महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

महायुतीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी 5-10 जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाल्यास वावगं नाही, असं म्हटलंय.

महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
शिंदे गट आणि अजितदादांना विधानसभेच्या किती जागा मिळणार ?
| Updated on: Sep 12, 2024 | 1:19 AM

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी, मैत्रीपूर्ण लढतीवरुन मोठं वक्तव्य केलंय. ज्या जागांवर महायुतीत अडचण असेल, अशा काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्यात वावगं नाही, असं खोतकरांनी म्हटलंय. पण भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यास विरोध केला आहे. मतभेद असतील तर मिटवू मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीदेखील खोतकरांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. खोतकरांनी मैत्रीपूर्ण लढतीच्या भावना आपल्या नेत्यांना सांगा, असं उमेश पाटील म्हणाले आहेत. आता मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय? आणि कधी होते तेही समजून घेवूया.

महायुतीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. ज्या जागांवर युतीतलेच तिन्ही पक्ष किंवा 2 पक्षांचा दावा असेल आणि जागेवरुन तोडगा निघतच नसेल अशावेळी युती असताना त्या जागेवर युतीतलेच दोन्ही पक्ष एकमेकांच्याच विरोधात लढत असतील, तेव्हा त्या लढतीला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात.

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मैत्रीपूर्ण लढतीवर चर्चा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांआधी मुंबई दौऱ्यावर होते, त्यावेळी भाजपच्याच काही नेत्यांनी 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्याची बातमी, ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं दिली. मात्र अशा लढतीला काहीही अर्थ नाही आणि अशा लढतीला विरोध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही म्हटलं आहे. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही, असं करु नये, असं अजित पवार म्हणाले आहेत.

आता मैत्रीपूर्ण लढतीवर शिंदेंचे नेते खोतकर बोललेत. पण त्यांच्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाटांनी अशा लढती नको असं म्हटलं आहे. “महायुतीत मैत्रीपूर्ण लढत नकोच”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात भाजपने मिशन 125 साठी दीडशे जागा लढण्याचा निश्चिय केल्याचं समजतंय. शिंदेंच्या शिवसेनेनंही 100 जागांची मागणी केलीय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 80 हून अधिक जागा मागितल्या आहेत. त्यातही 2019 मध्ये 20 हून अधिक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत झालीय. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीच्या सूचना सुरु झाल्या आहेत.