
Manoj Jarange Patil Maratha Community Victory LIVE: मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु राहणार आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस होता. पण त्यामध्ये एक दिवसाची वाढ करण्यात आली. त्यानंतर आज देखील आंदोलक आक्रमक आहेत. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने आंदोलन सीएसएमटी स्थानकात मुक्काम करत आहेत. सकाळी उठून पुन्हा आझाद मैदानात जात आहेत. तर सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या अद्याप उपोषणाची दखल घेण्यात आली नाही. आज सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शिष्टमंडळ पाठवणार का याकडे सर्व राज्यांचे लक्ष लागून आहे. सोमवारी कोर्टातून मनोज जरांगे पाटील यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले. 24 तासात मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचाही आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारचं त्यावर काय उत्तर असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाबद्दलचे सर्व अपडेट्स वेळोवेळी आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून देत राहणार आहोत, दिवसभर फॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग…
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांना आरक्षण देता आलं नाही. आता ते आम्हाला ज्ञानामृत देत आहेत, असा शब्दात राधाकृष्ण पाटील यांनी पवारांवर टीका केली आहे. तसेच 30 वर्ष ठाकरेंचा पक्ष आरक्षणाबद्दल भूमिका घेताना दिसला नाही, असं म्हणत विथे पाटलांनी उद्धव ठाकरे यांनाही सुनावलं.
सरकारने आज जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. पण सर्वात महत्वाचं की गणरायाला एकच प्रार्थना करतो की या निर्णयाला कुठं दृष्ट लागू नये. यामध्ये कुणी राजकीय हेतू ठेवून वेगवेगळ्या युक्तया करू नये हीच मला भीती वाटते. पण निश्चित प्रांतवाद न करता सर्वांना कशापद्धतीने योग्य सर्वसमावेशक आरक्षण देता येईल त्याबाबत निर्णय सुध्दा महत्वाचा आहे. हा जो निर्णय घेतला गेला त्याचं खऱ्या अर्थाने सर्व श्रेय मनोज जरांगे पाटील यांचं आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य बांधव त्या ठिकाणी होते”, असं खासदार निलेश लंके म्हणाले
मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाचे काही कमी व्हावं, अशी कुठलीही भूमिका महाराष्ट्र सरकारची नाही. महायुतीचे सरकार ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सुद्धा कटीबद्ध आहे, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते देवा भाऊने करुन दाखवलंय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. फडणवीसांनी इतिहास रचला. संविधानाच्या चौकटीत आरक्षण दिलं. मराठा समाजाला न्याय देणारा नेता म्हणून फडणवीस यांचं नाव सुवर्ण अक्षरात नोंदवलं गेलंय, अशा शब्दात वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय.
देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक !! देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन व आभार ! मराठा समाजच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात ! तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील., असं ट्वीट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
मनोज जरांगे यांच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून गुलाल उधळत आनंद व्यक्त करण्यात आला. मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. सरकारने यापुढे फसवणूक करू नये असे म्हणत, मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी सरकारचे आभार मानले.
जीआर हा संविधान विरोधी आहे, ओबीसीचं आरक्षण संपवणारं आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हक्क काढून घेणारा हा जीआर आहे.
भारत आणि रशियामध्ये Su-57 लढाऊ विमानांसाठी करार होऊ शकतो. वृत्तसंस्था ANI ने रशियन सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की रशिया भारतात Su-57 लढाऊ विमानांच्या उत्पादनासाठी तयार आहे.
भूतानचे पंतप्रधान दासो त्शेरिंग 5 सप्टेंबर रोजी अयोध्येत पोहोचतील. ते रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यांची ही भेट महत्त्वाची असणार आहे. भूतान हे भारत शेजारील देश आहे.
मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे, असं कोर्ट म्हंटलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना आरक्षण देता येत नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी मोजण्यात आली आहे. अलिकडेच येथे झालेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 3000 लोक जखमी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाज बांधवांचा जल्लोष सुरु आहे.येथील पुंडलिक नगर भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मराठा बांधवांनी जल्लोष केला आहे. सरकारने 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्याने ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भात मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरमध्ये त्रुटी असल्याचे मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी म्हटले आहे.
मराठा आणि ओबीसी समाजाला समोर न आणता हा वाद आम्ही सोडवला आहे. राज्यातील कोणत्याही समाजासाठी आम्ही काम करत आलो आहोत आणि करत राहणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरु केलं होतं. या आंदोलनाला यश आले आहे. जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आहे. ते आता रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.
सरकारने जारी केलेला हा जीआर हैदराबाद गॅझेटसंदर्भात आहे. जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 23 व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी केली जाईल. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत १. ग्राम महसूल अधिकारी, २. ग्रामपंचायत अधिकारी, ३. सहायक कृषी अधिकारी असतील, असे या गॅझेटमध्ये नमूद आहे.
मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेले उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असंही त्यांना सांगितलं. पाच दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. उपोषण सोडल्यानंतर गणपतीची आरतीही करण्यात आली. तसेच मराठा आरक्षण उपसमितीनेही मराठा समाजाचे आभार मानले.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं,
आंदोलक मुंबई मोकळी करणार
मराठा आरक्षणाचा जिआर निघाला
मनोज जरागेंनी उपस्थित केल्या शंका
मनोज जरांगेंनी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारले प्रश्न
विखे पाटलांनी जरांगेंच्या शंकांचे केले समाधान
जरांगे यांचं उपोषण यशस्वी
जरांगे रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई सोडणार
मराठा समाजात जल्लोषाचं वातावरण
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अखेर जरांगेंच्या उपोषणाला यश आलं आहे. सरकारकडून मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात.
1. हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार, याचं सर्व श्रेय फडणवीसांना जाणार
2. हैदराबाद गॅझेटबद्दल सरकार लगेच जीआर काढणार
3. 1 महिन्यात सातारा गॅझेटियरबाबत अंमलबजावणी केली जाणार
4. मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जीआर काढणार
5. 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार
6. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत दिली जाणार
7. राज्यपालांच्या सहीनं तातडीनं GR काढण्याचं आश्वासन
8. शासन मराठा आंदोलकांवरील दंड मागे घेणार
9. हैदराबाद गॅझेटचा जीआर अर्ध्या तासात जरांगेंकडे सोपवला जाणार
अखेर मनोज जरांगेंचं 5 दिवसांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे. सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केला आहे. मराठा आंदोलकांनी मनोज जरांगेंच्या नावाचा जयघोष करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मागण्यांचा जीआर काढला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
सर्व मागण्यांची अंमलबजावणी आणि जीआर दिल्यानंतर सर्व आंदोलक रात्री 9 वाजता मुंबई खाली करतील. असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. पण जोपर्यंत जीआर मिळणार नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार असंही जरांगे म्हणाले आहेत.
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली होती. आता मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जीआर काढणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.
सातारा आणि हैदराबाद दोन गॅजेटची सरकार करणार अंबलबजावणी करणार असून सातारा गॅजेटबाबतचा एका महिन्यात जीआर काढण्याचा मंत्री शिवेंद्रराजेंचा जरांगेंना शब्द दिला आहे. तसचे हैदराबाद गॅजेटसंबंधात आता जीआर काढून अंमलबजावनी करण्यात येणार आहे. असं जरांगेंनी सांगितलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. हैदराबाद गॅझेटला सरकारकडून अंमलबजावणी देण्यात आली आहे. राज्य सरकार राज्यापालांची सही होताच तातडीने जीआर काढणार, अशी माहिती मनोज जरांगे पटील यांनी दिली.
न्यायालयाने मराठा आंदोलकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आझाद मैदानावर आंदोलनाला फक्त २४ तासांची परवानगी असतानाही आंदोलक तिथे अजून का थांबले आहेत, असा थेट प्रश्न न्यायालयाने विचारला. “तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात?” अशा शब्दांत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. यावर आंदोलकांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील मानेशिंदे यांनी सांगितले की, हे आंदोलन शांततापूर्ण सुरू आहे आणि यापूर्वी काढण्यात आलेल्या ५८ मोर्चांमध्ये कधीही कोणताही तणाव निर्माण झाला नव्हता. मात्र, परवानगी नसताना आंदोलन सुरू ठेवल्याबद्दल न्यायालयाने आपली कठोर भूमिका कायम ठेवली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. त्यांच्या भेटीसाठी आणि चर्चा करण्यासाठी आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानाकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी हे शिष्टमंडळ प्रयत्न करणार आहे. यामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे.
अनेक आंदोलकांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे पाटील यांनीही आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मैदानात एक प्रकारे संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या सीएसएमटी परिसरात पोलिस विविध घोषणा करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांना गाड्या एपीएमसी मार्केटजवळ लावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षण मध्ये ओबीसी मधून कोण विरोध करत आहे. येवला मधील छगन भुजबळ आणि बीड मधील मुंडे यांचा आहे. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम छगन भुजबळ करत आहे. धार्मिक आणि राजकीय जातीयवाद निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ वरती कारवाई केली पहिजे .छगन भुजबळ यांचा राजीनामा लवकरच लवकर घ्यावा, अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी दिली.
मराठा बांधवांनी सीएसटी रेल्वे स्टेशन रिकामे केले. न्यायालयाच्या आदेशानंतर सीएसटी रेल्वे स्थानक मराठा बांधवांसाठी पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सीएसटी रेल्वे स्थानकावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि लोकल ट्रेन सुरू आहेत.
मराठा आंदोलनाप्रश्न राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 3 वाजेपर्यंत कोर्टात राज्य सरकारला म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ करमाळयात मराठा समाज आक्रमक दिसला. मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालली असल्याने करमाळयातील बबन चांदगुडे व पिलूभाऊ इंदलकर यांचा महादेवाच्या पिंडीला रक्ताभिषेक करण्यात आला. करमाळयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रक्ताभिषेक आंदोलन केले.सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष द्यावे म्हणून केले महादेवाच्या पिंडीला रक्ताभिषेक आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण या आधी जे दिलेला आहे. घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षण मिळू शकतं? यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल.जरांगे पाटील यांना आणखी वेळ वाढवून हवी असेल तर सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असे मत एकनाथ खडसे यांनी वर्तवले.
हायकोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदान तात्काळ खाली करावे अशी नोटीस पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह कोअर कमिटीला बजावली. जरांगे पाटील यांनी ही नोटीस नाकारली
आमचं सर्व काही भारताच्या संविधानावर आधारीत कायदा सुव्यवस्था आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका विना परवानगी आंदोलन यावर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. पूर्वी दोन आदेश दिलेले आहेत आणि पुढील आदेशासाठी आज सुनावणी होणार आहे. बेस्ट ची बस फोडण्यात आली त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.. पोलिसांना कायद्याचे रक्षण करायचे जनतेचे रक्षण करायचे.. यावर गुन्हा दाखल झालेला आहे.कायदा आपली जागा घेईल आणि तो सगळ्यांनाच मानावाच लागेल. कायद्याला सोडून कोणी गैरवर्तन करू शकणार नाही, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली.
सीएसटी रेल्वे स्थानकासमोरील सेल्फी पॉइंट रोड पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. रस्त्यावरून वाहाने जात आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात असताना सीएसटी रेल्वे स्थानकासमोरील रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
मंत्री जयकुमार गोरे मराठा आरक्षण उप समितीच्या सदस्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. अनेक नेते, अध्यक्ष विखे पाटलांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर दाखल झालेले आहेत. गॅझेट लागू करण्यासंदर्भात मोठ्या हालचाली सुरू आहेत.
मराठा आंदोलकांनी राज्य महामार्गावर केलं भजन आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी टाळ मृदंगाच्या गजरात हिंगोली राज्य महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आझाद मैदान लवकरत लवकर रिकामे करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस घेऊन पोलीस आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मराठा-कुणबी वादासंदर्भातला फाॅर्म्युला आपल्याकडे असल्याचा दावा. यावर तोडगा काढण्यासाठी आणि फाॅर्म्युला राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले.
गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तीनवर दुर्घटना राहत चिकित्सा यान डब्याला आग लागली. संपूर्ण रेल्वे अधिकारी कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. हावडा मुंबई मार्गावर वर ब्लॉक घेण्यात आला, अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली
मराठा बांधव आक्रमक झाले असून राहुरी येथे महामार्ग अडवला. नगर – मनमाड महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देत मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत.
राहुरी बाजार समीतीसमोर विविध पक्ष आणि संघचनेचे कार्यकर्ते तसेच नागरीक रस्त्यावर उतरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबई आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आले आहेत
गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मराठा आरक्षण सुनावणीसाठी दुपारी उच्च न्यायालयात पोलीस संरक्षणात राहणार उपस्थित. मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर आज दुपारी तीनला हायकोर्टात सुनावणी. गुणरत्न सदावर्तेही या सुनावणीत हजर राहणार. काल सदावर्ते यांनी उपोषण बेकायदेशीर असल्याचा दावा करत कारवाईची मागणी केली होती. युक्तिवादानंतर आंदोलनकर्ते आक्रमक, झाले असून न्यायालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण केले होते.
“रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेऊ नका घेऊन गेलो. सीएसटी बीएमसी रिकामी करा, केली. कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं? देवेंद्र फडणवीस यांनी अन्यायकारक आमच्याशी वागू नये. न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही. देवेंद्र फडणवीस उलटं-सुटल करतो. न्याय देवतेला खोटी माहिती देतो. देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळायला लागला. मराठ्यावर अन्याय करतो, याचा दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसाला भोगावे लागतील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“तुम्हाला वाटत असेल, तुमच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडेनऊपट जास्त आहे. जिकडे नाही घुसायच तिकडे घुसू नका. उगाच आझाद मैदानातून हटवण्याच्या वल्गना करु नका. गोरगरीब मराठ्यांना न्याय द्या. मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. त्याचे दुष्परिणाम तुम्ही आणि मराठे जाणतो. मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय जाणार नाही. मराठे काय असतात हे 350 वर्षानंतर बघायच असेल तर माझा नाईलाज आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्ही शांत आहोत, देवेंद्र फडणवीस आम्हाला शांत राहू द्या. शनिवार-रविवारी मराठे जर मुंबईत आले तर सोमवारच आंदोलन खूप छान असेल. ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडणार नाही यावर ठाम आहे. शंभर पोलीस आले किंवा लाख पोलीस आले, तरी जेलमध्येच नेणार. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. हैदराबाद गॅझेटशिवाय मुंबई सोडणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा-कुणबी एकच या जीआरशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. न्यायदेवता आमच्या बाजूने न्याय देईल. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईच्या वेशीवरती असणाऱ्या ठाण्यातील आनंद नगर जकात नाका या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. आंदोलकांच्या गाड्या आनंद नगर जकात नाका या ठिकाणी विनंती करू थांबवत ठाणे रेल्वे स्थानक कडे जाण्यास पोलिस विनंती करत सांगत आहे
मनोज जरांगे पाटील उठले असून ते पाणी पीत आहेत. जरांगे यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस असून अशक्तपणा आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सकाळी उठल्यानंतर त्यांनी पाणी पिले
भीम आर्मी आणि संविधानिक आंबेडकरवादी संघटनानी फक्त आणि फक्त गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही प्रामाणिक भावना आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
जुहू पोलिसांनी बीएनएसच्या कलम 189(2), 191(1),190,115(2), 221, 352, 324 (3) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान 3 अंतर्गत गुन्हा दाखल…. पोलिसांनी १० अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
मुक्ताईनगर मुंबईत मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनास येथील समाजबांधवांनी संपूर्ण पाठींबा व्यक्त केला आहे. या लढ्यात तालुक्यातील मराठा बांधव सक्रीय सहभागी होणार असल्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यासंबंधी महत्वपूर्ण बैठक देखील पार पडली
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस… बुधवारी मराठा आंदोलकांची संख्या मुंबईत प्रचंड वाढताना दिसेल… आज गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे. आज विसर्जनानंतर मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होऊ शकतात… गावच्या गाव खाली होतील व जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मुंबईत धडकतील… खासकरून महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणत येण्याची शक्यता… मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने आपल्या गावातून निघणार… आज सकाळच्या सुमारात देखील जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे… भेटण्यासाठी रांग लावल्याचा पाहायला मिळत आहे…
आझाद मैदानात मनोज जरागे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे… मात्र त्या ठिकाणी आंदोलकांची झोपण्याची सोय नाहीये… त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईमधील CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्मवर झोपलेत..
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस… मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर सुरू आहे उपोषण… सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या अद्याप उपोषणाची दखल घेण्यात आली नाही… आज सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शिष्टमंडळ पाठवणार का याकडे सर्व राज्यांचे लक्ष लागून आहे… काल कोर्टातून मनोज जरांगे पाटील यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले… 24 तासात मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचाही आदेश देण्यात आले आहे…
ढोल ताशे वाजवत महादेवाची कावड घेऊन आंदोलन करते आझाद मैदानावर…. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस…
आज दुपारी 3.30 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असताना आंदोलक मुख्य रस्त्यांवर उतरले असून मुंबई मोठी वाहतूककोंडी होत आहे.
जरांगे पाटील यांचं आझाद मैदान येथे मराठा आरक्षणसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 3 सप्टेंबरला नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद असणार आहे. मार्केट बंद ठेवण्यासाठी उद्या बैठक बोलावली आहे.
नांदेडमध्ये मराठा खासदार आणि आमदारांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहिलंच का? असा आशय त्यांनी बॅनरवर लिहिला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्यासह इतर मराठा आमदार खासदारांचे फोटो या बॅनरवर लावले आहेत.
ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीबाबत सुप्रिया सुळे यांची भूमिका काय? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे. चित्रा वाघ यांनी प्रश्न विचारतानात सुप्रिया सुळे यांचा उल्लेख बारामतीच्या मोठ्या ताई असा केला.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आज सकाळपासून त्यांनी पाणीही सोडलं होतं. आंतरवाली सराटीचे सरपंच आले आणि त्यांनी जरांगे पाटलांना जलप्राशन करण्यास सांगितलं. त्यानंतर एक घोट पाणी घेतलं. आंदोलकांसोबत बोलायचं असल्याने एक घोट पाणी घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
उत्तराखंडमधील सततच्या पावसामुळे राज्य सरकारने चार धाम आणि हेमकुंड साहिब यात्रा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी भूस्खलन आणि ढिगाऱ्यांमुळे रस्ते अडत आहेत, जे सरकार प्राधान्याने उघडत आहे. यात्रेकरूंची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन चार धाम आणि हेमकुंड साहिब यात्रा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अफगाणिस्तानातील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. जयशंकर म्हणाले की, भारत कठीण काळात अफगाणिस्तानसोबत आहे. भारताने भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला मदत साहित्य पाठवले आहे. 15 टन अन्नधान्य देखील कुनारला पाठवले जात आहे. जयशंकर म्हणाले की, उद्या भारतातून आणखी मदत साहित्य पाठवले जाईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि जपान दौऱ्यानंतर दिल्लीत पोहोचले आहेत. जपानमध्ये पंतप्रधान मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहिले आणि चीनमध्ये ते शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेला उपस्थित राहिले.
आम्ही न्यायालयाच्या नियमांचे पालन करू. सरकाच्या कशाच्या बैठका सुरू आहेत हे आम्हाला माहीत नाही. मात्र मी चर्चा करायला तयार आहे”, असं मनोज जरांगे पाटील यांनी उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर म्हटलं.
मराठा आरक्षणासाठी गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील याच्या नेतृ्त्वात आंदोलन केलं जात आहे. जरांगे पाटील या दरम्यान आंदोलकांसह संवाद साधत आहेत. जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केलं आहे. न्यायालयाच्या नियमांचे पालन करा. तसेच मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आल्याने मुंबईकरांना त्रास होत असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन जरांगेंनी हे आवाहन केलं जात आहे.
मनोज जरांगे यांना कोर्टात आज काय झाले त्याची माहिती त्यांचे वकील देत आहेत.
ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नकोत अशी भूमिका घेत आता ओबीसीचेही आंदोलन उभारण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असे म्हणणे हे सामाजिक मुर्खपणा असल्याचे कोर्टानेच म्हटले असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
या आंदोलनावर काही तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे. काही मार्ग काढता येतील का? मार्ग काढता तो तो न्यायालयात टिकेल का? हे तपासले जात आहे. न्यायालयात टिकणारा कायदेशीर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मनोज जरांगे यांना उपोषणाला जी परवानगी देण्यात आली होती, त्याला काही अटी-शर्ती होत्या. या अटींचे उल्लंघन झालेले आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी चालू आहेत, त्यावर न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे हे निर्देश पालन करणे हे सरकारला क्रमप्राप्त आहे. त्या निर्देशांचे सरकार पालन करेल.
मनोज जरांगे पाटील मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. आता नांदेडमध्ये मराठा खासदार आणि आमदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आपण यांना पाहिलंत का ? असे बॅनर मराठा समाजाच्या वतीने लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मराठा खासदार व आमदारांचे फोटो आहेत.
जरांगे पाटलांचे वकील पिंगळे म्हणाले की, ‘चार महिन्यापूर्वी उपोषणाची घोषणा केली. सरकारला आणि प्रशासनाला याबाबत माहिती होती. सरकारकडे निवेदन आमरण उपोषणाचं होतं.आंदोलक हे आरोपी नाहीत. अन्न पाणी लाईट वीज देण्याचं गरजेचं होतं. आंदोलनाची तारीख सरकारला माहीत होतं असं वकिलांनी म्हटलं आहे.
घुसखोरांच्या काही वाईट गोष्टी दाखवण्यात आल्या. दादांनी कोर्टाच्या नियमाचं पालन करायला सांगितलं आहे. न्याय आणि कायदा सुव्यवस्था पाळण्यास सांगितलं आहे. आम्ही त्या पाळल्या. काही समाजकंटक आंदोलनात घुसले आहेत. आंदोलन भरकटवण्याचा डाव आहे. ५ हजार लोकांनाच थांबायला सांगितलं आहे. त्यावर जरांगे बोलतील
सरकारने परवानगी दिली आता ते नाही म्हणतायत असं अॅड पिंगळे यांनी आरोप केला. तर यावर जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारने म्हटलं आहे. कोर्टाने अॅड पिंगळे यांना परवानगीची प्रत दाखवण्यास सांगितले आहे.
आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये. असे कोर्टाने आदेश दिले आहेत. तसेच पाच हजारांपेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी होती असं म्हणत मुंबई कोर्टाने फटकारलं आहे. पहिल्या दिवशीच 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं. असंही कोर्टाने म्हटलं आहे.
आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत, नाच करतायत असा दावा वकील सदावर्ते यांनी कोर्टात केला आहे. तसेच पोलीस हेल्पलेस झाली आहे. कारवाईचे आदेश द्या असही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
भीम आर्मी आणि संविधानिक आंबेडकरवादी संघटनानी फक्त आणि फक्त गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही प्रामाणिक भावना आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला आहे असे भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी म्हटले आहे.
मुंबई हायकोर्टाकडून मनोज जरांगेंच्या आंदोलनावरील सुनावणीबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. उद्या 2 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. “उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सनावणी घेऊ आणि काय ते ठरवू” असं कोर्टाने म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबा चरणी साकडं घातलं आहे.. जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली आहे.आंदोलनास पाठींबा म्हणून सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील केलय…
शनिवार-रविवार या दोन दिवसाच आंदोलन परवानगीविना होतं, अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टात दिली. ध्वनिक्षेपकाचा वापर विनापरवानगी केला, महाधिवक्त्यांनी कोर्टात माहिती दिली. अटी-शर्थीच्या उल्लंघनाची माहिती कोर्टात दिली जातेय.
संपूर्ण दक्षिण मुंबई आणि परिसरात रास्तारोको केला जातोय. सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास होतोय. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तिवाद करत आहेत. हायकोर्टात अनेक याचिका आंदोलनविरोधात दाखल आहेत.
पोलीस संरक्षणात वकील गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात दाखल. जरांगेंच आंदोलन बेकायदेशीर, हायकोर्टात याचिका. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. हायकोर्टात याचिकेवर तातडीची सुनावणी.
मराठा आंदोलकांना वानखेडे सारखं ठिकाण द्यावं. सरकारने आंदोलकांना मदत करायला पाहिजे असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास का असा सवाल विचारण्यात आला असून या याचिकेवर आजच तातडीने सुनावणी होऊ शकते.
सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर 70 वर्षीय आजोबांनी आरक्षणावर भजन गात, जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. आरक्षणाची शाळा भरली मुंबई नगरीत, त्या शाळेचे मास्तर आहेत जरांगे पाटील हे भजन गात त्यांनी पाठिंबा दर्शवला.
परभणीच्या पूर्णा येथील आजोबा आपल्या नातवांना आरक्षण मिळावे ,त्यांचे भविष्य घडावे म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आमची भूमिका कायम आहे, आम्ही भूमिका बदलली नाही असं मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मराठा आंदोलकांना मुंबईत एकटं वाटायला नको, आंदोलकांना आम्ही मदत करू असंही त्यांनी नमूद केलं.
मनसेचे बडतर्फे नेते वैभव खेडेकर भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत.
कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आणि राजकीय बळ देणार त्याच्या पाठीमागे आपण उभे राहणार असे म्हणत वैभव खेडेकर यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले .
भाजप नेते नितेश राणे आज खेड दौऱ्यावर येणार आहेत, त्यानंतर ते वैभव खेडेकर यांच्या घरी देखील गणपतीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या विरोधात तीव्र निषेध होईल, असा इशारा दिला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ झाली असून सोन्या-चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत.
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1100 रूपयांची वाढ तर चांदी तब्बल 3 हजार रुपयांनी महाग झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सहित प्रति तोळा 1 लाख 7 हजार 738 वर पोहोचले आहे तर चांदीचे दर जीएसटी सहित प्रति किलो 1 लाख 27 हजार 720 रुपयांवर गेले आहेत
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील वर्षावर उपस्थित होते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शिंदे समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेसुद्धा हजर होते. आजच्या बैठकीत हैदराबाद गॅझेटसह सातारा गॅझेटवरही चर्चा झाली.
दोन्ही गॅझेट लागू करण्यासंदर्भात काल महाधिवक्त्यांसोबत विखे पाटलांची रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक झाली होती. या बैठकीतून कायदेशीर बाबींवर चर्चा झाली.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना त्यांच्या आंदोलनाला बळ मिळावं, त्यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला महाआरती करण्यात आली. शिरुर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षणाच्या लढा यशस्वी व्हावा असं साकडंही रांजणगाव महागणपतीला घालण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. न्यायमूर्ती शिंदे, विखे पाटील, महाधिवक्ता या बैठकीला उपस्थित आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल तोडगा काढण्यासाठी ही बैठक आहे.
“राजकारण करायचं नव्हतं तर सर्वपक्षीय बैठक बोलवायची होती. आझाद मैदानावर माझ्यानंतर कुणीही गेलं नाही. आझाद मैदानावर सरकार अजून का गेलं नाही? रस्ते अस्वक्ष झाले आहेत, रस्ते स्वच्छ करण्याची मी विनंती केली,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
“सर्वपक्षीय बैठक बोलवा, सर्वांशी चर्चा करा. फडणवीसांनी 2018 मध्ये आरक्षणावर पर्याय सांगितले होते. जरांगेंनी सरकारला आधीच वेळ दिला होता. आंदोलकांना कोण रसद पुरवतंय, हे सर्वांना कळू द्या,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.