माळेगाव साखर कारखान्यावर कोणाची सत्ता? कोणाचे किती उमेदवार आघाडीवर? संपूर्ण निकाल समोर

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. १७ उमेदवार आघाडीवर असून, अजित पवार 'ब वर्ग' गटातून विजयी झाले आहेत. चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनलही चांगले कामगिरी करत आहे. अंतिम निकाल दुपारी अपेक्षित असून, अजित पवारांच्या पॅनलला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

माळेगाव साखर कारखान्यावर कोणाची सत्ता? कोणाचे किती उमेदवार आघाडीवर? संपूर्ण निकाल समोर
Sharad Pawar and Ajit Pawar
| Updated on: Jun 25, 2025 | 7:53 AM

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अजूनही पूर्णपणे हाती आलेला नसला तरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत लक्षणीय आघाडी घेतली आहे. मध्यरात्री दीड वाजता पूर्ण झालेल्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर अजित पवार गटाचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवारही आघाडीवर आहेत.

निळकंठेश्वर पॅनलची आघाडी

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ‘ब वर्ग’ गटातून एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. ज्यामुळे त्यांच्या पॅनलची विजयी सुरुवात पाहायला मिळाली. या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीच्या मोजणीत निळकंठेश्वर पॅनलचे १६ उमेदवार आघाडीवर होते. तर सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजता सुरू झाल्याने अंतिम निकाल दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत अपेक्षित आहे.

अजित पवारांचा विजय

या निवडणुकीत अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. अत्यंत चुरशीच्या सांगवी गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे हे सहकार बचाव पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. बारामती गटामधून अजित पवार गटाचे देविदास गावडे आघाडीवर असून, तावरे गटाचे उमेदवार जीबी गावडे हेदेखील आघाडीवर आहेत. महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर असून, सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरेही आघाडीवर आहेत.

किती पॅनल रिंगणात?

अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती असल्याने मतदारांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली होती. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी कारखान्याला ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते, ज्याचा परिणाम मतदानावर पाहायला मिळत आहे. आतापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता अजित पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

या निवडणुकीत अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनल अशी चार पॅनल रिंगणात होती. आता सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे लागल्या आहेत.