माझ्या अंगावर गाडी घालायची होती, जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप

Munde vs Jarange: जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. आता जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. यात नेमकं काय बोलणं झालं ते जाणून घेऊयात.

माझ्या अंगावर गाडी घालायची होती, जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप
Jarange and Munde
| Updated on: Nov 07, 2025 | 4:47 PM

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. यात नेमकं काय बोलणं झालं ते जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांनी ऑडिओ क्लिप ऐकवली

मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला दोन अटक करण्यात आलेल्या आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली, नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी म्हणतो की, साहेब तुम्ही आले का परळीला? धनंजय मुंडे म्हणतात, नाही, अजून पुण्याला आहे, गरबड करू नका. आरोपी विचारतो, गाडीचं काय झालं यावर धनंजय मुंडे म्हणतात की, मी आता नवीन गाडी देऊ शकत नाही, जुनी गाडी देऊ शकतो.

माझ्या अंगावर गाडी घालायची होती

ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर पत्रकारांनी गाडीचं काय प्रकरण आहे असा प्रश्न विचारला. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना ही गाडी आमच्या ताफ्यात द्यायची होती. त्यानंतर ती गाडी आमच्या अंगावर घालायची होती. हा तो प्रकार आहे. ही क्लिप खोटी असं धनंजय मुंडेंचं म्हणणं असेल तर सीडीआर काढण्यात यावा. कोण कुठं होतं, कोण कुणाला भेटलं? जे दोघेजण सध्या अटक आहेत ते कुठे भेटले? त्यावेळेसचे लोकेशन काढा. सगळं समोर येईल, तुमचं आणि माझं वैर नाही. भाषणापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझ्या मुळावरचं लोकं उठवले.

मी सगळ्या गोष्टींना तयार

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे. त्याच्यावरील संकट टाळण्यासाठी आता ओबीसी ला ओढणार का? अजित दादा असे लोक पाळणार का? अजित दादांना सुद्धा शॉक बसला असेल. फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे, शिंदे साहेबाला सुद्धा लक्ष घालावं लागणार आहे. मराठा समाजाला सांगतो, मी सगळं व्यवस्थित करतो तुम्ही फक्त शांत रहा, मला तुम्हाला मोठं करू द्या.