
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी भीती ओबीसी समाजामध्ये वाढत आहे. याच भीतीतून लातूर जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (३५) असे या तरुणाचे नाव असून, तो लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होता. या घटनेनंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजातील शिक्षित नेते आणि लोकप्रतिनिधींना आरक्षणाबद्दल काही थेट प्रश्न विचारले आहेत.
छगन भुजबळ यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजातील शिक्षित नेते आणि लोकप्रतिनिधींना सवाल केले. मी मराठा समाजातील शिक्षित, माजी आणि सध्याच्या लोकप्रतिनिधींना एक प्रश्न विचारू इच्छितो. ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे समजत नाही, अशा अशिक्षित व्यक्तींकडून मला कोणत्याही उत्तराची अपेक्षा नाही.” असा टोला छगन भुजबळांनी लगावला.
जे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार शिक्षित आहेत आणि ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे माहिती आहे, त्याच्यासाठी मी सांगतो. जेव्हा ५० टक्के आरक्षण आणि ५० ओपन असं होतं, तेव्हा ब्राह्मण समाज २ ते ३ टक्के होता. पण तेव्हा मराठा समाज हा ५० टक्के होता. त्यानंतर मग आंदोलन झालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत मराठा समाजाला १० टक्के जे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण सामाजिक दृष्ट्यामागास नाहीत अशांना हे आरक्षण दिले. त्यातही मराठा समाज एकटाच होता. त्यानंतरही वेगळं आरक्षण हवं अशी मागणी करण्यात आली. यानंतर मराठा समाजाला पुन्हा १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानतंर मराठा समाजाला ओबीसीत घ्या यासाठी आंदोलन होत आहे. यासाठी प्रेशर टाकले जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
यामुळे मला त्यांना विचारायचं की तुम्हाला १० टक्के मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द केलं तर EWS मध्ये तुम्ही ८० ते ९० टक्क असतात, तेही तुम्हाला नको आहे का? त्यासोबत तुम्ही जे ओपनमध्ये फिरत असता तेही तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मराठा समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी मला द्यावे. ज्यांना काही समजत नाहीत, अशिक्षित आहेत, माहिती नाही, त्यांच्याकडून या उत्तराची अपेक्षा नाही. त्यामुळे माझी मराठा समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी विनंती आहे की तुम्ही बोलायला हवं. त्यांनी पुढे येऊन सांगावं की आम्हाला SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको, असं सांगावं. फक्त ओबीसींच आरक्षण हवं आहे, असं त्यांनी सांगावं, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.