अजितदादांच्या निधनाचं वृत्त कळताच जरांगे पाटील बारामतीमध्ये, पहिली प्रतिक्रिया काय?
विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे, अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच मनोज जरांगे पाटील हे बारामतीमध्ये पोहोचले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज अपघात झाला, ते मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं, विमान जमिनीला धडक्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अनेक नेते देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच मनोज जरांगे पाटील देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना ते चांगलेच भावुक झाल्याचं पहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
सगळ्यांना राज्यातील गोरगरिबांना अजित पवार आधार द्यायचे, आता ते आम्हाला कधी पहायला मिळणार नाही. दादा गेले हे खूप मोठं नुकसान आहे. राज्यात देशात आता अजित पवार यांच्यासारखा दुसरा नेता पुन्हा होणार नाही. आम्ही अशा दु:खाच्या प्रसंगी त्याच्यासोबत आहोत. त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, हे दु:ख नाही बघवत. काय बोलावं काहीच कळत नाही. अजितदादादा म्हणजे या राज्याला फार मोठा आधार होता. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांना श्रद्धांजली वाहताना शब्द देखील फुटत नाहीयेत. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. आज आमच्या समाजाचा, राज्याचा, राज्यातील जनतेला फार मोठा आधार गेला आहे. अजितदादा स्पष्ट बोलायचे, आता पुन्हा हे कधी पहायला मिळणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर शरद पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, हा निव्वळ एक अपघात होता, यामध्ये राजकारण नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान झालं आहे, ते कधीही भरून निघणार नाही, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
