Malegaon Blast : बॉम्बस्फोट निकाला अगोदरच मालेगावला छावणीचे स्वरुप, चौका चौकात पोलिसांची नजर, तगडा बंदोबस्त, काय अपडेट?

Malegoan Bomb blast results : 2008 च्या मालेगाव ब्लास्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिस अलर्ट मोडवर आहेत. 17 वर्षानंतर या निकालामुळे कोणतीहा तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत.

Malegaon Blast :  बॉम्बस्फोट निकाला अगोदरच मालेगावला छावणीचे स्वरुप, चौका चौकात पोलिसांची नजर, तगडा बंदोबस्त, काय अपडेट?
मालेगावला छावणीचे स्वरुप
| Updated on: Jul 31, 2025 | 11:21 AM

17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज लागत आहे. थोड्याच वेळात हा निकाल समोर येईल. जवळपास सर्व कथित आरोपी सुनावणीला हजर आहेत. 2008 च्या मालेगाव ब्लास्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिस अलर्ट मोडवर आहेत. या निकालामुळे कोणतीहा तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत .

मालेगाव पोलिस अलर्ट मोडवर

2008 मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी अंजुमन चौक ते भीकू चौक या दरम्यान असलेल्या शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर स्फोट झाला होता. रात्री 9:35 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते.

त्यानंतर आज मुंबईत या खटल्याचा निकाल लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मालेगाववासीयांसह देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. चौकाचौकात पोलिसांची नजर असणार आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहे. अतिरिक्त पोलिस कर्मचारी कुमक लक्ष ठेवणार आहे. 200 पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी, 20 पेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्त करणार असल्याची माहिती, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी दिली.

तर नाशिक ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मालेगावातील संवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तसह बाहेरील पोलिस तैनात आहेत. आरसीपी एस आर पी क्यू आर टी च्या कंपन्या देखील तैनात असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

मालेगाव बॉम्बस्फोटचा थोड्याच वेळात निकाल

मालेगाव बॉम्बस्फोटाचा मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात थोड्याच वेळात निकाल लागेल. या निकालाचे वाचन होईल. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात भीषण बॉम्बस्फोट झाला होता. स्फोटात सहा नागरिक ठार, 100 हून अधिक जखमी झाले होते. स्फोटासाठी वापरलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावे असल्याचे तपासात उघड झाले होते. तर साध्वी प्रज्ञासह कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, स्वामी दयानंद, समीर कुलकर्णी आदी आरोपी होते. अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचा बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप होता.