मोठा अपघात टळला, मुंबई विमानतळावर मालवाहू ट्रकची विमानाला धडक, उड्डाण रद्द

आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे. टेकऑफपूर्वी एका मालवाहू मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला धडक दिली.

मोठा अपघात टळला, मुंबई विमानतळावर मालवाहू ट्रकची विमानाला धडक, उड्डाण रद्द
Akasa Air Line
| Updated on: Jul 14, 2025 | 6:50 PM

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे. टेकऑफपूर्वी एका मालवाहू मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला धडक दिली. हे विमान मुंबईवरुन दिल्लीला जाणार होते. या अपघातात विमानासह आणि ट्रकचेही नुकसान झाले आहे. या अफघातानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले व प्रवासांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 4.54 वाजता घडली. अकासा एअरलाइन्सचे विमान बेंगळुरूवरून मुंबईला आले होते, ते बे A-7 वर पार्क केले होते. काही वेळानंतर हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते. या विमानातून माल उतरवला जात होता, त्यावेळी बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेसचा एक ट्रक विमानाच्या उजव्या पंखावर आदळला, यामुळे विमानसह ट्रकचेही नुकसान झाले आहे.

विमान उड्डाणासाठी अयोग्य

विमानतळावर झालेल्या या धडकेनंतर, त्याची तपासणी करण्यात आली, यात हे विमान उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे आढळले. या विमानाला तांत्रिकदृष्ट्या एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड (AOG) घोषित करण्यात आले. यानंतर अकासा एअरलाइन्सने उड्डाणासाठी VT-VBB नवीन विमान उपलब्ध करून दिले. यात बसून प्रवासी दिल्लीला गेले.

या घटनेनंतर अकासा एअरलाईन्सने याबाबत माहिती दिली आहे. यात कंपनीने म्हटले की, सध्या सर्वकाही ठीक असून कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जाण्याची गरज आहे.

दरम्यान, अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या घटनेत 241 विमान प्रवाशांसह 270 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये हे विमान कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला होता.