
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. यंदाचा मान्सून कोकणात दाखल झाला आहे. याच कारणामुळे मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतही पाऊस झाला आहे. असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
आगामी काळात पावसाची स्थिती काय असेल, हे टीव्ही 9 मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पुण्यातील हवामान खात्यातील तज्ज्ञांशी टीव्ही 9 मराठीने बातचित केली. यावेळी कालपर्यंत (25 मे) रत्नागिरी जिल्ह्यातील देवगडपर्यंत मान्सुनचा प्रवास दिसून आला आहे. आज मान्सून मुंबईपर्यंत दाखल झाल्याचं दिसून आलं. बंगालच्या उपसागरात येणाऱ्या 24 तासांत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात मान्सून जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाच्या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबई, रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यांत पाऊस झाला आहे. यात अहिल्यानगर आहे. सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांतही पाऊस झाला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांत अगोदरच पाऊस झाला आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसांत कोकणात चांगल्या पवसाची शक्यता आहे, असं भाकितही या अधिकाऱ्यांनी व्यक्तं केलं. सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा तसेच घाटमाथ्यावरही येणाऱ्या चार ते पाच दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांतही यलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, आजदेखील मुंबई तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसतोय. मुंबईत अनेक स्थानकांवरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. सोबतच भुयारी मेट्रोंमध्येही पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनाही योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.