80 टक्के iPhone कारखाने महिला चालवतात असं म्हणत रेल्वेमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार, कारण काय?
फॉक्सकॉनने बेंगळुरूजवळील त्यांच्या नवीन आयफोन असेंब्ली प्लांटमध्ये 8-9 महिन्यांत अंदाजे 30 हजार लोकांना रोजगार दिला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अॅपलने चीनच्या बाहेर आपले उत्पादन वाढण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्सकॉनने याचाच एक भाग म्हणून बेंगळुरूजवळील त्यांच्या नवीन आयफोन असेंब्ली प्लांटमध्ये 8-9 महिन्यांत अंदाजे 30 हजार लोकांना रोजगार दिला आहे. भारतातील कारखान्याच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात जलद विस्तार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या युनिटमधील सुमारे 80 टक्के कर्मचारी महिला आहेत आणि यातील बहुतेक महिलांची ही पहिलीच नोकरी आहे.
बेंगळुरूजवळ देशातील सर्वात मोठा आयफोन प्लांट
कर्नाटकातील देवनहल्ली येथे फॉक्सकॉनने सुमारे 300 एकरांवर हा कारखाना उभारला आहे. एप्रिल-मे मध्ये येथे आयफोन 16 चे टेस्ट प्रोडक्शन सुरू झाले होते आणि आता आयफोन 17प्रो मॅक्सचे उत्पादन केले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येथे उत्पादित होणारे 80 टक्क्यांहून अधिक आयफोन परदेशात निर्यात केले जात आहेत. भविष्यात उत्पादन आणि रोजगाराच्या बाबतीत हा कारखाना देशातील सर्वात मोठा कारखाना बनन्याची शक्यता आहे.
महिला नेतृत्वातील कारखाना
देवनहल्ली युनिटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या कारखान्यात महिला कामगारांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 80 टक्के महिला आहेत, ज्यांचे वय 19 ते 24 इतके आहे. यातील बऱ्याच महिला या शेजारच्या राज्यातून कामासाठी आलेल्या आहेत. या महिला कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी 6 मोठे वसतिगृह बांधण्यात आले आहेत.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फॉक्सकॉनच्या उपक्रमाचे कौतुक केले होते. यावर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले आहे. वैष्णव यांनी X वर लिहिले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या यशाची दखल घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आभार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधानांचे दृष्टिकोन राबवून भारत आता एक उत्पादन अर्थव्यवस्था बनत आहे.”
Thanks @RahulGandhi for acknowledging the success of PM Shri @narendramodi Ji’s ‘Make in India’ programme. As you have noted, we are becoming a producer economy as we implement our PM’s vision. pic.twitter.com/1K8kmE6s3t
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 24, 2025
पगार, भत्ते आणि मिनी टाउनशिप योजना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना सरासरी 18 हजारमासिक वेतन मिळत आहे. तसेच मोफत राहण्याची सुविधा आणि अन्न देखील मिळते. भविष्यात या कारखान्याचे रूपांतर एका मिनी-टाउनशिपमध्ये करण्याची योजना आहे. ज्यात ज्यामध्ये निवासी, वैद्यकीय, शाळा आणि मनोरंजन सुविधांचा समावेश असेल.
अॅपलच्या विस्तारात भारताची मजबूत भूमिका
अॅपल चीनबाहेर आयफोन उत्पादन वाढवत आहे, यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएलआय योजनेमुळे ही प्रक्रिया वेगवान झाली आहे. आता सर्व आयफोन मॉडेल्स भारतात सुरुवातीपासूनच तयार केले जात आहेत आणि जगभरात निर्यात केले जात आहेत.
