Gas Shortage : गॅसच नाही तर व्यवसाय कसा करायचा? हॉटेल व्यावसायिक चिंतेत, मेस बंद झाल्यास नोकरदारांचेही वांदे
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारतात व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट फटका मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूरमधील हॉटेल व मेस व्यवसायाला बसत आहे. गॅस वितरकांनी पुरवठा थांबवल्याने अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पंचम पुरीवाला सारख्या ऐतिहासिक हॉटेल्सनाही फटका बसला आहे. प्रशासनाने तातडीने पुरवठा सुरळीत न केल्यास हॉटेल उद्योगावर मोठे संकट ओढवू शकते, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा फटका आता भारतात, स्थानिक व्यवसायांनाही बसताना दिसत आहे. अमेरिका ,इराण, इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. आखाती युद्धाच्या सावटामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद करण्यात आली आहे. यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, भारतात विशेषतः महाराष्ट्रात गॅसचा मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भारतात गॅस पुरवठा कमी होत असल्याने याचा कमर्शियल गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे महाराष्ट्रात तसेच मुंबईत अनेक हॉटेल्स बंद झाली असून आता कल्याण डोंबिवली येथेदेखील त्याचा थेट परिणाम होताना दिसल्याने, हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत. गॅस वितरकांकडून कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने दोन दिवसांत कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. “गॅसच नाही तर व्यवसाय करणार कसा?” असा प्रश्न उपस्थित होत असून कर्मचाऱ्यांचा पगार आणि हॉटेल भाड्याचीही चिंता हॉटेल चालकांना सतावत आहे.
हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना सध्या कमर्शियल गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. घरगुती गॅसवर निर्बंध आले असून हॉटेल व्यवसायासाठी लागणारा कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार व्यावसायिकांकडून केली जात आहे. गॅस वितरक एजन्सीकडून कमर्शियल गॅसचे वितरण सध्या बंद असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक हॉटेलमध्ये सध्या फक्त दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरला आहे. कल्याणमधील हॉटेल व्यावसायिक श्रीनिवास शेट्टी यांनी सांगितले की, जर लवकरात लवकर कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरू झाला नाही, तर पुढील दोन दिवसांत अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, दुसरा काही पर्यायच नाहीये. हॉटेल्स बंद झाली तेथे काम करणारे कर्मचारी यांनाही फटका बसू शकतो. काही हॉटेल्समध्ये 20-22, काही रेस्टॉरंटमध्ये तर त्यापेक्षाही जास्त लोकं काम करतात. त्यांना तसेच व्हेंडर्स, सप्लायर्स सगळ्यांवरच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे असं ते म्हणाले. या प्रॉब्लेमवर लवकरात लवकर काहीतरी पर्याय काढावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. प्रशासन आणि गॅस वितरकांनी तातडीने कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा हॉटेल उद्योगावर मोठे संकट ओढवू शकते, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.
पंचम पुरीवाला हॉटेललाही बसला फटका
मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा पंचम पुरीवाला या हॉटेललाही इराण अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसला आहे. गॅस पुरवठा खंडीत झाल्याने इथे सर्व मेनू हे आत्ता ऊपलब्ध नसल्याचा बोर्ड तिथे लावण्यात आला आहे. हे हॉटेल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात असून ते १८४८ पासून कार्यरत आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने कमर्शियल गॅसचा पुरवठा खंडीत झालाय. त्यामुळे हॉटेलच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे
व्यावसायिक गॅस पुरवठा बंद, खाजगी मेस चालकांनाही फटका, नोकरदारांच्या खाण्याचे होणारे वांदे
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केल्याचा मोठा फटका खाजगी मेस चालकांना बसणार आहे. शहरातील अनेक खाजगी मेस चालकांकडे आजचा दिवस पुरेल इतक्यात गॅस साठा शिल्लक आहे. गॅस पुरवठा न झाल्यास उद्यापासून या मेस चालकांना आपली मेस बंद ठेवावी लागणार आहे. मेस बंद ठेवावी लागल्याचा फटका मेस चालकांना तर बसणारच आहे, मात्र आगाऊ पैसे देऊन मेस मध्ये जेवण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि नोकरदारांच्या जेवणाचा देखील प्रश्न उभा राहिला आहे. गॅस मिळत नसल्याने एका बाजूला मेस चालक हतबल आहेत तर दुसरीकडे उद्यापासून जेवायचं कुठे हा प्रश्न मेस मधील मासिक मेंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरदारांना पडला आहे.
