Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 23, 2021 | 4:11 PM

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू
Follow us on

रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खलन होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 72 वर गेला आहे. (11 killed, 13 injured in landslide in Raigad’s Poladpur taluka)

महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र आज पहायला मिळत आहे. त्यात रायगड जिल्ह्यात महाड आणि पोलादपूर तालुका, रत्नागिरीच्या चिपळूण आणि खेड तालुक्यात, तर साताऱ्यातील आंबेघरमध्ये एक दुर्घटना घडली आहे. तर साताऱ्याच्या वाईमध्ये 2 महिला वाहून गेल्याची घटना घडलीय. तर चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरमधील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे राज्यात आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

कुठे किती मृत्यू?

अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील ८ रुग्णांचा मृत्यू
तळीये, महाड – 38 मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – १२ जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू

महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त

महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 36 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

तिकडे साताऱ्यातही भीषण दुर्घटना घडली. मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. यात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दोन गावात अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली

चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेडमधील धामणंदच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत यंत्रणा सज्ज, शिरगावला पाण्याचा वेढा, 1200 लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु – जयंत पाटील]

Maharashtra Chiplun Landslide : चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती, खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली

11 killed, 13 injured in landslide in Raigad’s Poladpur taluka