
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजले असून आज १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राज्यातील ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एकूण ७३१ जिल्हा परिषद गट आणि १ हजार ४६२ पंचायत समिती गणांसाठी मतदान होत आहे. या महासंग्रामात ७ हजार ४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. यासाठी सुमारे २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
किती जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतदान?
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात किती जिल्हा परिषद गट (जागा) आणि किती पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे, याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.
| अनुक्रम | जिल्हा | जिल्हा परिषद गट (जागा) | पंचायत समित्यांची संख्या |
| १ | पुणे | ७३ जागा | १३ पंचायत समित्या |
| २ | सोलापूर | ७२ जागा | ११ पंचायत समित्या |
| ३ | कोल्हापूर | ६७ जागा | १२ पंचायत समित्या |
| ४ | सातारा | ६४ जागा | ११ पंचायत समित्या |
| ५ | छत्रपती संभाजीनगर | ६३ जागा | ९ पंचायत समित्या |
| ६ | सांगली | ६१ जागा | १० पंचायत समित्या |
| ७ | रायगड | ५९ जागा | १५ पंचायत समित्या |
| ८ | लातूर | ५८ जागा | १० पंचायत समित्या |
| ९ | रत्नागिरी | ५६ जागा | ९ पंचायत समित्या |
| १० | धाराशिव | ५५ जागा | ८ पंचायत समित्या |
| ११ | परभणी | ५३ जागा | ९ पंचायत समित्या |
| १२ | सिंधुदुर्ग | ५० जागा | ८ पंचायत समित्या |
| एकूण | ७३१ जागा | १२५ पंचायत समित्या |
जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २,६२४ उमेदवार रिंगणात आहे. तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ४,८१४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. जिल्हा परिषदेत ३६९ तर पंचायत समित्यांमध्ये ७३१ जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रशासनाने २५,४७१ मतदान केंद्रे उभारली असून, १ लाख २८ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरक्षेसाठी राज्यभर मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे. यावेळी मतदारांना दोन मते द्यायची आहेत. जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाचे आणि पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाचे बॅलेट युनिट मतदान केंद्रावर उपलब्ध आहे.
आज सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान पार पडणार आहे. या सर्व जागांचा निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होईल. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत कोणत्या जिल्हा परिषदेवर कोणाची वर्णी, कोणती पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.