वर्धा, अमरावतीत पावसाच्या धारा, काही ठिकाणी उन्हाच्या झळा, राज्यात कुठं काय घडलं?
वळवाच्या पावसाने वातावरणातील धग काहीशी कमी केली आहे. काही ठिकाणी वादळी वारेदेखील पाहायला मिळाले. तर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. उष्णतेची ही लाट आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात शेतकऱ्यांना आता मान्सूनचे वेध लागले आहे. राज्यात कधी पाऊस दाखल होतो आणि कधी पेरणीला सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरीदेखील पेरणीअगोदरच्या मशागतीच्या कामाला लागले आहेत. अगोदर 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता हा अंदाज चुकीचा ठरला आहे. आता मान्सून येण्यास थोडा उशीर लागणार आहे. परंतु त्याआधी राज्यात काही ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. वळवाच्या पावसाने वातावरणातील धग काहीशी कमी केली आहे. काही ठिकाणी वादळी वारेदेखील पाहायला मिळाले. तर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. उष्णतेची ही लाट आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात कुठे पाऊस झाला आणि कुठे उन्हाचा कहर पाहायला मिळाला, ते जाणून घेऊ या.
विदर्भात उष्णतेची लाट ओसरणार
विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र पाहायला मिळाली आहे. उद्यापासून म्हणजेच 29 मे रोजीपासून तापमान घटण्याचा अंदाज असला तरी आजही दाहकता पाहायला मिळाली. आज वर्धा जिल्हा राज्यात सर्वाधिक तापमानासह अव्वल ठरला असून तब्बल 46 पूर्णांक 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही पारा 46 पूर्णांक 4 अंशांवर पोहोचला. गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्येही तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झाले. हवामान विभागानं पुढील काही दिवस उष्णतेची लाट हळूहळू कमी होत, तापमान घटणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
वर्धा जिल्ह्यातील सेलू, घोराड परिसराला मान्सूनपूर्वी पावसासह वादळाचा तडाखा पाहायला मिळाला. काही ठिकाणी घरांचे, तसेच गोठ्याचे टीनपत्रांचे छत उडाल्याची माहिती समोर आली आहे. घोराड येथे जोरदार हवेमुळे उडालेला पलंग थेट विद्युत खांबाला जाऊन अडकल्याचे पाहायला मिळाले. जोरदार हवेमुळे केळी पिकाचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. विद्युत तारा तुटल्यानेही काही भागात विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे.
अमरावती शहर आणि जिल्ह्यात पाऊस
अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जीव घेण्या उकाड्यानंतर अमरावतीत पावसाच्या सरी आल्या आहेत. अमरावतीत ग्रामीण भागात गारपीटसह पाऊस काही ठिकाणी पाऊस पडला आहे. तब्बल महिनाभराच्या उकाड्याने नंतर आज अमरावती जिल्ह्यात पावसाने तात्पुरता दिलासा दिला आहे. सायंकाळी अमरावती शहर आणि जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडासह रेवसा येथे गारपिटीसह पाऊस झाला आहे.