ती दुर्घटना झाल्यानंतर… मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुतळ्याला स्वाभिमानाचे प्रतीक म्हटले. या पुतळ्याची पूर्तता झाल्यानंतर, तो पुन्हा उभारण्याचा निर्णय घेतला गेला.

मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडले. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा म्हणजे स्वाभिमान आणि शौर्याचे देदीप्यमान प्रतीक आहे, असे गौरवोद्गार काढले.
या सोहळ्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा शौर्याचे देदीप्यमान प्रतीक म्हणून उभा आहे. या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर, आम्ही तातडीने निर्णय घेतला की, हातात समशेर असलेला पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभा करायचा.”
हे स्मारक महाराष्ट्राचे आणि शिवभक्तांचे प्रतीक
“मी शिल्पकार राम सुतार यांना त्वरित दूरध्वनी करून या पुतळ्याची माहिती दिली आणि त्यांना विक्रमी वेळेत हा पुतळा उभारण्याचे आवाहन केले. आज खऱ्या अर्थाने हा भव्य आणि दिव्य पुतळा उभा राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर, त्यांच्या या पुतळ्यामुळे प्रत्येकजण प्रेरणा आणि ऊर्जा घेतल्याशिवाय राहणार नाही. हे स्मारक महाराष्ट्राचे आणि शिवभक्तांचे प्रतीक आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही केवळ पूजा आणि आरती करण्यासाठी आलो
“आज आम्ही केवळ पूजा आणि आरती करण्यासाठी येथे आलो आहोत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. ते सध्या भारतीय जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवकार्य करत आहेत. या पुतळ्याच्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, त्यांचे मी अभिनंदन करतो. हे स्मारक पर्यटक आणि शिवभक्तांसाठी आदराचे स्थान ठरेल,” असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
