कुठलाही रंग कोणाच्या बापाचा..; मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावर सयाजी शिंदे यांची रोखठोक प्रतिक्रिया
मुंब्रा इथून महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर AIMIM च्या सहर युनूस शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुंब्रा हिरवा करणार, असं तिचं वक्तव्य होतं, त्यावर आता सयाजी शिंदे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

“कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही, सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहे,” अशी रोखठोक प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. निसर्गामध्ये सगळे रंग आहेत आणि ते कोणाला आव आणून तयार करता येत नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा इथून निवडून आलेल्या 22 वर्षीय सहर शेखने विजयानंतर दिलेल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाकडून निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेखने विरोधकांना बरेच टोमणे मारले होते. इतकंच नव्हे तर मुंब्र्याला पूर्णपणे हिरव्या रंगाने रंगवून टाकू, असं वक्तव्य तिने केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी थेट निसर्गाचा संदर्भ दिला.
महापालिकेतील विजयानंतर सहर शेख म्हणाली, “येत्या पाच वर्षांत निवडणुकीत त्यांना आणखी मोठं उत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्र्याला इतक्या हिरव्या रंगाने रंगवायचं आहे की त्यांना वाईटरित्या पराभूत व्हावं लागेल. पाच वर्षांनी प्रत्येक उमेदवार एआयएमआयएमचा असेल, कारण या निवडणुकीत तुम्हाला मजलिसची शक्ती समजली आहे. ही शक्ती अल्लाहने आपल्याला दिली आहे.” तिच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली होती.
जुन्नर तालुक्यात सयाजी शिंदे देवराईच्या कामानिमित्त पोहोचले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरू करतोय. संतांचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या एक हजार झाडं लावली असून आणकी 10 हजार झाडं लावायची आहेत. नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या कापणीबाबत कायदेशीर कारवाई केली आहे. तपोवनची जागा सोडून त्यांना कुठे कुंभमेळे करायचं असेल तिथे करावा. कुंभमेळा हीसुद्धा चांगली परंपरा आहे, मात्र झाडांची परंपरा ही त्यापेक्षाही चांगली आहे. मला राजकारणातलं काही कळत नाही आणि त्यात रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण चालू आहे आणि ते आजही चालत आलंय. आज काय नवीन नाही.”
