
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची चर्चा आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग झाला आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला याआधी 10 टक्के आरक्षण दिले होते. आज याबाबतची सुनावणी कोर्टात पार पडली. यावर मनोज जरांगे पाटलांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
आज 10 टक्के मराठा आरक्षणाबाबत कोर्टात सुनावणी पार पडली. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, कमिशनने मराठा समाज मागास सिद्ध केलेला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु जे दहा टक्के आरक्षण दिले आहे, ते 50 टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे आम्ही वारंवार सांगत आहे की 50% च्या वर गेलेले आरक्षण टिकत नाही. देणारे तेच आहेत आणि घेणारे तेच आहेत, सगळे सरकारचेच लोक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण हक्काचं आहे आणि ते मिळवलं आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठ्यांना एक आरक्षण आहे, दोन आरक्षण आहे, तीन आरक्षण आहे असं जर प्रत्येक क्षेत्रात वाटत असेल आणि त्या क्षेत्रातून सुद्धा जर असे प्रश्न विचारले जात असतील, तर हे वेदनादायी आहे. आमचा समाजच तेवढा शिल्लक आहे त्यामुळे 10% पुरत नाही. ओबीसीत असून सुद्धा संख्येने आम्ही संपूर्ण राज्यात 50 55% आहे. या समाजाला दहा टक्के आरक्षण कसं पुरेल? त्यामुळे तुम्हाला दोन-तीन प्रकारचे आरक्षण आहे असं म्हणणं नेत्यांना शोभत नाही.’
काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘भुजबळांवर बोलायचं म्हटलं की माझं डोकं सरकतं, आम्ही एकमेकांचा आदर करतो, तुला अक्कल राहिली नाही, राजकारणी मराठ्यांमध्ये आणि गरीब मराठ्यांमध्ये गैरसमज कसा पसरेल एवढेच काम तू करतो. ते आमच्या दबावामुळे बोलत नाही, असा अर्थ नाही. आम्ही एकमेकांचा सन्मान करतो असं म्हणत भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.