
राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होत आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या राजकारणात एक मोठी महत्त्वाची राजकीय घडामोड घडल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून नागपूरला एकाच चार्टर विमानातून प्रवास केला. ज्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा संदेश देण्यात आला.
सध्य देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली इंडिगो एअरलाईन्स विस्कळीत झाली आहे. इंडिगोच्या अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही फ्लाईट्स या उशिराने उड्डाण करत आहे. इंडिगोच्या या वेळापत्रकाचा फटका अनेक मंत्री आणि आमदारांना बसला. अनेक मंत्री आणि आमदार रस्ते मार्गाने किंवा चार्टर्ड प्लेनने नागपुरात दाखल झाले. इंडिगोच्या गोंधळामुळे अनेक मंत्री आणि आमदारांना नागपूरला पोहोचण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.
एकीकडे हा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच चार्टर विमानातून नागपूरला प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये अचानक मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागपूर महानगरपालिकेतील तसेच नगर परिषद–नगर पंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना शिंदे गट यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे वातावरण होते. मात्र, रविवारी दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासाने वेगळे संकेत मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानात जागा भरल्यामुळे काही भाजप आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार्टर विमानाने प्रवास करावा लागला. दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र प्रवास केल्याने संवाद आणि समन्वयाचे स्पष्ट संकेत मिळाले. ज्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये सलोखा निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुंबई–नागपूर विमान प्रवासासाठी दिवसभर तिकिटे उपलब्ध नसल्याने काही मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना चार्टर विमानांवर अवलंबून राहावे लागले. अनेकांनी चहापान कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी वैयक्तिक किंवा एकत्र येत चार्टरची व्यवस्था केली.
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या गोंधळामुळे अधिवेशनाला जाणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले. विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे, पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषत: पुणे आणि मुंबईतून नागपूरला जाणाऱ्या डझनभर आमदारांची तिकिटे ऐनवेळी रद्द झाली. या गोंधळाचा फटका विरोधी पक्षाच्या आमदारांनाही बसल्याची चर्चा आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे अनेक लोकप्रतिनिधींना अतिउच्च दरात इतर कंपन्यांची विमानाची तिकिटे घ्यावी लागली. तर काहींना चार्टर विमानांचा पर्याय स्वीकारावा लागला.
विमानाची तिकीट न मिळाल्याने आणि वेळेत पोहोचण्यासाठी, अनेक आमदार-अधिकाऱ्यांनी कारने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. काहींनी तर थेट समृद्धी महामार्गाचा वापर करून १२ तासांहून अधिक लांबचा रस्ते प्रवास केला. ज्यामुळे त्यांच्या अधिवेशनाच्या तयारीसाठीच्या वेळेवर परिणाम झाला. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महायुतीतील अंतर्गत मतभेदाच्या वातावरणात अचानक दिसलेला हा सौहार्दाचा प्रवास आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.