Maharashtra Rain Forecast : गरज असेल तरच बाहेर पडा, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Forecast : गरज असेल तरच बाहेर पडा, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2025 | 5:28 PM

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विजांचा कडकडाट आणि ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यानं या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.  सोलापूरमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुण्यात पावसाचा हाय अलर्ट  

दुसरीकडे पुणे जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाची शक्यात आहे, हवामान विभागाकडून जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट तर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासह घाट माथ्यावर देखील पावसाचा जोर वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

सोलापुरात पावसाला सुरुवात  

सोलापुरात आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, सध्या शहरात तुफान पाऊस सुरू आहे, सलग तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस सुरू असल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत, संपूर्ण शहर जलमय झालं आहे. शहरातील साखर पेठ,  मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे.

दुसरीकडे धाराशिवमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे,  आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा धो-धो कोसळत आहे. धाराशिव, तुळजापूर आणि येरमाळा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मात्र या पावसामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यात हवमान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.