
राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा पास होऊन अनेक भोंदूबाबांचा छळ सुरुच असल्याचे उघडकीस आले आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट वंजारी फैलात येथे राहणाऱ्या एका भोंदूबाबाच्या घरी पोलीसांनी धाड टाकली असता त्या घरात एका मायलेकींचा छळवाद मांडल्याचे पाहून पोलिसही हादरले आहेत. पोलिसांनी या भोंदूबाबाच्या तावडीतून या मायलेकींची सुटका केली असून या भोंदूबाबाला बेड्या घातल्या आहेत.
यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरातील वंजारी फैलात या भागात राहणाऱ्या भोंदूबाबा महादेव उर्फ माऊली याने घरात यातनागृहच उघडले होते. या यातना गृहात मायलेकींचा अनन्वित अत्याचार सुरु असल्याचे उघड झाले आहे. या मायलेकींसाठी या भोंदूबाबाने यातना गृह बनवले होते. त्या मायलेकींना सर्वविधी तेथेच करावा लागत होता. या महिलेवर दृष्टात्म्याचा प्रभाव पडल्याचे सांगून या भोंदूबाबाने सळ्यांनी चटके देण्याचा उपचार सुरु केला होता.या भोंदूबाबा महादेव परसराम पालवे याच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळच्या या भोंदूबाबाच्या घरी शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून धाड टाकली, तेव्हा या घरातील एकूण वातावरण आणि मायलेकीसाठी तयार केलेले यातनागृह पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला. घरातील दृश्य मेंदूला झिणझिण्या आणणारे होते.या भोंदूबाबाने स्वत:च्या घरातच बुवाबाजीचे दुकान थाटले होते. त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला जाळ्यात ओढले होते. तिच्यावर दृष्टात्म्याचा प्रभाव पडला आहे असे सांगून उपचाराची गरज असल्याचे सांगत तिला घरी आणले आणि तिच्यासोबत तिची 14 वर्षाची मुलगी त्रिशा सुद्धा भोंदूबाबाकडे राहू लागली.
सुरुवातीला या दोन्ही मायलेकी अतिशय धष्टपुष्ठ आणि मानसिक दृष्ट्या स्थिर दिसत होत्या असे शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळाले. या भोंदूने त्यांच्यावर आघोरी उपचार सुरू केले, त्या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली. या खोलीतच त्या मायलेकी दिवस रात्र राहत होत्या. त्यांना सर्व विधी देखील तेथेच करावा लागत होता. या मायलेकींना गरम सळईने हा भोंदूबाबा चटके देत होता. या मायलेकींच्या अंगावर मारहाणीचे वळ आणि जखमा पोलीसांना दिसल्या.
या पीडीत मायलेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. भोंदू महादेव बाबाने या मायलेकींवर लैंगिक अत्याचार केले का याचीही तपासणी केली जाणार आहे. त्रिशाच्या तक्रारीवरून भोंदू बाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.