“अशा अभिनेत्यांकडे जायचंच कशासाठी, दुनियेचा पैसा खातात ते”; पुष्कर जोगवर मनोज जरांगेंचा संताप

| Updated on: Jan 30, 2024 | 12:55 PM

अभिनेता पुष्कर जोगची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जातीची विचारणा केली म्हणून त्याने ही पोस्ट लिहिली. मात्र या पोस्टमध्ये त्याने पालिका कर्मचाऱ्यांबद्दल जे म्हटलंय, त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अशा अभिनेत्यांकडे जायचंच कशासाठी, दुनियेचा पैसा खातात ते; पुष्कर जोगवर मनोज जरांगेंचा संताप
Manoj Jarange Patil and Pushkar Jog
Image Credit source: Tv9
Follow us on

रायगड : 30 जानेवारी 2024 | मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जातीची विचारणा केल्यावरून अभिनेता पुष्कर जोग याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतकंच नव्हे तर पालिका कर्मचाऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला, असा सवाल त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“त्यांच्याकडे जायलाय नाही पाहिजे. त्यांना विचारण्याची काही गरजच नव्हती. एवढे त्यांच्याकडे संस्कार आहे, असं पहिल्यापासून कोणाला वाटतच नाही. मागास सिद्ध करण्यासाठी कायद्याने एक समिती पाठवली. त्या समितीचा अवमान करणं योग्य नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की त्यांच्याकडे जायचंच कशासाठी? त्यांना कसली कमतरता आहे, ते कसले मागास आहेत? सगळ्या दुनियेचा पैसा खातात ते”, अशा शब्दांत जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला. अशा अभिनेत्यांकडून कशाला नैतिकता शिकावी, असाही सवाल त्यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारली म्हणून पुष्करने सोशल मीडियावर पोस्ट लिहित संताप व्यक्त केला. ‘प्रश्न विचारणारी कर्मचारी महिला नसती तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपा करून हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील’, असं त्याने लिहिलं होतं. त्याच्या या पोस्टनंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जोगवर कारवाईची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

या वादानंतर पुष्करने त्याच्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट हटवला आणि माफीदेखील मागितली आहे. ‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो’, असं त्याने लिहिलं आहे.