
मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप होत आहे , या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली आहे, दरम्यान या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे, दरम्यान त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
मनोज जरांगे पाटलांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएसमध्ये जास्त आरक्षण मिळतं की ओबीसीत मिळतं. तारीख तुम्ही सांगा. जागा तुम्ही सांगा. महाराष्ट्र बघेल, दाखवून देऊ ईडब्ल्यूएसमध्ये जास्त मिळतं की ओबीसीत मिळतं असं यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही हाकेंना मारलं. मारामारीची प्रवृती कुणाची? तुम्ही वाघमारेंना मारलं, किती उदाहरणं देऊ? तुम्ही अनेकांना मारलं. ते म्हणात मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका? माझा त्यांचा काय बांधाला बांध आहे का? माझं अन् त्यांचं वैर काय? वैर एवढंच की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मराठा आरक्षण घ्या, त्या लढाईत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावू. निवडणुकीच्या तोंडावर काही तरी नावं घेतात. गेस्ट हाऊसला मी दर सोमवारी बसतो. अनेक लोक येऊन भेटतात. अटक केलेल्यांपैकी कुणी भेटलं असेल बाजूला जाऊन बोललं असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे. भेटल्याने आणि बाजूला बोलल्याने मला कळत नाही यात कसला कट रचला जातो? असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थिती केला आहे.
अटक झालेले कार्यकर्ते त्यांचे. बोलणारे कार्यकर्ते त्यांचे. कबुली जबाब देणारे त्यांचेच. आरोप मात्र माझ्यावर करत आहेत. याला कारण एकच आहे, मी दोन प्रश्न विचारले, स्टेजवर एकत्र येऊन बोलण्याची त्यांची तयारी नाही. जरांगे यांना धमकी आली आहे, त्यांना मी काही करतो असं या प्रकरणात वाटत असेल तर माझी मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने नाही तर सीबीआयने केली पाहिजे, असंही यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.