण करण्यात आली. या तरुणाला उपचारासाठी संभाजीनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले असून त्यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
-
उन्हाचा तडाखा वाढताच ग्रामीण भागात विहिरींनी गाठला तळ
उन्हाचा तडाखा वाढताच जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरी आणि छोट्या-मोठ्या तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली, मार्च महिन्यामध्ये पाणी पातळी मध्ये झपाट्याने घट होत असल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा धोक्यात आल्या असून त्यांना काटकसरीने पाण्याचा वापर करून झाडे जगवावी लागणार आहे, ग्रामीण भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जशी जशी वाढत आहे तशी तशी पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी टँकरची गरज भासू शकते.
-
शंभूराज देसाईंना धक्काबुक्की अतिशय निंदनीय- काकासाहेब कुलकर्णी
मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की अतिशय निंदनीय बाब आहे. शंभूराज देसाई यांनी भाजपवर जे आरोप केले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने विचार करण्याची वेळ आलीय. मंत्री देसाई यांनी भाजपची गुंडगिरी मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपचे कुकर्म लपवण्यासाठी एका चांगल्या अधिकाऱ्याचा बळी दिला हे मात्र नक्की असे काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.
-
इगतपुरी येथील सी एन जी पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा
इगतपुरी येथील सी एन जी पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पंपापासून ते महामार्गापर्यंत ही लांब रांग असल्याचे पाहायला मिळत आहे. सी एन जी गॅस चा तुटवडा असल्याने व विल्होळी येथील सी एन जी पंपाचे काम चालू असल्याने रांगा
-
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची निदर्शने
सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी शक्तिपीठ महामार्ग साठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही,अशी भूमिका देखील यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केली आहे.
-
अशोक खरातच्या संपत्तीत महसूलमधले अनेक अधिकारी भागीदार
भोंदूबाबा अशोक खरातच्या संपत्तीत महसूलमधले अनेक अधिकारी भागीदार आहेत. खरातला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी आणि त्याला टॉर्चर करू नका म्हणून महसूल मधील अधिकारी दबाव आणत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांचा आरोप.
-
माजी सैनिकाला जमावाची मारहाण
बीड शहरातील कालिका नगर भागात एका माजी सैनिकाला जमावाने मारहाण केली होती. तसेच अंगावर उकळता चहा ओतल्याचा आरोप केला जात होता. या घटनेत अद्याप पर्यंत आरोपीला अटक झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी आज थेट पोलीस अधीक्षक कार्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करत येत्या पाच दिवसात आरोपीला अटक न झाल्यास आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने कमी
धाराशिव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढताच मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा धरणातील पाणी पातळी उन्हाच्या तीव्रतेने कमी झालेली पाहायला मिळत आहे. समोर दोन ते अडीच महिने कडक उन्हाचे आहेत. आता तेरणा धरणामध्ये पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार 63 टक्के पाणीसाठा आहे.
-
भोंदूबाबा अशोक खरात याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता
भोंदूबाबा अशोक खरात याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आल्यानंतर आता त्याची काही उद्योग व्यवसायातही भागीदारी असल्याचं समोर आलं आहे. शिर्डीतील वॉटरपार्क शेजारी निमगाव शिवारात असणा-या कोट्यावधीच्या मालमत्तेत हा भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परीसरात असणा-या सिल्वर ओक या लॉन्समध्ये तो भागीदार आहे.
-
ठाणे – पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून बजेट सादर
पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत बजेट सादर केलं. ठाणे महापालिकेचे यंदाचे बजेट 6 हजार 231 कोटी असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बजेट मध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 5 हजार 645 कोटी रूपयांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला होता.
-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता हर्षवर्धन सदगीर दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी हजर
68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता हर्षवर्धन सदगीरने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. वाघोली येथील कुस्ती स्पर्धेत पैलवान महेंद्र गायकवाड याला पराभूत करत हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी ठरला होता. हर्षवर्धनर याने 2019 मध्ये पहिला महाराष्ट्र केसरी किताब जिंकला होता. आता तो महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासातील सातवा “डबल महाराष्ट्र केसरी” कुस्तीपटू ठरला आहे.
-
भोंदूबाबा अशोक खरात विरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक
भोंदूबाबा अशोक खरात विरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक. अशोक खरातला फासावर लटकवा आणि रुपाली चाकणकरला दोन नंबरचा आरोपी करा अशी मागणी करत काँग्रेस भवन बाहेर महिला आघाडीने निदर्शनं केली.
-
खरात प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे – मुख्यमंत्री फडणवीस
खरातच्या अटकेची कारवाई आधीपासूनच सुरू होती. त्याला बाहेर पळता येऊ नये म्हणून आधीच एनओसीदेखील काढण्यात आली होती. खरात प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे. याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्या सखोल निवेदन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या – विधानसभेत वडेट्टीवार आक्रमक
महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबा खरातचे पाय धुतात. महाराष्ट्राची लाज घालवली. भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या – विजय वडेट्टीवार यांची मागणी
-
खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका – राज ठाकरे
खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं. खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट
-
माझ्या भावाची हत्या भोंदूबाबा अशोक खरातने केली; नाशिकमधल्या शेतकऱ्याचा धक्कादायक आरोप
नाशिक- माझ्या भावाची हत्या भोंदूबाबा अशोक खरातने केली, असा धक्कादायक आरोप नाशिकच्या गवळाने गावातील शेतकरी विलास जाधव यांनी केला आहे. “त्यावेळी आम्ही पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. परंतु खरातचे संबंध मोठ्या लोकांशी असल्याने कारवाई झाली नव्हती. अशोक खरातने हडपलेल्या जमिनीच्या वादावर न्यायालय निर्णय देणार होतं. मात्र निर्णयाच्या दोन दिवस आधीच भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला,” असा दावा जाधव यांनी केला आहे.
-
मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन सुरू असून राजू शेट्टी, वैभव नाईक यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
-
चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस ठाणे हद्दीत चोरांचा धुमाकूळ, एकाच रात्री चोरीच्या दोन घटना
जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस ठाणे हद्दीत चोरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. दहिवद गावात एकाच रात्री दोन ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. दहिवद येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आहे. चोरट्यांनी बँकेची तिजोरी फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञात चोरट्यांनी बँकेतील सीपीयू चोरून नेला आहे. एका ग्राहक सेवा केंद्रातून चोरट्यांनी रोकड लंपास केली आहे. वारंवार घडणाऱ्या चोरींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
मुंबईतील चारकोप गावात आजसुद्दा एलपीजी सिलिंडरसाठी लोकांची लांबच लांब रांग
मुंबईतील चारकोप गावात आजसुद्दा एलपीजी सिलिंडरसाठी लोकांची लांबच लांब रांग लागली आहे. सकाळपासून चारकोप गावातील लोक एलपीजी सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत. चारकोप गावात पहिल्या दिवसापासून लोकांना एचपी गॅस सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार आहे. म्हणूनच इथले लोक रोज सकाळपासून गॅस सिलिंडरच्या प्रतीक्षेत रांगेत उभे राहतात.
-
सातारा ZP प्रकरणाची चौकशी होईल, त्यानुसार दोषींवर कारवाई होईल; फडणवीसांचं आश्वासन
“उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. सातारा जिल्हा परिषदेच्या राड्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता.
-
मतदानापासून कुणाला वंचित ठेवू नका, असं मी म्हटलं होतं; सातारा ZP मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची माहिती
विधान परिषदेपाठोपाठ विधानसभेतही सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे. मतदानापासून कुणाला वंचित ठेवू नका, असं मी म्हटलं होतं. मी पोलीस अधिक्षकांना फोन केला.”
-
धनगर समाजाच्या आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेसमोरील रस्ता अडवला
धनगर समाजाच्या आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेसमोरील रस्ता अडवला आहे. धनगर आरक्षणावरून मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी आंदोलक करत आहेत. तर पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
ठाणे पालिकेचा रेंटल हाऊसिंगमधील रहिवाशांना मोठा धक्का, १४०० कुटुंबे बेघर होणार?
ठाणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या रेंटल हाऊसिंग इमारतींमधील सदनिका पुन्हा पालिकेकडे जमा करण्याबाबतच्या नोटिसा स्थावर मालमत्ता विभागाने बजावल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः वर्तक नगर प्रभाग समिती परिसरातील अनेक लाभार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे सांगत महासभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट फटका पुनर्वसन करण्यात आलेल्या सुमारे १४०० कुटुंबांना बसणार असून, त्यांना बेघर होण्याची भीती सतावत आहे. पालिकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक या नोटिसा बजावल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, हक्काच्या घरासाठी आता हे रहिवासी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
-
पुणे-नाशिक महामार्गावर कार-लक्झरी बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरजवळ असलेल्या एकलहरे येथे रात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने एका लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि आजी अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमी बालकांना तातडीने मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकलहरे परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने या धोकादायक वळणावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
-
नाशिकमध्ये भोंदू बाबाचा पर्दाफाश, प्रॉपर्टी डीलर्सच्या नावाखाली काळे धंदे
नाशिकच्या अतिशय मोक्याच्या असलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरात ‘प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स’ अशी पाटी लावून स्वतःचे कार्यालय चालवणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश झाला आहे. हे कार्यालय केवळ जमिनीच्या व्यवहारांसाठीच नाही, तर भक्तांना बोलावून त्यांच्यावर आघोरी विद्या वापरण्यासाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच कार्यालयामध्ये कोट्यवधींच्या जमिनींचे सौदे केले जात असताना दुसरीकडे भक्तांना दहशतीखाली ठेवून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून हे कार्यालय बंद असून, परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने येथे भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आघोरी कृत्ये चालवली होती. सध्या या प्रकरणाने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
धुळे जिल्ह्यात ६३ टक्के पाणीसाठा शिल्लक; वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला
धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये सध्या ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण १२ मध्यम आणि ४५ लघु प्रकल्प असून, मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के साठा उपलब्ध आहे. विशेषतः जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या अक्कलपाडा धरणामध्ये सध्या ७३ टक्के साठा असून, वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे या साठ्यात वेगाने घट होत आहे. ही परिस्थिती पाहता, येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, सुमारे २५६ कोटी रुपयांचा विशेष टंचाई आराखडा तयार केला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
-
सर्व मंत्र्यांसाठी सरकारने एक विशेष शिबीर आयोजित करावे, संजय राऊतांचा सल्ला
ज्या मंत्र्यांचा स्वतःवरचा विश्वास ढळला आहे आणि जे अशा बुवा-बापूंच्या आहारी गेले आहेत, त्या सर्व मंत्र्यांसाठी सरकारने एक विशेष शिबीर आयोजित करावे, असा उपरोधिक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
-
भविष्यात खरातलाही भाजपमध्ये प्रवेश देऊन शुद्ध करून घेतले जाईल – संजय राऊत
महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा आहे, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच अशा प्रवृत्तींना उत्तेजन दिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजपने वारकरी संप्रदायाला राजकारणात ओढले असून, भविष्यात खरातलाही भाजपमध्ये प्रवेश देऊन ‘शुद्ध’ करून घेतले जाईल, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचे रास्ता रोको आंदोलन
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नांदगाव येथे होणार आंदोलन. जोपर्यंत नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही. मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन शेतकरी करतील. जिल्हा प्रशासनाने 700 लोकांना नोटीसा दिल्या असल्या तरी आम्हाला फरक पडत नाही आम्हाला अशा पद्धतीचे गुन्हे नवीन नाहीत यापूर्वी सुद्धा आम्ही अनेक गुन्हे दाखल करून घेतले आहे राजू शेट्टी यांचा इशारा
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न ऐरणीवर
शहरातील क्रांती चौक परिसरात सुरू असलेल्या ऑटो एलपीजी गॅस समोर ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा. शहरातील मुख्य रस्त्यावर लागल्या जवळपास एक किलोमीटरच्या दुहेरी रांगा. ऑटो एलपीजी गॅसच्या दरात 35 रुपये दरवाढ होऊनही गॅस मिळत नसल्याने ऑटो चालक अडचणीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ एकच ऑटो एलपीजी गॅस सुरू असल्याने गर्दी
-
पोलिसांना समोर करून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न- हर्षवर्धन सपकाळ
पण आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार आहे कुठलाही हिंसक प्रकार आम्ही करणार नाही. मोहन भागवत यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजेत आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं एवढा पोलीस बंदोबस्त लावण्याची काय गरज.
-
भोंदू अशोक खरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मिरगाव येथील फार्म हाऊसवर
मिरगाव परिसरात अनेक वर्षे दहशत निर्माण केल्याचा आरोप…सकाळी दहा ते बारा किलोमीटर सायकलिंग करत होता. सायकलिंग करतेवेळी कंबरेला बंदूक लावून फिरत असल्याची स्थानिकांची माहिती…दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, खोटे गुन्हे दाखल केल्याचेही आरोप…तर कालच त्याच्या फॉर्म हाउस येथील वॉचमन, कर्मचारी, मंदिराच्या पुजाऱ्याची चौकशी करण्यात आली
-
खरातचा विषय अधिवेशनात गाजण्याची शक्यता
नाशिकचा भोंदूबाबा खरात याचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. घरात याच्या विरोधात तक्रार करण्याकरिता अनेक महिला पुढे आल्या आहेत.
-
नवापूर शहरात धक्कादायक घटना
नवापूर शहरात एक अनोखी आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. बस स्थानकासमोर असलेल्या एका निंबाच्या झाडातून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अगरबत्तीप्रमाणे धूर निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, काहीजण याकडे दैवी चमत्कार म्हणून पाहत आहेत. झाडाच्या शेंड्याकडून अचानक धूर निघताना दिसल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. अनेकांनी श्रद्धेने या घटनेकडे पाहत दर्शनासाठीही गर्दी केली. मात्र, यामागे वैज्ञानिक कारण असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. परंतु झाडाच्या बुंध्याजवळ बाबाचा दर्गा असून, तेथे नियमितपणे दिवाबत्ती आणि अगरबत्ती लावली जाते. याच आगीमुळे झाडाच्या आतील भागात हळूहळू आग लागून ती काही दिवस साचत राहिली आणि अखेर शेंड्याकडून धूर बाहेर येऊ लागला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट
शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संस्थानचे अध्यक्षपद भोंदू अशोक खरातकडे होते. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती केली होती. खरातने पत्नी आणि निकटवर्तीयांना विश्वस्तपदी बसवले होते. रुपाली चाकणकरही या संस्थानवर ट्रस्टी होत्या. विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्येच संपल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केला होता. खरात अटकेत गेल्यानंतर विश्वस्त मंडळाचा फलकही गायब झाला आहे. SIT कडून संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंदिर संस्थानमधील कारभार आणि आर्थिक व्यवहारही तपासाच्या रडारवर आहेत.
-
सोलापुरात प्रियकर आणि महिलेने केलेल्या सामूहिक बलात्काराची तक्रार खोटी ठरली
तक्रारदार महिला आणि प्रियकराचा कट पोलिस तपासात उघड झाल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी आरोपी प्रियकरावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीवर दबाव आणण्यासाठी हा बनाव रचला होता. यामध्ये आरोपी प्रियकर आणि प्रेयसीने डायल 112 वर कॉल करून माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सीडीआर तसेच सीसीटीव्हीची तपासणी केली असता ही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी प्रियकर आणि महिलेवर भारतीय न्याय संहिता कलम 248, 217, 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. विजापूर नाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आज मवीआ आमदारांसोबत डिनर डिप्लोमेसी
शरद पवार यांची मवीआ कडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्ताने आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमेसी चा आयोजन करण्यात आल आहे. आज संध्याकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये डिनर डिप्लोमेसीचा आयोजन करण्यात आलं. या डिनर डिप्लोमेसी मध्ये काही राजकीय चर्चा होणार का हे पाहण महत्वाच आहे…
-
तुळजाभवानी मातेचा चैञ पोर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार साजरा
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा चैञ पोर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे. या कालावधीत तीन दिवस तुळजाभवानी मंदीर २२ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. तर ३१ मार्च ते २ एप्रिल कालावधीत मंदीरात छबिन्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. चैञ उत्सव कालावधीत राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
-
भोंदू बाबा अशोक खरात आणि पोपटराव पवार यांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर पोपटराव पवारांचा खुलासा
भोंदू बाबा अशोक खरात आणि पोपटराव पवार यांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर पोपटराव पवारांनी मोठा खुलासा केला आहे. 2012 साली हिवरे बाजार येथील मंदिराच्या जिर्णोद्धराचे जे काम हाती घेतले त्याच कामगारांनी अशोक खरातच्या ईशान्येश्वराच्या मंदिराचे काम केले. त्यामुळे घराचा संपर्क आला होता, त्यानंतर कुठलाही संबंध आला नाही. मंदिराच्या व्यतिरिक्त कुठलाही संबंध आला नाही, भोंदूगिरीशी आमचा कुठलाही संबंध नाही…
-
श्री तुळजाभवानीला ‘वारा घालण्याच्या’ पारंपरिक सेवेची सुरुवात
श्री तुळजाभवानी मंदिर येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ‘पंख्याने वारा घालण्याची’ पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा हलवून सेवा करण्यात येते. देवीला लिंबू सरबत, फळे व पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून मखमली पंख्याचा वापर
ही मानाची सेवा पारंपरिकरित्या तुळजापूरातील पलंगे कुटुंबाकडे असून, अनेक पिढ्यांपासून ती अखंड सुरू आहे. मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार आहे. -
शिंदे शिवसैनिकाची ठाकरे यांचे आमदार सिद्धार्थ खरात यांना थेट धमकी
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिंदे यांच्या शिवसेना चे एका शिवसैनिकाने पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाषा वापरत ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना थेट धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.. “कोणीही असू द्या, आमदारालाही ओढून मारू,” असे धक्कादायक वक्तव्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.. सदर पत्रकार परिषदेत बोलताना संदीप तठ्ठे यांनी आपल्या शिंदे सेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे .. “आमच्यावर आधीच २५-२५ गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही,” असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले. या भडक वक्तव्यामुळे मेहकरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे… या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
धुळे शहरातील पवन नगर हुडको येथे पोलिसांची कारवाई..
धुळे शहरातील पवन नगर हुडको येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. मध्यरात्री पोलिसांच्या केलेल्या कारवाईत 500 किलो गांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चाळीसगाव रोड येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. पवन नगरातील अत्यंत लहान घरामध्ये खोक्यामध्ये पॅक केलेला गांजा आढळला. तब्बल पाचशे किलो गांजा पकडणारे तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
-
सिलेंडर तुटवड्यामुळे रॉकेल पुरवठा सुरू करण्याचे धोरण , बंद झालेले रॉकेल पुन्हा सुरू होणार
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून ग्रामीण भागात रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार ग्रामीण भागात 45 दिवस घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य असलेल्या सुमारे 7 लाख 24 हजार कुटुंबांना रॉकेल पुरवठा होणार. जिल्हा पुरवठा विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झालं आहे. आज जिल्हा प्रशासन आणि राज्य पुरवठा विभाग यांच्यात कॉन्फरन्सद्वारे अंतिम धोरण निश्चित होणार आहे.
-
KDMC स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
KDMC मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. सभापती शर्यतीत शेट्टी–म्हात्रे–भोईर गायकवाड आमनेसामने उभे असून ‘लाडकी बहीण’ ठरणार गेमचेंजर? मल्लेश शेट्टी, विकास म्हात्रे, जयवंत भोईर यांची थेट स्पर्धा रंगणार आहे. महेश गायकवाड यांचाही युवा चेहरा म्हणून दावेदारीत सहभाग आहे. सर्व इच्छुकांनी प्रतिष्ठा पणाला लावत लॉबिंगला सुरुवात केली आहे. ठाणे, मुंबई ते दिल्लीपर्यंत भेटीगाठींना वेग आलं आहे. मात्र पुरुषांची रस्सीखेच पाहता नाराजी टाळण्यासाठी KDMC मध्ये ‘लाडकी बहीण’ म्हणून विजया पोटे नाव चर्चेत आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे… असं सूचक विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.