
मे महिन्याच्या मध्यात असतानाच महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून सुटका होत असली तरी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मुसळधार पावसाचे आगमन झालं आहे. उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहरासह जिल्हाभरात पावसामुळे दिलासा मिळालाय. पाण्याअभावी अनेक शेती पिके जळून जाण्याच्या मार्गांवर होती. मात्र अवकाळी पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. मागील महिनाभरात उन्हाचा पारा सातत्याने वाढलेला पाहायला मिळाला होता. त्यातच 44 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झालेली होती. मात्र आज झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
नाशिकच्या येवल्यातही पाऊस झाला. येवला शहरासह परिसरात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकाडाटासह 10 ते 15 मिनिटे पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. येवल्यात आठवडे बाजार असल्याने अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
शिरूरमधल्या मांडवगण फराटा इथं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मांडवगण फराट्यातील शेतकरी राजेंद्र मारूती घाडगे यांची अवकाळी पावसाने तीन एकर केळी भूईसुपाट झाली आहे . एकूण ३ हजार पाचशे केळीची झाडे होती केळीला फळे लागली होती. शेतकऱ्यांचे केळीच्या बागाचे 13 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. तरी शासनाने नुकसान भरपाई लवकर द्यावी . केळी, ऊस, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागामध्ये शासनाने पंचनामा सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे
सातारा पाटण चाफळसह विभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढलं. तर चाफळ इथल्या समर्थनगरमध्ये अशोक पांडुरंग साळुंखे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने उभे झाड पेटलं.
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पाऊस झाला. अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. या अवकाळी धान पिकाला फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील या पावसाने धान पीक असला नुकसान होण्याची पुन्हा चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय.