Manikrao Kokate : रमीपासून ढेकळाच्या पंचनाम्यापर्यंत… महाराष्ट्राला संताप आणणारी माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधाने कोणती ?

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. "थ्री पर्सेंट" स्कीमशी संबंधित या आरोपांमुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आहे. यापूर्वीही विधानसभेत रमी खेळण्यापासून ते वादग्रस्त वक्तव्यांपर्यंत अनेकदा ते वादात अडकले आहेत, ज्यामुळे त्यांना कृषीमंत्री पदही गमवावे लागले होते.

Manikrao Kokate : रमीपासून ढेकळाच्या पंचनाम्यापर्यंत... महाराष्ट्राला संताप आणणारी माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधाने कोणती ?
माणिकराव कोकाटे यांचं वादांशी जुनं नातं आहे.
Image Credit source: social media
| Updated on: Dec 17, 2025 | 1:02 PM

शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात आरोप असलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पाय खोलात गेला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरत आहे. त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून कोणत्याही क्षणी त्याना अटक होऊ शकते. “थ्री पर्सेंट” स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोर कोकाटे यांच्यावर आहे. मात्र ते वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कोकाटे हे अनेकदा वादात सापडले असून त्यांनी अनेकदा बेताल वक्तव्य केली आहेत, बरेच वेळा त्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. विधानसभेत बसून ते रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर तर त्यांना कृषीमंत्री पदही गमवावं लागलं होतं. वादांशी त्यांचं जुनं नात आहे. राज्याला, जनतेला संताप आणणारी त्यांची अनेक वक्तव्य असून आत्तापर्यंत ते काय बोललेत, कोणत्या वादात अडकलेत ते सविस्तर जाणून घेऊया.

सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना कॅमेऱ्यात कैद

महायुतीचं सरकार आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषीमंत्री पद आलं, पण त्यांनी त्यांच्याच कर्माने ते गमावलं. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच (जुलै 2025) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीच त्यांच्या एक्स (पूर्वीच ट्विटर) हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आणि एकच गदारोळ झाला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या. ” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.” अशी कॅप्शन देत रोहित पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

 

मात्र माणिकराव कोकाटे यानी हे आरोप सरळ फेटाळून लावले. ” “मी खालच्या सभागृहात नेमकं काय चाललं आहे, ते युट्यूबवर पाहण्यासाठी फोन सुरु केला होता. पण त्यावर कोणीतरी हा गेम डाऊनलोड केला होता, ती जाहिरात तो गेम स्कीप करत होतो, तेव्हा कोणीतरी तो व्हिडीओ काढला असेल. मी काय चोरी केलेली नाही किंवा शेतकऱ्याविरोधात भाष्य केले आहे किंवा अजून काही केलेले आहे, असे नाही. मी ते स्कीप करत होतो, तेव्हा हे घडलं” अशा शब्दांत कोकाटे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी हे प्रकरण फारच लावून धरलं आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रचंड विरोधानंतर अखेर कोकाटे यांची कृषीमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांना क्रीडामंत्री पद देण्यात आलं. तर इंदापूरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषिमंत्रीपद सोपवण्यात आलं.

शासनच भिकारी आहे

विधानसभेच रमी खेळताना आढळल्यामुळे कोकाटे अडचणीत सापडले होते, मात्र त्यानंतर ते पुन्हा वादात सापडले होते. ‘पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही’ असं विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे विरोधक पुन्हा कोकाटे यांच्यावर तुटून पडले होते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील कोकाटे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांना मी यापूर्वी कधीही भिकारी म्हणालो नव्हतो. तेव्हाही माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला. शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते, म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही, असे कोकाटे म्हणाले होते.

ढेकळांचे पंचनामे करू का ?

तर याआधीदेखील कृषीमंत्री असताना मे महिन्यात कोकाटे यांनी अतिशय असंवेदनशील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा प्रश्न तत्कालीन कृषीमंत्री कोकाटे यांनी विचारला होता.

अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले होते. कृषीमंत्री या नात्याने माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे ? ढेकळांचे पंचनामे करायचे का ? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे होणार नाहीत, ते नियमात बसत नाही. शेतात नुकसान झालेल्या पिकांचे रीतसर पंचनामे केले जातील असं कोकाटे यांनी म्हटलं होतं.

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीनंतर कोकाटे यांनी पाहणी केली. अधिकारी केवळ उभ्या पिकांचे पंचनामे करत आहेत. अशी तक्राकर त्यांच्यासमोर करण्यात आली होती, त्यावर कोकाटे यांनी वक्तव्य केलं. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करायचे?, आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवालही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला.त्याच्या या विधानामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता.