Manoj Jarange Patil : काळजात धस्स झालं… उपोषणाला जाण्यापूर्वी मनोज जरांगे रडले, डोळ्यात अश्रू… कंठ दाटला, म्हणाले, मी समाजासाठी मरायला…

मी समाजासाठी मरायला तयार आहे. लढायला तयार आहे. त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मरायला तयार आहे. पण हटायला तयार नाही, असं म्हणत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू आले

Manoj Jarange Patil : काळजात धस्स झालं... उपोषणाला जाण्यापूर्वी मनोज जरांगे रडले, डोळ्यात अश्रू... कंठ दाटला, म्हणाले, मी समाजासाठी मरायला...
मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू
| Updated on: May 30, 2026 | 10:12 AM

मी समाजासाठी मरायला तयार आहे. लढायला तयार आहे. त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मरायला तयार आहे. पण हटायला तयार नाही, असं म्हणत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कंठ दाटला. ऊर भरला. पहिल्यांदाच असं घडलं. त्यामुळे सर्वांच्या काळजात एकच धस्स झालं. मनोज जरांगे पाटील उपोषणाला जात असताना पहिल्यांदाच रडल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. चांगल्या कामाला शेवट नाही, असंही ते उपोषणाला जाता जाता म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास्त्र उपसलं आहे.  सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि अंमलबजावणीचा कालावधी स्पष्ट होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. अंतरवाली सराटीत, रणरणत्या उन्हात ते उपोषणाला बसले आहेत. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्ट मंडळ भेटल्यावर देखील मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम होते.  त्यांच्या उपोषणाला सुरूवात झाली आहे.

जरांगे झाले भावूक, डोळ्यांत तरळले अश्रू

मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते थोडे भावनिकही झाल्याचे दिसून आलं. अंतरवाली सराटीमध्ये तयमराठा बांधवांनी येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र आज त्यांचं आमरण उपोषण सुरू होतयं , तेव्हा अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने जमलेले दिसले. समाजाचा आपल्यावर  असलेला विश्वास पाहून आपला कंठ दाटून आला, आपण भावूक झालो अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

काय म्हणाले जरांगे पाटील ?

लोकांचा किती जीव आहे माझ्यावर, इथे अंतरवालीत उभं रहायला जागा नाही, ते पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आलं.  हा काहीतरी देऊ शकेल, समाजाला माझ्याकडून आशा आहे. सरकार वारंवार मराठ्यांवर अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही, असं भावनिक झालेले जरांगे म्हणाले.

अंतरवलीत आलेले लोक पाहून हुंदका दाटून आला, इतकं प्रेम कोणालाही मिळू शकणार नाही. माझ्या मराठ्यांवर अन्याय सरकारने करू नये ही माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली की तुम्ही माझ्या समाजाल वेठीस धरू नका, माझ्या समाजाच्या लेकराबाळांनी काहीही केलं नाहीये. ते (सरकार) सारखा सारखा अन्याय करत आहेत.  मला इथे गोळ्या घालून मारलं तरी  मी मरायला तयार आहे. तडफडून जरी या तळपत्या उन्हात मरू दिलं, तरी मी मरायला  तयार आहे, असं जरांगे म्हणाले.

मी अविश्वास दाखवत नाही, ते (सरकारचं शिष्टमंडळ) येतीलच, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. शेवटी मला माझा समाज आणि समाजातील लेकरं प्रिय आहेत असंही जरांगे यांनी नमूद केलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us