Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंचा माणूस असल्याचा आरोप, आजपासून अंतरवालीत उपोषणाला बसणारे मनोज जरांगे काय उत्तर देणार?
मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनासाठी अनेक मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीत येणार आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज शनिवारी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. अंतरवाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत उपोषणाविषयी माहिती दिली. जरांगे यांनी उपोषणावर बसण्याआधीच सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यासही सुरूवात केली आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षण समर्थकांकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होत आहे. उपोषणाला बसल्यानंतर विरोधकांच्या टीकेला जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाची घोषणा केली आहे. 58 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची पडताळणी करण्याची त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर राज्यभरात मराठा आंदोलकांवर झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. तसेच आता सरकारने सातारा, कोल्हापूर, औंध, बॉम्बे गॅझेटचा शासन निर्णय काढण्यात यावा, अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांची आहे.
राज्यभरातील मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं निर्णायक उपोषण आजपासून अंतरवाली सराटीमध्ये सुरू होत आहे. या उपोषणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. आंदोलकांनी कुणबी प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राशिवाय विविध अडचणीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे महसुली पुरावे मोडी लिपीतील पुरावे त्याचबरोबर इतर दस्तऐवज सोबत आणले आहेत. मनोज जरांगे पाटील त्यावर आज शनिवारी सोक्षमोक्ष करणार आहेत. परंतु अनेक मराठा समाज बांधवांनी अधिकारी कर्मचारी जाणून भरून काम करत नसून वेळ काढूपणा करतंय, उडवाउडवीची उत्तर देतंय अस म्हटलंय.
…तर मुंबईला जाणार – मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी सरकारला आव्हान देताना म्हटलं की, सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही, तर मुंबईत जाणार. लाखो गाड्या मुंबईत जाणार. मराठ्यांनी रोज सज्ज राहावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस आणले आहे. फडणवीस कुस्ती खेळायची आहे का ?सरकार नेट बंद करू शकतं. अंतरवालीच्या आंदोलनात येऊ नका ,असे नेत्यांचे फोन आले, तर मला कळवा, अशा नेत्यांचा बाजार उठवतो. मराठ्यांच्या लेकरासाठी मी जीव टेकवणार, सगळे नेते अंतरवलीतील आंदोलनात या, असं आवाहन जरांगे यांनी केलं.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी धाराशिवमधून भव्य रॅली
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. आज जिल्ह्यातून जवळपास ५ हजार रिक्षांची भव्य रॅली अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून शेकडो ट्रॅक्टरही अंतरवाली सराटीकडे कूच करणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर रॅलीच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या असून, आंदोलनासाठी जाण्याची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.
