
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करत आहेत. आज मराठा समाजाच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगेंनी उपोषण केले आहे. त्यामुळे आता मुंबईतील आझाद मैदानावर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची नुकतंच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान त्यांचा बीपी आणि शुगर नॉर्मल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. यामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वैद्यकीय तपासणीनंतरही, मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मराठा आंदोलक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्याजवळ येत आहेत. वैद्यकीय तपासणीदरम्यान, मनोज जरांगे यांच्या हृदयाचे ठोके (पल्स) देखील तपासण्यात आले, जे सामान्य असल्याचे आढळले. या काळात त्यांनी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही पाच मिनिटांसाठी विश्रांती घेतली. मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शांततेचे आणि संयमाचे आवाहन केले.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मराठा सेवक संघटनेने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आंदोलकांसाठी आचारसंहितेचे बॅनर लावले आहेत. यावर शांततेने आंदोलन करणे, मौल्यवान वस्तू न आणणे आणि जरांगे पाटलांच्या भोवती गर्दी न करण्यासारख्या १३ ते १४ सूचना देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे सरकारच्या बैठकांवर बैठका पार पडत आहे. काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात वर्षा बंगल्यावर जवळपास एक तास गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन हे वर्षा बंगल्यातून खाजगी वाहनाने बाहेर पडले. ज्यामुळे या बैठकीतील निर्णयाबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत.