
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. आज दुपारी 3 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी कोर्टाने सरकारला सुनावलं आहे. रस्त्यावर रोज 50 हजार लोक फिरत होती, तुम्ही काय करत होता? असा सवाल करत कोर्टाने राज्य सरकारला केला आहे. कोर्टात नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हायकोर्टाने मुंबईतील रस्ते रिकामे करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या होत्या. यावर कोर्टात सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता म्हणाले की, पोलीस सगळीकडे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देत आहेत. लोकांना जागा खाली करण्यास सांगत आहेत. काही गाड्या तिथून निघत आहेत मात्र लोक अजूनही त्या परिसरात फिरत आहेत. जरांगे यांनी लिखित स्वरुपात किंवा आवाहन करत लोकांना मुंबई सोडण्यास सांगावे त्याचा चांगला परिणाम होईल असंही महाअधिवक्त्यांनी म्हटलं आहे.
महाअधिवक्त्यांनी पुढे बोलताना म्हणाले की, ‘आंलोलक त्याच ठिकाणी राहिले तर अडचण होईल. त्यामुळे पोलीस सातत्याने रस्त्यावर काम करत आहेत आणि आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही कुठलीही कठोर कारवाई किंवा चार्ज केला नाही, कारण गणपतीचा उत्सव आहे.’
यावर कोर्टाने सरकारला सुनावलं आहे. ‘तुम्ही तत्काळ कोर्टात का आला नाहीत ? आम्ही तुमच्याविरोधातही ऑर्डर करू शकतो ही तुमचीही तितकीच जबाबदारी होती. ही तुमची चुक होती. 50 हजारांपेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरत होते. त्यावेळी तुम्ही नेमकं काय करत होतात? योग्य पाऊल वेळीच का नाही उचलले? अशा शब्दात कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने आता मुंबईचे रस्ते खाली करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस मराठा आंदोलकांना आवाहन करत आहेत. आम्ही तुम्हाला आंदोलनासाठी सहकार्य करत आहोत, तुम्हीही आम्हाला सहकार्य करा असे मुंबई पोलीस सांगत आहेत. मुंबईच्या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या गाड्या काढा, रस्ते मोकळे करा असा असे पोलीस सांगत आहेत. तर ज्या गाड्यांत जेवण आहे त्या इथेच ठेवू द्याव्यात अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे.