ZP Panchayat Samiti Election 2026 Voting LIVE : धाराशिव : ग्रामीण भागात दुपारी चार वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
Zilla Parishad Panchayat Samiti Election 2026 Voting LIVE in Marathi : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड पक्षाने केली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणूक मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज असून सोमवारी ( 9 फेब्रुवारी) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

Zilla Parishad Election : महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअतंर्गतच्या 125 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडत असून थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे. आधी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होतं, मात्र ते पुढे ढकलून 7 तारेखला मतदान तर 9 फेब्रुवारी (सोमवार) मतमोजणी पार पडणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. आज जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. यंदा 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी असलेल्या 25 हजार 471 मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुंबई महानगरपालिकेवर भाजपच्या रितू तावडे यांची महापौर म्हणून तर संजय घाडी यांची उपमहापौरप म्हणून निवड झाली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा
करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. गौंडरे येथील बूथ क्रमांक 62 व बूथ 63 वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या मतदानसाठी रांगा पाहायला मिळत आहे.
-
कोपरगाव बस स्थानकात बसचे ब्रेक फेल, मोठी दुर्घटना टळली
कोपरगाव बस स्थानकात आज सायंकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचे अचानक नियंत्रण सुटले. ही बस थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याने स्थानकात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी बस स्थानकात प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. अचानक समोर आलेल्या बसमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस स्थानकात मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, एसटी बसच्या देखभालीबाबत आणि दुरावस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची चौकशी होणार का , असा सवाल आता प्रवाशांमधून विचारला जात आहे.
-
-
सोलापुरात ईव्हीएम मशीनच्या खालील बाजूस जादूटोणा, अपक्ष उमेदवाराचा आरोप
सोलापुरात ईव्हीएम मशीनच्या खालील बाजूस जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर हा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीन खाली खिळा टोचलेले लिंबू, मिरची ठेवून जादूटोणा करण्यात आला आहे, असा आरोप अपक्ष उमेदवाराने केला आहे.
-
कल्याणमध्ये एपस्टीन फाईलवरून काँग्रेस पक्ष आक्रमक, मोठे आंदोलन
कल्याणमध्ये एपस्टीन फाईलवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. जेफ्री एपस्टीन फाईल प्रकरणात सत्य दडपल्याचा आरोप करत काँग्रेस युवा सेना रस्त्यावर उतरली आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
-
धाराशिव : ग्रामीण भागात दुपारी चार वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 आणि पंचायत समितीच्या 110 जागांसाठी सकाळी साडेसात पासून मतदान सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दुपारच्या वेळी मतदारांचा अल्पसा प्रतिसाद दिसला मात्र पुन्हा चारच्या नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. चारपर्यंत ग्रामीण भागात 40% च्या आसपास मतदान झाले आहे. मात्र आता उर्वरित वेळेत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
-
-
भिवंडी : माजी महापौर विलास पाटील यांनी जामीन मंजूर
भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील व पुत्र नगरसेवक मयुरेश पाटील यांना अखेर अटकपूर्व जमीन मंजूर झाला आहे. 18 जानेवारी रोजी माजी महापौर विलास पाटील व भाजपा आमदार महेश चौघुले समर्थकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झाला होता. याप्रकरणी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. विलास पाटील यांना अटकपूर्व जमीन मंजूर झाल्याने भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे .
-
बार्शी : पानगावमध्ये नवरदेवाने लग्नाआधी बजावला मतदानाचा अधिकार
सोलापूरच्या बार्शीतील पानगावमध्ये नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा अधिकार बजावला आहे. घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात नेत या नवरदेवाने मतदान केले. पानगाव येथील आनंद जयराम मोरे यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
सोलापूर : करमाळ्यातील केडगावमध्ये फक्त 34 मतदारांनी केले मतदान
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केडगाव येथे सर्वात कमी मतदान झाल्याचे पहायला मिळत आहे. केडगाव येथे साडे तीन वाजेपर्यंत 2061 मतदारांपैकी पैकी फक्त 34 मतदारांनी मतदान केले. केडगाव ग्रामस्थांनी रस्ता नसल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता, त्यामुळेच इथे कमी मतदान झाले आहे.
-
कल्याण रेल्वे स्टेशनवर तांत्रिक बिघाडाने लोकल सेवा विस्कळीत
कल्याण रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईनमध्ये बिघाड झाल्याने मालगाडी खोळंबल्याने उपनगरी लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्लॅटफॉर्म क्र. 4 आणि 5 लगतच्या लूप लाईनवर CST दिशेने जाणारी मालगाडी अडकल्याने गोंधळ उडाला आहे.
-
जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणूकीत दुपारी १.३० पर्यंत ३७.९४ टक्के मतदान
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी दुपारी १.३० पर्यंत ३७.९४ टक्के मतदान झाले आहे.
-
जुन्नरच्या शेततळ्यात बुडून बालक मृत्यूमुखी ; कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली मदत
जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाखांची मदत केली आहे.
-
सोलापूरात दुपारी 1.30 वाजेपर्यंत 33.37 टक्के मतदान
सोलापूर जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 33.37 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदात आणि १२५ पंचायत समितीमध्ये आज मतदान सुरु आहे.
-
35 -40 वर्षांमध्ये निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदा अजितदादा नाही- हर्षवर्धन पाटील
ही पहिली निवडणूक अशी आहे की 35 -40 वर्षांमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि प्रक्रियेमध्ये अजितदादा नाहीयेत. आता ते कायमचे नसणारे आपल्या सोबत. अतिशय जड अंत:करणारे महाराष्ट्रातील एक कर्तृत्व नेता आपल्यामध्ये नाहीये. दुःखद प्रसंग मधून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आरोपी विष्णू चाटेला लातूर कारागृहातून बीड कारागृहात आणले जावे यासाठी वकिलांकडून अर्ज देण्यात आला. तर सरकारी पक्षाकडून यावर आक्षेप घेत विष्णू चाटेचा यापूर्वी एक अर्ज न्यायालयाला देण्यात आला होता तो रद्द करण्यात आला.
-
अमरावती जिल्ह्यातील शिराळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत गोंधळ
अमरावती जिल्ह्यातील शिराळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत गोंधळ झाला आहे. मुलगी सरपंच मात्र वडीलच कारभार करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळली असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात योग्य पद्धतीने पार पडले मतदान
छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या फुलंब्री तालुक्यातल्या विविध मतदान केंद्रांना भेटी. एक दोन ठिकाणचे मतदान केंद्र वगळता संभाजीनगर जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती दिली आहे. मतदान केंद्रावर जात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला.
-
राणीसावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्याने मतदान केंद्रावर वाद
परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्याने मतदान केंद्रावर वाद… मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंताकडून आरोप…. महंतांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांना मतदानापासून रोखलं…
-
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर EVM बंद
चिपळूणमध्ये नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर EVM बंद… अधिकाऱ्यांनी मशीन दुरुस्तीसाठी चिपळूणला नेलं… मशीन दुरुस्त करुन मतदान केंद्रावर आणणार त्यानंतर मतदान पुन्हा सुरु होणार..
-
अकलूजमध्ये लहान मुलाला करायला लावलं मतदान
अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला EVMचं बटण दाबायला लावलं… धैर्यशील मोहित पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप… अर्जुनसिंह मोहिते-पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप
-
अजितदादांच्या अपघाताबाबत बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त
अजितदादांच्या अपघाताबाबत बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त, मात्र मुख्यमंत्री शंकेचं निरसन करण्याऐवजी दम देतायत… राऊतांची टीका… तुमचा संबंध काय?, असा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
-
सिंधुदुर्गात किती टक्के मतदान
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी साडे सात वाजल्यापासून 11.30 पर्यंत 20.30 टक्के मतदानाची नोंद. सिंधुदुर्गात 11.30 वाजेपर्यंत 29.06 टक्के मतदान
-
केवळ दोन फूट उंची असलेल्या निकीता गडिया या मुलीने मतदानाचा हक्क बजावला
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे आज निकीता मनीष गडिया (वय 21 वर्षे) हिने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. केवळ दोन फूट उंची असलेल्या निकीता गडिया या मतदान करणाऱ्या सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरल्या आहेत.
-
महाराष्ट्र ही भारताची आर्थिक शक्ती – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र ही भारताची आर्थिक शक्ती (Economic Powerhouse) आहे. भारतामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असताना, आता विदर्भ क्षेत्रात ऐतिहासिक सामंजस्य करार (MOUs) होत असून त्यांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
सुमारे दोन तास मशीन बंद
चिपळूण सावर्डे पंचायत समिती गण 14 मतदान केंद्रामधील मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड. सुमारे दोन तास मशीन बंद. आमदार शेखर निकम यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संशय घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.
-
बोगस मतदार पकडला,कमळ चिन्हावर मतदान करण्यासाठी आल्याची कबुली
चाकण मधील तरुण रांजणगाव गणपती येथे मतदानाला आले. भाजपाच्या कमळ वर मतदान करण्यासाठी आल्याची व्हिडिओतील तरुणाने कबुली दिलीय. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी कारवाई सुरु केली.
-
पुणे जिल्हा परिषदेसाठी पहिल्या दोन तासांत ७.७४ टक्के मतदान
सर्वाधिक मतदान भोर तालुक्यात झाले . ८.७९ टक्के.
जुन्नर-७.४२ टक्के
आंबेगाव ८.५६ टक्के
शिरूर-७.२१ टक्के
खेड-७.६५ टक्के
मावळ -८.६३ टक्के
मुळशी-७.०३ टक्के
हवेली-७.७९ टक्के
दौंड-८.१२ टक्के
पुरंदर-८.१ टक्के
वेल्हे-७.९१ टक्के
बारामती-६.५२ टक्के
इंदापूर-७.६८ टक्के
-
मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाली. शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव केला. नसरीन बानो यांच्या बाजूने 43 नगरसेवकांनी मतदान केले. तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं पडली. इस्लामच्या 35,समाजवादीच्या 5 तर काँग्रेस 3 तीन अशा 43 नगरसेवकांनी नसरीन बानो शेख यांना मतदान केले. तर शिवसेनेच्या 18 नगरसेवकांनी घोडके यांना पसंती दिली.एमआयएम व भाजप नगरसेवक तटस्थ राहिले,
-
पुणे जिल्ह्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद प्रतिसाद
जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 7.74 टक्के मतदान झाले. सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुमारास एकूण 7.74 टक्के इतके मतदान झाले. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
-
आयुष म्हात्रेच्या घरी मोठा जल्लोष
कर्णधार आयुष म्हात्रे च्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्या नंतर आयुषच्या परिवारात मोठा आनंदाचा जल्लोष सुरू आहे. सर्व कुटुंबियाना मोठा आनंद व्यक्त करीत आहेत. आयुष हा वयाच्या 5 व्या वर्षीपासून क्रिकेट खेळत होता. लहानपणापासूनच आयुष क्रिकेट साठी ध्येयवेडा बनला होता. वडील योगेश कमलाकर म्हात्रे आई जागृती म्हात्रे , आजोबा सुधाकर।म्हात्रे , आजी गंगुबाई म्हात्रे यांनी आयुषच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुषच्या क्रिकेटची सुरूवात अमेय क्रिकेट क्लब च्या माध्यमातून झाली त्यानंतर साईनाथ क्रिकेट क्लब विरार, मुंबई न्यु हिंद क्लब ,वी एन सुळे गुरुजी हायस्कुल माटुंगा हिंदू किलांनी पूर्वाश्रमी किंग्ज जॉर्ज शाळा यातून आयुस क्रिकेट खेळत गेला.
-
चौथ्या दिवशीही पवार कुटुंबियांची बैठक
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे आज चौथ्या दिवशीही पवार कुटुंबियांची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, रजनी इंदोलकर पोहोचले आहेत.आज विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेवर पार्थ पवार याला घेण्यात येणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. तर बारामती शहरात सेंट्रल पार्क उभारले जात आहे या पार्कमध्ये अजितदादांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्यानुसार या सेंट्रल पार्क चा आराखडा शरद पवार यांना दाखवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे
-
मालेगाव महापालिका महापौर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
मालेगाव महापालिका महापौर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. महापौर निवडीनंतर उपमहापौर पदाची निवडणूक होईल. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. तर आयुक्त रवींद्र जाधव हे ही उपस्थित असतील.
-
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कुटुंबासह बावडा येथे बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातील बावडा येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगा राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता ठाकरे यांनीही मतदान केले.
-
भास्कर जाधव आणि परिवाराने मतदानाचा हक्क बजावला
शिवसेना नेते, गुहागर मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव यांनी त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या मूळ गावी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ सुवर्ण, मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनीही मतदान केले.
-
मालेगाव महापालिकेत अजून एक ट्विस्ट
मालेगाव महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीतून इस्लामच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी माघार घेतली आहे. इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद व शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांच्यात सरळ लढत होणार आहे.महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर पदासाठी इस्लामकडे सभागृहात बहुमत आहे. महापौर पदासाठी तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे हर्षवर्धन पाटील यांचं मतदारांना आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांसमोर त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. एका बाजूला दुःख असले तरी दुसऱ्या बाजूला कर्तव्याची जाणीव ठेवून काम करावे लागेल. लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करावा. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. विकास व भविष्याचा विचार करून इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावेत, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
-
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे उमेदवार
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे उमेदवार ठरल्या आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगर बजाज नगर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन हळदी कुंकू आणि पूजा प्रकरण
छत्रपती संभाजीनगर बजाज नगर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन हळदी कुंकू आणि पूजा प्रकरण समोर आले आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवार रत्नमाला ढमढेरे यांनी ईव्हीएम मशीनचे पूजन केले होते. याप्रकरणी आता मतदान केंद्राधिकार्यावर कारवाई केली जाणार आहे असल्याची माहिती मिळत आहे.
-
शिवसेनेचे संजय घाडी मुंबईचे उपमहापौर
शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या उपमहापौर पदी झाली आहे. पुढील सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांनी उपमहापौर पदाची जबाबदार स्वीकारली आहे.
-
आमदार विलास भुमरे यांनी मुलाला सोबत घेऊन बजावला मतदानाचा हक्क
आमदार विलास भुमरे यांनी मुलाला सोबत घेऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. आमदार भुमरे यांच्यासोबत मुलाच्या बोटाला सुद्धा शाही लावण्यात आली. छत्रपती संभाजी नगरच्या पाचोड मतदान केंद्रावर भुमरे यांनी हक्क बजावला.
-
चिपळूणमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडण्याचं सत्र सुरूच
चिपळूणमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडण्याचं सत्र सुरूच आहे. मांडकी, आगवे, सावर्डे कासारवाडी येथील ईव्हीएम मशीन पडल्या बंद आहेत. गुहागर मध्ये देखील २ मशीन बंद पडल्या आहेत.
-
मालेगाव महापालिका महापौर व उपमहापौर निवडणूक ….
मालेगाव महापालिका महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. लवकरच निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार आहे. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले आहेत. गळ्यात इस्लाम मफलर, हिरवे फेटे परिधान करून नगरसेवक दाखल झाले आहेत. इस्लामच्या नसरीन बानो शेख व समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद उपमहापौर होणार.
-
दादांचा विमान अपघात संशयास्पद, यावर बोलायचं का नाही? संजय राऊत
दादांचा विमान अपघात संशयास्पद, यावर बोलायचं का नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या घातपाताबाबत संशय… रोहित पवार काय सांगणार? याकडे माझं देखील लक्ष लागलेलं आहे…. असं देखील संजय राऊत म्हणाले.
-
मालेगाव महानगर पालिका महापौर, उपमहापौर निवडीसाठी होणार मतदान
मालेगाव महानगर पालिका महापौर, उपमहापौर निवडीसाठी मतदान होणार आहे. यामुळे पोलिसांचा मोठा चोख बंदोस्बत ठेवण्यात आला आहे. इस्लाम पार्टीने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. MIM ने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात मतदानाची प्रक्रिया होणार सुरू..
-
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आ. सदाभाऊ खोत यांनी केलं मरळनाथपूर येथे मतदान
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समितीसाठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
-
मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक
छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विनाकाम महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढले.
-
सिल्लोडमध्ये मतदानावेळी भाजप उमेदवाराला धक्काबुक्की, नानेगावमध्ये तणावपूर्ण शांतता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर आज मतदानादरम्यान मोठा राडा झाला. भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्रिंबक पाटील गव्हाणे हे मतदान केंद्राची पाहणी करत असताना हा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेनंतर नानेगाव परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले आहे.
-
परभणीत मतदानासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा धुरळा पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४९ जागांवर उमेदवार उतरवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४२ उमेदवारांसह त्यांना जोरदार टक्कर देत आहे. शिवसेना (उबाठा) २३, काँग्रेस २१ आणि वंचित बहुजन आघाडी २४ जागांवर नशीब आजमावत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांचा मोठा ओघ पाहायला मिळत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्रावरच भाजप उमेदवाराला धक्काबुक्की
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मतदानाच्या दिवशीच गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. सिल्लोडमधील नायगाव येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धक्काबुक्कीच्या या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निवडणुकीच्या शांततामय वातावरणात झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
-
धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांची मोठी खेळी, जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत केलं मोठं विधान
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगाव येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेला मतदारांच्या पाठिंब्यावर मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, धाराशिवमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असताना सावंतांनी मोठे विधान केले आहे. “अध्यक्षपदाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील आणि जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य असेल,” असे सांगत त्यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या दरबारात टोलावला आहे. तरीही, अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
-
निवडणुकीत चांगलं यश मिळेल, जयंत पाटलांचे मतदानानंतर मोठं विधान
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. ईश्वपूरजवळील त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच साखराळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी विशेष म्हणजे कोणत्याही बडेजावाशिवाय जयंत पाटील हे सामान्य नागरिकांप्रमाणे मतदान केंद्रावर रांगेत उभे राहिले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
-
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडीमध्ये केले मतदान
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी मतदान केलं. यावेळी आई हिराबाई पडळकर आणि कार्यकर्त्यांसमवेत मतदान केंद्रावर जात पडळकर यांनी आपलं मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समिती साठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
-
अकलूजमध्ये मतदानाच्या दिवशीच राडा? अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर निवडणूक अधिकाऱ्यांचा आक्षेप
अकलूजमध्ये मतदानादरम्यान एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपले पुत्र रुद्रराज मोहिते पाटील यांना सोबत घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदान केंद्राध्यक्षांनी नियमांचे बोट ठेवत लहान मुलाला केंद्रात नेण्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर आपली बाजू मांडताना अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले की, आपल्या आई-वडिलांना लोकशाहीचा हक्क बजावताना प्रत्यक्ष पाहता यावे, या उद्देशानेच त्यांनी मुलाला सोबत आणले होते. केंद्राध्यक्षांच्या या भूमिकेमुळे आणि मोहिते पाटलांच्या निर्वाळ्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले होते.
-
रत्नागिरीत निवडणुकीचा धुरळा, योगेश कदम मतदान केंद्रावर, नागरिकांना दिली मोलाची साद
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना गावाच्या विकासाचा भक्कम पाया संबोधले. विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच या निवडणुकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, त्यामुळे घराबाहेर पडून आवर्जून मतदानाला उतरा,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी रत्नागिरीकरांना केले.
-
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार; संदिपान भुमरे यांचा विश्वास
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी आज मतदानाचा हक्क बजावत विजयाचा मोठा दावा केला आहे. सकाळी सकाळी मतदारांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता मतदानाची टक्केवारी वाढेल. त्याचा थेट फायदा शिवसेनेला होऊन आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही ४१ जागा लढवत असून अनेक ठिकाणी युती कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असेही ते म्हणाले. पाचोडच्या जागेवरील घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देताना संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले की, ही उमेदवारी कोणावरही लादलेली नसून लोकांमधून निवडून येणारे नेतृत्व आहे, जे निकालातून स्पष्ट होईल.
-
सोलापुरात मोहिते पाटील कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदानाचा जोर दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि यशवंत पंचायत समितीच्या यशवंतनगर गणाचे उमेदवार वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी आज सकाळी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मोहिते पाटील कुटुंबीयांच्या या मतदानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, उमेदवारांनी मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
-
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात, २७१ उमेदवारांचे नशीब मतपेटीत होणार कैद
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी २७१, तर पंचायत समितीसाठी ४८५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील एकूण २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, प्रशासकीय यंत्रणेने सर्व मतदान केंद्रांवर चोख तयारी केली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा हा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, हे आज मतपेटीत कैद होणार आहे.
-
रोहित पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार…
रोहित पवार पिंपळी मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.
-
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
राज्यातील 12 ठिकाणी होत असलेल्या निवडुकीत मतदारांनी मतदान करण्याचे योगेश कदम यांचे आवाहन. जिल्हा परिषद पंचायत समिती ही ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणारी निवडणूक
-
माळशिरसच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद
सुमारे 40 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मतदार रांगेत ताटकळत उभारले. जवळपास 40 मिनिटांनी बंद पडलेले ईव्हीएम मशीन सुरू झाले.
-
दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल बजावला मतदानाचा हक्क…
राहु येथील मतदान केंद्रावरती आमदार राहुल कुल तसेच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल यांनी मतदान केले…
-
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा
मतदानासाठी मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद. विकासाचे व्हिजन असलेला उमेदवार पाहून आम्ही मतदान करतोत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी प्रतिक्रिया मतदार व्यक्त करत आहेत…
-
शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे पाचोड मतदान केंद्रावर दाखल
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खासदार संदिपान भुमरे करणार मतदान. पाचोड जिल्हा परिषद गटातून खासदार भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आहेत उमेदवार
-
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील 224 मतदान केंद्रावर मशीन बंद
मशीन सुरू न झाल्याने अद्याप मतदान केंद्रावर मतदान अद्याप सुरू नाही. मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शितलकुमार मोटे यांनी..
-
सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा
शिवसेना ठाकरे गटाच्या कोंडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सोमनाथ राऊत यांच्याकडून पूजा करण्यात आली. सोलापूर मध्ये झेडपीचे 68 आणि पंचायत समितीचे 136 गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
-
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील 224 मतदान केंद्रावर मशीन बंद
मशीन सुरू न झाल्याने अद्याप मतदान केंद्रावर मतदान अद्याप सुरू नाही. नागरिकांची मोठी रांग मतदानाला लागल्याचे बघायला मिळत आहे.
-
मतदारसंघाच्या विकासासाठी मी लढत आहे- सक्षणा सलगर
कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे सर्व मतदारांनी मतदान करावं आणि मी मतदारसंघाच्या विकासासाठी मी लढत आहे असे सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे.
-
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी गावी जायची धावपळ
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. मतदानाला ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी निघाले. बस संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची घरी जाण्यासाठी तारांबळ. स्वारगेट बस स्थानक हाउसफुल
-
EVM मशिन बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप..
आज राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान होत असून काही भागात सकाळीच EVM मशिन बंद पडल्याची माहिती मिळत आहे.
-
कराडमधील चचेगावमध्ये EVM बंद
कराडमधील चचेगावमध्ये EVM बंद पडलं आहे. बूथ क्रमांक78 वरील मशीन बंद पडलं असून त्यामुळे मतदानाला उशीर होताना दिसत आहे.
-
त्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितींसाठी मतदानाला सुरुवात
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समितींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटांसाठी 151 उमेदवार, तर 9 पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात आहेत. 1693 मतदान केंद्रावर मतदान होणार असून , 4286 मतदान यंत्रं आहेत. जिल्ह्यात 11लाख 73 हजार 899 मतदार आहेत.
-
सांगली – जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषदच्या 61 जागासाठी 211 जण रिंगणात आहेत. तर पंचायत समिती 122 जागासाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18 लाख 18 हजार 742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
-
भरणेवाडी, इंदापूर – जिल्हा परिषद ,पंचायत समिती मतदानाला सुरुवात
भरणेवाडी, इंदापूर येथे जिल्हा परिषद ,पंचायत समिती मतदानाला सुरुवात झाली. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील मतदान केंद्रावरती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानासाठी हजर
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काटेवाडी मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाल्या आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार हे आधीपासूनच तेथील मतदान केंद्रावर आले होते.
-
धाराशिव जिल्हा परिषद, आणि आठ पंचायत समितीसाठी आज मतदान प्रक्रिया
धाराशिव जिल्हा परिषद, आणि आठ पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील 11 लाख 45 हजार 888 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली असून 1308 मतदान केंद्रांवर आज मतदान होणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
-
मतदान प्रक्रियेत हुल्लडबाजीकेली तर प्रभावी कायदेशीर कारवाई करणार – पोलीस अधीक्षकांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर – मतदान प्रक्रियेत हुल्लडबाजी केली तर प्रभावी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी व होमगार्डचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published On - Feb 07,2026 7:26 AM
