Manoj jarange Patil : 30 मे पासून उपोषणाला बसायचं की नाही? मनोज जरांगेंनी ठरवून टाकलं, मोठी घोषणा

Manoj jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी आंदोलन करणार की नाही? या बद्दलची आपली भूमिका जाहीर केली आहे. सरकारकडून त्यांनी आंदोलन करु नये यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी राज्यात ऊन्हाळा सुरु असल्याचं कारण देण्यात आलं होतं.

Manoj jarange Patil : 30 मे पासून उपोषणाला बसायचं की नाही? मनोज जरांगेंनी ठरवून टाकलं, मोठी घोषणा
Manoj jarange Patil
| Updated on: May 28, 2026 | 10:55 AM

“आपण सरकारला पाहिजे होता, त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. उद्याच्या 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत गेलेलो. त्याच धर्तीवर आतापर्यंत 10 महिने वेळ दिला. यापेक्षा किती वेळ द्यायचा? जाणूनबुजून गोरगरीब मराठ्यांच्या लेकरावर का अन्याय केला जातो? म्हणून मी कठोर भूमिका घेतली आहे. माझा नाईलाज आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाहीय. आपल्या लेकराला, समाजाला मिळत नसेल तर कठोर भूमिका घेणं गरजेच आहे. जे घोषित केलं होतं. 30 मे पासून आमरण उपोषण सुरु करणार आहे” अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारच्यावतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी समोरासमोर काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलं होतं. मला मनोज जरांगे आणि सरकारमध्ये दूत बनायला आवडेल असं प्रसाद लाड म्हणालेले.

“अद्यापही सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत. माझ्या लेकरांच्या आयुष्याच्या उन्हाळा केलाय. मी माझ्या निर्णयावर आता ठाम आहे. एक तर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचं काहीतरी होईल. सलग तीन वर्ष झाले अजून किती वेळ द्यायचा आहे. मे महिन्याच्या खडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण सुरू करणार आहे. कारण सरकारने माझ्या समाजातील लेकरांचा उन्हाळा करून टाकलाय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

त्या टोकाचं आमरण उपोषण मी आता करणार

“मी माझ्या मराठा समाजाला आव्हान करतोय की तुम्ही अंतरवाली कडे रखरखत्या उन्हात येऊ नका. देशात आतापर्यंत इतकं टोकाचं आमरण उपोषण झालं नसेल, त्या टोकाचं आमरण उपोषण मी आता करणार आहे” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “प्रसाद लाड येणार आहेत की नाही या संदर्भात मला काही माहीत नाही” असं जरांगे पाटील म्हणाले.

मी समाजाच्या लेकराबाळासाठी मरायला तयार

“शरीराची आग होईल, जे होईल ते होईल मी बसणार यावर फायनल. मराठ्यांनी अंतरवलीत येऊ नये. सरकार सर्वांची काळजी घेतय. कोणीही राज्यात उद्रेक करायचा नाही. मी समाजाच्या लेकराबाळासाठी मरायला तयार आहे. मला टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय. तो मी घेतलाय. मी मागे हटणार नाही. तुमच्या लेकराबाळाच कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे. मराठ्यांची शान-प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Follow Us