रुग्णालयात दाखल होताच मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, म्हणाले आता सरकारने…

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील ४८ तास ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असतील.

रुग्णालयात दाखल होताच मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, म्हणाले आता सरकारने...
manoj jarange
| Updated on: May 31, 2026 | 10:26 AM

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले आहे. मात्र, अत्यंत कडक आणि रखरखत्या उन्हात उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील ४८ तास त्यांना डॉक्टरांच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. उपचार सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून आपली भूमिका स्पष्ट केली.

घाईगडबडीत जीआर काढला तर लोक अंगावर येतील

मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी रुग्णालयातून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी विखे पाटलांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला देत ते म्हणाले, विनाकारण बडबड करायला नको. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मला तेच सांगितले की, जर घाईगडबडीत निर्णय घेतला तर पुन्हा लोक अंगावर येतील. मग जर सरकारला जीआर (शासकीय निर्णय) काढायचाच होता, तर आधी अभ्यास करून का काढला नाही? आता सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे, त्यामुळे आम्ही एक महिना थांबण्याचा निर्णय घेतला आहे., असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मराठ्यांच्या नोंदी शोधायला लावल्या, हे आमचे यश

जेवढ्या मागण्या आम्ही केल्या आहेत, त्या पटापट मार्गी लावल्या जातील. मंगळवारपासून एक-एक विषय निपटायला सुरुवात होईल. आता तरी विखे पाटील मराठा समाजाचा रोष अंगावर घेणार नाहीत, कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही यावर चर्चा केली आहे. आता एक महिन्यानंतर सरकारने पलटी मारून दाखवावीच, त्यांची आता काय हिंमत आहे? तसे झाले तर त्यांच्यासाठी खूप अवघड होईल. पण मला नाही वाटत की आता ते बदलतील, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदी पूर्वी सापडत नव्हत्या, त्या आम्ही प्रशासनाला शोधायला लावल्या. आता त्या नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडू लागल्या असून, त्याबद्दलची प्रमाणपत्रेही लोकांना मिळायला लागली आहेत, ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांनी अशा लोकांना ओळखायला हवे, ज्यांना समाजाने मोठे केले, भरपूर दिले तरीही ते नंतर उपकार विसरतात आणि समाजावरच उलटतात. त्यांना कितीही दिले तरी ते उलटणारच, त्यापेक्षा आता फडणवीसांनी मराठा समाजाला द्यायला शिकावे, असे ते म्हणाले.

विजय वड्डेटीवारांनी रस्त्यावर उतरावे नाहीतर वड्यात उतरावे. त्यांना गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करायचा आहे. वेळेप्रसंगी यांना कधीच मराठ्यांनी आणि कुणबी मराठ्यांनी निवडून दिले नाही पाहिजे. लक्ष्मण हाके यांना दुसरे काहीही काम उरलेले नाही. त्यांना फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा राबवायचा आहे. इथे धनगरांचे वाटोळे झाले तरी त्यांना काही फरक पडत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

बारीक लक्ष ठेवणार 

दरम्यान सरकारने मागितलेल्या एक महिन्याच्या मुदतीमुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा संघर्ष तूर्तास शांत झाला असला, तरी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सरकारी हालचालींवर जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे बारीक लक्ष असणार आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत जलद सुधारणा व्हावी यासाठी समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us