Sanjay Raut : भारताला दंडीत करणारे ट्रम्प आहेत कोण? संजय राऊत कडाडले, म्हणाले आता भाजपची वाचा गेली, जीभ लुळी पडली
sanjay raut on pm narendra modi : मोदींच्या मित्राने भारताच्या आर्थिक कण्यावर आघात केल्याचे सूतोवाच करत, भारताला दंडीत करणारे ट्रम्प आहेत तरी कोण? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांनी मोदी सरकारवर तुफान टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्राने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे देशात महागाई वाढणार आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसतील. रशियाकडून शस्त्र खरेदी केली म्हणून त्यांनी दंड लावला आहे.भारताला दंडीत करणारे ट्रम्प आहेत तरी कोण? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी मोदी सरकारवर तुफान टीका केली.
प्रिय मित्र मोदींच्या देशावर टॅरिफ
प्रिय मित्र मोदींच्या देशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 टक्क्यांचा टॅरिफ लावला आहे. मोदींचे राष्ट्र वेगळे आहे आणि आमचा भारत देश हा वेगळा आहे. भाजपवाल्यांसाठी मोदी राष्ट्र आहे. आम्ही सध्या भारताचा विचार करत आहोत. रशियासोबत आपण जो शस्त्रांचा व्यवहार केला आहे. त्यासंदर्भात ट्रम्प यांनी भारताला दंडीत केले आहे. हा ट्रम्प आहे कोण, भारताला दंडीत करणारा? भारताला दंडीत केले. पण रशियाबरोबर व्यापार केला. शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडीत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या जीवश्च,कंठश्च मित्र प्रेसिडेंट ट्रम्प यांनी केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची वाचा गेली आहे. जीभ लुळी पडली आहे. मोदी-अमित शाह गायब झाले आहेत.एका शब्दाने त्यांनी जीभ टाळ्याला लावली नाही, अशी टीका राऊतांनी केली.
मोदी सरकाला फाट्यावर मारले
अख्खा देश अस्वस्थ आहे. इतकेच नव्हे तर काल ट्रम्प यांनी पाकिस्तानची तारीफ केली. पाकिस्तानमध्ये जे तेल आहे, पेट्रोलियम आहे. त्यासंदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार हे एकत्र काम करणार आहे. पाकिस्तानला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे. मी वारंवार मोदींचा मित्र ट्रम्प म्हणत आहे. ट्रम्प यांची अशी हिम्मत आहे, या सरकारला फाट्यावर मारुन ट्रम्प महाशय असे सांगतायेत की, भारताला पाकिस्तानकडून भविष्यात तेल खरेदी करावे लागेल. म्हणजे जोपर्यंत मोदी हे या देशाचे पंतप्रधान असतील, तोपर्यंत ट्रम्प हे अशी परिस्थिती निर्माण करतील पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावे, असे संजय राऊत म्हणाले.
आता कुठे गेले ते अंधभक्त, सोकॉल्ड राष्ट्रभक्त?
पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा. दहशतवाद विसरून जावा. भारताविरोधात पाकिस्तानला ताकद देण्याचे काम ट्रम्प करतील असतील, तर भारताच्या पंतप्रधानांनी या गोष्टीचा धिक्कार आणि निषेध करणे गरजेचे आहे. कारण गेले 60 वर्षे आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करत आहोत. आम्ही त्याविरोधात लढत आहोत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी लढल्या. मनमोहनसिंग लढले. अटलबिहारी वाजपेयी लढले आणि या सरकारने शेपूट घातले. आता कुठे गेले ते अंधभक्त, सोकॉल्ड राष्ट्रभक्त? हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणारे कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी केला. पंतप्रधानांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी पत्रकार परिषदेत केली.
