महाराष्ट्र थांबणार नाही, आता प्रत्येक जिल्ह्यात… देवेंद्र फडणवीसांनी मांडला प्रगतीचा रोडमॅप
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणि ठाण्यातील जागतिक दर्जाच्या व्ह्यूइंग टॉवरसह राज्याच्या विकासाचा नवा संकल्प सोडला.

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आत्मविश्वासपूर्ण रोडमॅप मांडला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून भारताच्या विकासाचे इंजिन आहे. आगामी काळात ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल,” असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याच्या चौफेर विकासाचा आणि जनहितकारी योजनांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहणानंतर राज्यातील आणि जगभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने संविधानाचे महत्त्व आणि आर्थिक प्रगतीवर भर दिला. जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही चिरायु होवो, अशी प्रार्थना करतो. २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारताचे संविधान हे अंगीकृत केले. त्यातून एक लोकशाहीप्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग
आपला महाराष्ट्र संतांची वीरांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये आज आपण देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र चांगलं काम करत आहे. नुकतंच दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहिल. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम तर तो महाराष्ट्राच्या सर्व भागात आज गुंतवणूक येत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण असो सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होतात. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम हे सरकारच्या माध्यमातून सुरु आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
महाराष्ट्रातील आमचा शेतकरी सुखावला पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली. ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत सरकारच्या वतीने झाले. त्यानंतर आता पुढच्या काळात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहेत. नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पाणी दिले. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र विविध विक्रम करताना दिसत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग हा देखील तयार होत आहे. आदिवासी अनुसुचित जातींकरिताही विकासाच्या विविध योजना केल्या जात आहेत. अशाप्रकारच्या विविध योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून सुरु आहे. निश्चित येत्या काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल, असाही विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतीशील राहील आणि भारताच्या संविधानाने जी व्यवस्था आम्हाला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र सातत्य़ाने प्रगतीकडे झेपावत राहील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शहराची नवीन जागतिक ओळख होईल – एकनाथ शिंदे
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत ‘सामान्यांच्या राज्याचा’ गौरव केला. ठाणे येथे बोलताना त्यांनी विविध विकासकामांची घोषणा केली. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच झोपडपट्टी मुक्त शहरे आणि मेट्रोचे जाळे विणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ठाण्यात २६० मीटर उंचीचा ‘व्ह्यूइंग टॉवर’ उभारला जाणार असून तो शहराची नवीन जागतिक ओळख ठरेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
