
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. हजारो मराठा आंदोलकांनी मैदानात ठिय्या मांडला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी राजकारणी लोकं आणि आमदार, मंत्री नासके आहेत अशी कठोर शब्दांत टीका केली. मराठ्यांना आरक्षण ओबीसी कोट्यातूनच मिळणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पुन्हा एकदा व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. तुम्ही शांत राहा, काहीही झालं तरी आपण आरक्षण मिळवणारच आहोत. आपली मागणी कायदेशीर आहे. ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. पण मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. तुम्हाला दोन वर्षांपासून आरक्षण कसे द्यायचे हे सांगत आहोत. तुम्हाला म्हशी भादरायला ठेवलं होतं का? अशा शब्दात मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला.
हे लोकं अत्यंत नीच आहेत आणि त्यांची आरक्षणासंदर्भात काहीही करण्याची इच्छा नाही. काहीही झालं तरी आपण आरक्षण घेणारच आहोत. ते ओबीसी कोट्यातूनच घेणार आहोत. फक्त तुम्ही शांत राहा. मराठा बांधवांनी मुंबईत येताना सुरक्षिततेची काळजी घ्या. वानखेडे स्टेडियमवर गाड्या लावून आराम करा. जेणेकरून पावसात भिजल्यावर कपडे बदलता येतील. तसेच जेवण व झोपण्याची सोय होईल. आपल्या समाजाची मान खाली जाऊ देऊ नका. एकत्र राहा, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे.
“जर आमची मागणी अवैध असेल, तर आतापर्यंत ओबीसी कोट्यात समाविष्ट केलेल्या १८० जातींची मागणीही अवैध असली पाहिजे. त्यांनी मंडल आयोगाचे उदाहरण देत म्हटले की, आयोगाने १४ टक्के आरक्षण दिले असताना, आता ते ३० टक्के झाले आहे. याचा अर्थ, वाढलेले १६ टक्के आरक्षणही अवैध असले पाहिजे. ५० वर्षांपासून सर्वेक्षण न करताच अनेक जातींना आरक्षण मिळाले, मग ते कसे काय वैध आहे, असा सवाल जरांगेंनी विचारला.
राजकारणी लोकं नासके असतात. आमदार मंत्री नासके असतात. समजून सांगितलं पाहिजे आरक्षण कसं द्यायचं. मग दोन वर्ष तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला म्हशी भादरायला ठेवलं का. तुम्हाला आंतरवालीत सांगितलं ना. दोन वर्षापासून सर्वाना सांगितलं. हे लोकं ना नीच आहेत. मी मेल्यावरच उपोषण संपवणार, असे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले.