जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी…, जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा इशारा, फडणवीसांनी सगळंच सांगितलं

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत, यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी..., जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा इशारा, फडणवीसांनी सगळंच सांगितलं
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 6:29 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे, ते 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सातत्याने मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत. यामध्ये सरकारने सारथी सारखी संस्था निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक मराठा तरुण स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन करत आहेत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजातून आपण तयार केले आहेत. शिक्षणाच क्षेत्र असो, सगळ्या स्कॉलरशिप आपल्या सुरू आहेत. ज्यांना होस्टेलमध्ये जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवतो. नवीन होस्टेल तयार करत आहोत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलतान ते म्हणाले की,  कुठलीही योजना बंद नाहीये. या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलं आहे, आणि खूप प्रमाणपत्र पेंडिग आहे, अशीही परिस्थिती नाही. जे प्रमाणपत्र मागितले जातात, त्यातील जे प्रमाणपत्र नियमात बसतात, ते सगळे प्रमाणपत्र दिले जातात. कुठलीही पेंडन्सी नाहीये, आता हे प्रमाणपत्र सत्यापित करण्याची जी प्रक्रिया आहे, ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसार केली जाते. त्याची कमिटी देखील सर्वोच्च न्यायालयानेच केली आहे, त्याचे निकष देखील सर्वोच्च न्यायालयानेच ठरवले आहेत. त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे, त्यामुळे त्यामध्ये राज्य सरकार हस्तक्षप करू शकत नाही.  त्यामुळे या नियमानुसार हे काम सुरू आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सातारा गॅझेट्सचा या ठिकाणी जो संबंध आहे, आपल्याला माहिती आहे, हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस सध्या आता उच्च न्यायालयात सुरू आहे. अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान कुठेही होऊ नये, यासाठी आमच्या कायदे आणि न्याय विभागाने जो सल्ला दिला आहे, त्या सल्ल्यानुसार आम्ही काम करत आहोत. आम्ही कुठेही मराठा समाजासाठी सुरू केलेल्या योजना स्लो केलेल्या नाहीत, बंद केलेल्या नाहीत. उलट अधिक ताकदीने त्या आम्ही चालवत आहोत, आणि जेवढं मुखमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी केलं तेवढं मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने केलं असेल असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us